Home Featured राज्यातील संचारबंदीत ३१ मेपर्यंत वाढ

राज्यातील संचारबंदीत ३१ मेपर्यंत वाढ

0

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

>> तिसर्‍या लाटेच्या पूर्वतयारीसाठी कृतिदलाची स्थापना

राज्यातील संचारबंदीमध्ये येत्या ३१ मे २०२१ पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेच्या पूर्वतयारीसाठी १५ सदस्यीय कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

राज्यात येत्या रविवार २३ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या संचारबंदीमध्ये येत्या ३१ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या पद्धतीने संचारबंदी कायम राहणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

वादळामुळे १४६ कोटीचे नुकसान
राज्यात तौक्ते या चक्रीवादळामुळे सुमारे १४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे वीज खात्याचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिक्षण खात्याच्या शाळांच्या इमारती, वन खाते, मच्छीमारी, शेती बागायती, तसेच नागरिकांची घरे व इतर साधनसुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीतून मदत मिळविण्यासाठी केंद्राशी संपर्क साधण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणखी बळकट करण्याचा तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामग्रीची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. वादळामुळे रस्ता, वीज व इतर साधनसुविधांवर पडलेली झाडे हटविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायती, नगरपालिका आणि नागरिकांनी मोठे सहकार्य केले आहे. वादळानंतर काही नागरिकांना तीन ते चार दिवस वीज, पाणीपुरवठ्याअभावी राहावे लागल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्य कृतिदलाची बैठक
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृतिदलाची बैठक काल शुक्रवारी संध्याकाळी घेण्यात आली. राज्यात कोरोनाची तिसरी लाट हाताळण्याच्या रणनीतीवर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला आहे.

कोरोना लस खरेदीसाठी
ग्लोबल टेंडरचा प्रस्ताव

राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर जारी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल दिली. १८ ते ४४ वयोगटातील लशीचे डोस परराज्यातील नागरिक घेत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. केंद्र सरकारचे लसीकरणाची नोंदणी करणार्‍या येणार्‍या ऍपवर नियंत्रण आहे. त्यामुळे या ऍपवर नोंदणी करणार्‍याला लशीचा डोस घेण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. तरीही, हा विषय केंद्र सरकारकडे मांडण्यात आलेला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

तिसर्‍या लाटेच्या मुकाबल्यासाठी १५ सदस्यीय कृतिदल
कोरोना महामारीची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय खास कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. या खास कृतिदलामध्ये सरकारी आणि खासगी डॉक्टरांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, गोमेकॉचेे डीन डॉ. बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेऊन सरकारला आवश्यक त्या सूचना करणार आहे. या तज्ज्ञ समितीमध्ये बालरोग्य तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. गोमेकॉतील सेवानिवृत्त, ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञांशी संपर्क साधून त्यांची सेवा घेण्याचा विचार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.