तौक्ते चक्रीवादळामुळे वीजखात्याचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात बर्याच ठिकाणी वीजपुरवठा अजून सुरळीत झालेला नाही. तो आज गुरूवारपर्यंत सुरळीत होईल असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल सांगितले. या संदर्भात ते म्हणाले की, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीजखात्याने दिल्ली व पश्चिम बंगाल येथून विशेष तज्ज्ञ तांत्रिक कर्मचार्यांना पाचारण केले आहे. तसेच कोल्हापूर व पुण्यातूनही तंत्रज्ञ येणार आहेत. त्यामुळे गुरूवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल.
गेल्या चार दिवसांपासून ४००० वीज कर्मचारी अथकपणे दुरूस्तीकाम करत आहेत. काल बुधवारी त्यांनी केवळ काही तास विश्रांती घेतली. त्यानंतर त्यांनी आपले काम पुढे सुरू केले असे काब्राल म्हणाले. खात्याच्या कर्मचार्यांव्यतिरिक्त कंत्राटदारांच्या २०० कामगारांचीही दुरूस्तीच्या कामासाठी मदत घेतली आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, बारामती आणि बेळगाव येथील कंत्राटदारांची मदत घेतली आहे. त्यांनी १५० कामगार पाठवले आहेत. त्याशिवाय पश्चिम बंगाल आणि दिल्लीहून विशेष कौशल्य असलेले २०-२० जण आल्याचे काब्राल यांनी सांगितले.