राज्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे ११ बळी

0
96

>> डॉ. शिवानंद बांदेकर यांची माहिती; १४ जणांवर उपचार सुरू

राज्यात म्युकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) एकूण २५ रुग्ण आढळून आले असून, त्यातील ११ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गोमेकॉमध्ये म्युकरमायकोसिसच्या १४ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसिसमुळे दगावलेल्या ११ रुग्णांना कोरोनाची गंभीर बाधा झाली होती, असे गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी काल सांगितले.

२४ तासांत २५३ नवे कोरोनाबाधित
जून महिन्यात पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा एकेरी संख्येवर आला आहे. गेल्या २४ तासांत आणखी ९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच, मागील अडीच महिन्यातील सर्वांत कमी नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, नवे २५३ रुग्ण आढळून आले आहेत. केवळ १,६९५ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे, त्यातील २५३ नमुने बाधित आढळून आले आहेत. गेल्या २४ तासांत इस्पितळांमधून ५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६२ हजार ७२१ एवढी झाली आहे.

सक्रिय रुग्णसंख्या ४,४०६ वर
राज्यातील सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ४०६ एवढी झाली आहे, तर राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या २,९३७ झाली आहे. नवे कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १४.९३ टक्क्यांवर वर आले आहे, तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

कोरोना बळींच्या संख्येत घट
राज्यात चोवीस तासांत ९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गोमेकॉमध्ये ४ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात २ रुग्ण, फोंडा उपजिल्हा इस्पितळात १ रुग्ण, उत्तर आणि दक्षिण गोव्यातील खासगी इस्पितळात प्रत्येकी १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

फोंड्यात सर्वाधिक रुग्ण
फोंडा येथे सर्वाधिक ४२७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. मडगावात ३१३ आणि राजधानी पणजी परिसरात २२७ सक्रिय कोरोनाबाधित आहेत. चिंबल येथे २५९ रुग्ण, कांदोळी येथे १२६ रुग्ण, कुठ्ठाळी येथे १८५ रुग्ण, पर्वरी येथे १२६ रुग्ण, पेडणे येथे १४५ रुग्ण, साखळी १८० रुग्ण, कुडचडे येथे १०२ रुग्ण सक्रिय आहेत.

७२० जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल आणखी ७२० रुग्ण कोरोनामुक्त झाले. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार ३७८ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४९ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन २१७ रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.