कॉंग्रेसकडून विधानसभेची तयारी

0
55

>> विविध विभागांची पुनर्रचना; माध्यम विभाग अध्यक्षपदी पणजीकर

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसने आपल्या विविध विभागांची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेतले असून, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या माध्यम विभाग अध्यक्षपदी अमरनाथ पणजीकर यांची नियुक्ती केली आहे, तर माध्यम पॅनलिस्ट म्हणून ट्रोजन डिमेलो यांची नेमणूक केली आहे.

हे नवनियुक्त सदस्य आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपला शिंगावर घेऊन त्यांचा गैरकारभार उघड करण्याचे काम हाती घेणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने आक्रमक रणनीती तयार केली असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

माध्यम विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांना सरचिटणीसपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे. ट्रोजन डिमेलो यांना दिलेले मीडिया पॅनलिस्ट हे पद नव्यानेच तयार केले आहे. माध्यम विभागात आर्किटेक्ट तुलियो डिसोझा, पत्रकार महादेव खांडेकर, ऍड. श्रीनिवास खलप, डॉ. आशिष कामत, ऍल्टन डिकॉस्ता व शिक्षिका पल्लवी भगत यांचा समावेश आहे.दरम्यान, नवीन माध्यम विभागाला संपूर्ण सहकार्य मिळेल, असे दिगंबर कामत यांनी यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष निवड तूर्त अशक्य

प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी आठवडाभरात नव्या अध्यक्षाची निवड होणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. मात्र अद्याप प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत कुणीही स्थानिक कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षाची पुढील आठवडाभरात निवड कशी करण्यात येईल, असा सवाल काही स्थानिक नेत्यांनी उपस्थित केला आहे.
कोणत्याही महत्त्वाच्या पदावर एखाद्या व्यक्तीची अथवा जुन्या व्यक्तीला हटवून नव्या व्यक्तीची नियुक्ती करण्यापूर्वी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून त्यांचे मत जाणून घेणे व त्यानंतर ही नियुक्ती करणे अशी पद्धत कॉंग्रेस पक्षात आहे. त्याला सहसा फाटा दिला जात नसल्याचे एका महत्त्वाच्या पदावरील स्थानिक नेत्याने काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना स्पष्ट केले. या संदर्भात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना विचारले असता, कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात त्याची आपल्याला प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.