सलग सहाव्या दिवशीही राज्यात जोरदार पाऊस

0
93

>> गेल्या पाच दिवसांत २० इंचांची बरसात

जोरदार पावसाने काल शुक्रवारी सलग सहाव्याही दिवशी राज्यातील विविध भागांना झोडपून काढले. दरम्यान, १८ ते २० जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता येथील हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत पणजी, ओल्ड- गोवा, मुरगाव, काणकोण आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. काल संध्याकाळच्या सत्रात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. राज्यात मागील पाच दिवसात २०.१० इंच पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासांत सरासरी २.५५ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६५.७५ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात येत्या १८ ते २० जुलै दरम्यान काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या चोवीस तासांत वाळपई येथे ३.२२ इंच, पेडणे येथे ३.१८ इंच, म्हापसा येथे ३.११ इंच, पणजी येथे २.५१ इंच, ओल्ड गोवा येथे २.२५ इंच, साखळी येथे २.५५ इंच, काणकोण येथे २.२५ इंच, दाबोळी येथे २.५४ इंच, मडगाव येथे १.९० इंच, मुरगाव येथे २.७० इंच, केपे येथे २.६८ इंच आणि सांगे येथे १.९३ इंच पावसाची नोंद झाली आहे.