>> विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरण
विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि सभागृहात गोंधळ घातल्या प्रकरणी महाराष्ट्रातील भाजपच्या १२ आमदारांचे एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला.
मंत्री छगन भुजबळ यांनी मांडलेल्या ओबीसी समाजाच्या संबंधित ठरावावरुन सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सभागृहातील गोंधळानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढण्यासाठी गेले. त्यावेळी भास्कर जाधव यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करण्यात आला, तर अशी धक्काबुक्की झालीच नाही असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
या गैरवर्तन करणार्या १२ आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना निलंबित करण्यात यावे, असा ठराव मंत्री अनिल परब यांनी मांडला. या सर्व सदस्यांना मुंबई आणि नागपूर विधिमंडळाच्या आवारात एक वर्षे येण्यासाठी बंदी घातली आहे.
पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार बागडिया यांना निलंबित केले आहे.