केवळ रॅपिड ऍन्टिजेन चाचणीद्वारे परप्रांतियांना प्रवेश नको ः गिरीश

0
105

>> ‘जिनॉम सिक्वेन्सिंग’ची सोय करण्याची मागणी

गोवा सरकार सीमेपलिकडून गोव्यात येऊ पाहणार्‍या परप्रांतियांची कोविड तपासणी केवळ रॅपिड ऍन्टिजेन चाचणीद्वारे करून त्यांना प्रवेश देत आहे. मात्र त्यामुळे सरकार गोमंतकीयांचा जीव धोक्यात घालीत असल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. शेजारच्या महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने ‘जिनॉम सिक्वेन्सिंग’ चाचणीचे काम हाती घेण्याची गरजही यावेळी चोडणकर यांनी व्यक्त केली.

केरळ, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यात कोविडचे उत्परिवर्तीत रूप असलेल्या डेल्टा प्लसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळत आहेत. या पार्श्‍वभूमीवर परराज्यातून गोव्यात येऊ पाहणार्‍या पर्यटकांना राज्यात प्रवेश देताना सरकारने विशेष काळजी घ्यायला हवी. या पर्यटकांना त्यांची केवळ रॅपिड ऍन्टिजेन चाचणी करून त्यांना राज्यात येऊ देणे हे गोव्यासाठी धोक्याचे व घातक असल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील असंवेदनशील सरकारने कोविडच्या दुसर्‍या लाटेच्यावेळी जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती त्यापासून कोणताही धडा घेतला नसल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला आहे. सावंत हे सध्या उगीच काही घोषणा करून लोकांना फसवण्याच्या कामात मग्न असून आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे तर अज्ञातवासात गेल्याचाही आरोप चोडणकर यांनी केला आहे.
‘डेल्टा प्लस’ हा विषाणू १०० देशांत सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण जग हे महामारीच्या भयानक अशा छायेखाली असल्याने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. शेजारच्या राज्यात ह्या विषाणूचा यापूर्वीच शिरकाव झालेला आहे. त्यामुळे सरकारने आता राज्यात ‘जिनॉम सिक्वेन्सिंग’साठीची यंत्रणा उभारायला हवी. तसेच राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास तिला तोंड देण्यासाठी आवश्यक ती साधनसुविधा उभारण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणीही चोडणकर यांनी केली आहे.