>> राष्ट्रपती कार्यालयातून आदेश
>> आठ राज्यांत नव्या राज्यपालांची नियुक्ती
भाजपचे एक ज्येष्ठ, व्यासंगी व अभ्यासू नेते अशी ओळख असलेले माजी सभापती, माजी मंत्री, गोवा प्रदेश भाजपचे माजी अध्यक्ष व भाजपच्या गाभा समितीचे सदस्य राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कार्यालयातून काल सकाळी त्यासंबंधीचा आदेश काढण्यात आला. राष्ट्रपतींनी काल ८ राज्यांचे राज्यपाल बदलताना हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी राजेंद्र आर्लेकर यांची नियुक्ती करून गोमंतकीयांना एक सुखद धक्का दिला.
६७ वर्षीय राजेंद्र आर्लेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ नेते असून २००२ साली ते भाजप उमेदवारीवर वास्को मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. २००७ पर्यंत सदर मतदारसंघाचे ते लोकप्रतिनिधी होते. नंतर २०१२ साली ते पेडणे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते व २०१७ पर्यंत त्यांनी सदर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१५ साली त्यांच्याकडे वन व पर्यावरण खात्याचा ताबा सोपवण्यात आला होता.
आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचे कळताच काल विविध क्षेत्रातील लोकांनी त्यांच्या घरी जाऊन तसेच दूरध्वनीद्वारे तसेच समाजमाध्यमावरून त्यांचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
श्री. आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी, रताना गोव्यातील राजकारणात राहून ह्या पदावर पोचणारे ते पहिलेच गोमंतकीय असल्याचे सांगितले.
श्रीपाद नाईककडूनही अभिनंदन
केंद्रीय आयुषमंत्री व उत्तर गोव्याचे खासदर श्रीपाद नाईक यांनीही आर्लेकर यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. नाईक यांनी आपल्या ट्विटमधून आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी झालेली नियुक्ती ही गोमंतकीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे.
गोवा मंत्रिमंडळातील विविध आमदार, मंत्री आदींनी तसेच राज्यातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा नागरिकांनीही आर्लेकर यांचे अभिनंदन केले आहे.
पक्षाशी निष्ठा ठेवली की
न्याय मिळतो ः आर्लेकर
पक्षाशी निष्ठा ठेवली आणि प्रामाणिकपणे काम केले तर पक्षाचे नेते, केंद्रीय नेते नक्कीच तुम्हाला न्याय देतात. कारण भाजप हा सर्वसामान्य नागरिकांचा पक्ष आहे. राज्यपाल पद हे एक घटत्नामक पद आहे. घटनेनुसार त्याचे कामकाज चालते आणि आपणही त्या पदाला शोभेल असे कार्य करणार असल्याचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले. श्री. आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी निवड झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. श्री. आर्लेकर यांनी, भाजप पक्षात जो निष्ठा ठेवतो आणि कसल्याच फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करतो, त्याचे कार्य कधी वाया जात नसल्याचे सांगितले.
गोव्याच्या राज्यपालपदी श्रीधरन् पिल्लई
मिझोरमचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन् पिल्लई यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील बर्याच काळापासून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा होता. नव्या राज्यपालांची नियुक्ती करताना राष्ट्रपतींनी गोव्यासाठीही पूर्णवेळ राज्यपालाची नियुक्ती केली.
नवे राज्यपाल पिल्लई हे एक राजकीय नेते, वकील व लेखकही आहेत. पिल्लई यांनी भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये अनेक पदांवर काम केलेले आहे.
तिसरे गोमंतकीय राज्यपाल
एखाद्या राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती होणारे राजेंद्र आर्लेकर हे तिसरे गोमंंतकीय आहेत. सर्वांत प्रथम अँथनी डायस हे १९७१ ते ७९ पर्यंत प. बंगालचे राज्यपाल बनले होते. त्याशिवाय ते १९६९-७१ या दरम्यान त्रिपुराचे लेफ्टनंट गव्हर्नर होते.
राज्यपालपदी नियुक्ती झालेले दुसरे गोमंतकीय होते ते माजी लष्कर प्रमुख सुनीत रॉड्रिग्ज. ते २००४ ते २०१० ह्या काळात पंजाबचे राज्यपाल होते. ह्या दोघा गोमंतकीय राज्यपालांनंतर त्या पदावर नियुक्ती होण्याचा राजेंद्र आर्लेकर यांना मान मिळाला आहे.
मात्र, काल राजेंद्र आर्लेकर यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर ह्या पदावर नियुक्ती होणारे ते पहिले गोमंतकीय असल्याचा बर्याच जणांचा समज झाला होता. पत्रकारांशी बोलताना आर्लेकर यांनी त्या पदावर नियुक्ती झालेला मी पहिला गोमंतकीय आहे असे सांगून माझ्यापूर्वी कदाचित कुणी झाले नसतील, असे मत व्यक्त केले होते. तर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीही आर्लेकर हे राज्यपालपदी नियुक्ती झालेले पहिले गोमंतकीय असल्याचा दावा केला होता.