राज्य सरकारने पूर्व प्राथमिक स्तरावर राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलली असून काल जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे वयाची तीन वर्षे पूर्ण केलेल्या मुलांनाच नर्सरीच्या वर्गात प्रवेश देता येईल, असे पूर्व प्राथमिक शाळा चालवणार्या शाळांच्या व्यवस्थापनांना कळवले आहे. ज्या मुलांचे वय ३१ मे रोजी अथवा त्यापूर्वी ३ वर्षे पूर्ण झाले आहे त्यांनाच पूर्व प्राथमिक शाळेत प्रवेश देता येणार असल्याचे वरील परिपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.