ओसरलेले तेज

0
174

तरुण तेजपाल काल महिला सहकार्‍यावरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आठ वर्षांनी निर्दोष सुटले. पण हा निवाडा केवळ जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा आहे. गोवा सरकार त्याला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, त्यामुळे एवढ्यातच त्यांच्या निर्दोषत्वाचे ढोल पिटले जाऊ नयेत. गोव्यामध्ये २०१३ च्या थिंक फेस्टवेळी बांबोळीतील सप्ततारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये नेमके काय घडले ह्याचे प्रत्यक्ष साक्षीदार जरी कोणी नसले, तरी त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रारदार महिलेने सांगितलेला घटनाक्रम, गोवा पोलिसांनी कसोशीने गोळा केलेले परिस्थितीजन्य पुरावे हे सगळे पाहता तेजपाल असे सहजतेने निर्दोष सुटू शकतील असे वाटले नव्हते, परंतु सत्र न्यायालयाने त्यांना संशयाचा फायदा दिला आहे. मात्र, जोवर या प्रकरणातील पीडिता युवती आपल्या भूमिकेशी ठाम असेल, तोवर तेजपाल यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार हटणारी नाही आणि हटूही नये. पीडितेला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या प्रकरणाला बरेचसे राजकीय सूडसत्राचे स्वरूप जरी आलेले असले तरी उपलब्ध बळकट साक्षीपुरावे काही आरोपीला शेवटपर्यंत निर्दोष ठरवतील असे नव्हे. त्यामुळे आरोपीने आपले निर्दोषत्व पूर्णांशाने सिद्ध करणे आवश्यक आहे.
तेजपाल यांच्यावरील आरोपपत्रामुळे त्यांची तोवर झगमगणारी व्यावसायिक कारकीर्द सपशेल संपुष्टात आली आणि त्यांच्या ‘तेहलका’चेही तेज ओसरले. वास्तविक, दोन हजारच्या दशकामध्ये जेव्हा ‘आऊटलूक’ साप्ताहिक सोडून तेजपाल, अनिरुद्ध बहल, मॅथ्यू सॅम्युअल आदी मंडळींनी ‘तेहलका’ सुरू केले, तेव्हा शोध पत्रकारितेचे नवे मानदंड त्यांनी देशात प्रस्थापित केले होते. विशेषतः आपल्या पहिल्याच धमाकेदार मॅच फिक्सिंग प्रकरणातून ‘तेहलका’ हे नाव देशात अक्षरशः घरोघरी पोहोचले होते. मनोज प्रभाकरच्या मदतीने त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटांमुळेच महंमद अझरुद्दिनपासून अजय जडेजापर्यंत ‘फिक्सर्स’ची क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली.
‘ऑपरेशन वेस्ट एंड’ मध्ये तर लष्कर, राजकारणी आणि नोकरशहांना पैसे आणि बाया पुरवून बनावट शस्त्रास्त्र सौदा गळी उतरवण्याचा जवळजवळ यशस्वी प्रयत्न ‘तेहलका’ ने केला आणि त्याची परिणती तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस आणि त्यांच्या सहकारी समता पक्षाच्या नेत्या जया जेटली यांच्या राजीनाम्यात आणि राजकीय विजनवासात झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना पैसे स्वीकारताना ‘तेहलका’च्या ह्याच मंडळींनी कॅमेर्‍यात बद्ध केले होते, ज्यामुळे त्यांना पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
गुजरात दंगलीनंतर ‘तेहलका’ ने भाजप आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात फार मोठी आघाडीच उघडली होती. त्यामुळे गोव्यात स्वतः तेजपाल जेव्हा ह्या भलत्या प्रकरणात सापडले, तेव्हा भाजप नेत्यांसाठी ती त्यांना संपविण्याची आयती सुवर्णसंधीच ठरली तर नवल नाही. गोवा पोलिसांनी स्वतःहून त्या प्रकरणात तेव्हा गुन्हा नोंदवला आणि कठोरातील कठोर कलमे लावून त्यांचा कसोशीने पाठपुरावा केला. हीच कसोशी गोव्यातील नेपाळी मुलीवरील अत्याचार प्रकरणात किंवा जर्मन कन्येवरील बलात्कार प्रकरणात मात्र दिसलेली नाही हेही येथे नमूद करण्याजोगे आहे. सदर लैंगिक अत्याचार प्रकरणांतील मंडळी आज राज्यातील भाजप सरकारच्या पंखांखाली आहेत.
तेजपाल यांनीही अर्थातच ह्या प्रकरणातून स्वतःचा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी निष्णात वकिलांची फौज वापरली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली आणि जामीन मिळवला. त्यांच्या सध्याच्या ‘निर्दोष’ मुक्ततेमागे नुकतेच कोविडने निधन पावलेले मडगावचे नामांकित विधिज्ञ ऍड. राजीव गोम्स यांचे मोठे महत्त्वाचे योगदान आहे हेही उल्लेखनीय आहे. तेजपाल यांच्या अटकेनंतर त्यांचे ‘तेहलका’ केवळ नामधारी उरले आहे. खरे तर त्यांचे सहकारी अनिरुद्ध बहल सोडून गेले आणि त्यांनी स्वतःचे ‘कोब्रापोस्ट’ सुरू केले तेव्हाच तेजपाल एकाकी पडले होते. ‘तेहलका’ पुढे आर्थिक अडचणीत आले तेव्हा अरुंधती रॉय, शशी थरूरसह अनेक कार्यकर्ते मंडळींनी त्याला आर्थिक हातभार लावून ते उभे केले होते. सध्या एका पंजाबी राजकारणी उद्योजकाच्या आधारे ते कसेबसे सुरू आहे. तेजपाल स्वतः त्याचे एक भागधारक आहेत आणि आता न्यायालयीन ‘निर्दोषत्वा’चा आधार घेऊन कदाचित त्यांना पुन्हा संपादकपदी आणले जाईल, परंतु शोधपत्रकारितेचे जे तेज पूर्वी त्यांनी दाखवले, ते यापुढे दाखवता येईल का आणि देश त्यावर विश्वास ठेवील का यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे. शेवटी विश्वासार्हता हाच पत्रकारितेचा आत्मा असतो आणि ती आरशासारखी असते. जेव्हा ती तडकते तेव्हा कितीही मोठा पत्रकार का असेना, तो आणि त्याची पत्रकारिता रसातळाला पोहोचते ह्याची एम. जे. अकबरपासून तरुण तेजपालपर्यंत किती उदाहरणे हवीत?