आपल्या चिमुकल्या गोव्याने आज राष्ट्रीय सरासरीच्या चौपट कोरोना रुग्ण आणि देशातील सर्वाधिक टेस्ट पॉझिटिव्हिटी रेटनिशी अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भूतकाळातून धडा न घेतलेले, वर्तमानाचे भान नसलेले आणि भविष्यात काय वाढून ठेवले असेल ह्या द्रष्टेपणाचा पूर्ण अभाव असलेले राजकीय नेतृत्व, अशा प्रकारच्या युद्धपातळीवर काम करण्याची सवयच नसलेले सुस्त प्रशासन, भोवतालच्या परिस्थितीचे आकलन नसलेली गाफील, बेदरकार जनता आणि गोव्याच्या सुखदुःखाशी काहीही देणेघेणे नसलेले आणि गोव्यामध्ये जायचे म्हणजे केवळ स्वतःचे चोचले पुरविण्यासाठीच ह्या भूमिकेतून गोव्यात धुमाकूळ घालून गेलेले लक्षावधी गुलहौशी पर्यटक यांनी आज गोव्याला ह्या आत्मघाताच्या कड्याच्या टोकावर आणून सोडले आहे.
गेल्या नोव्हेंबर, डिसेंबरपासूनच पर्यटकांना लगाम घातला असता तर ही वेळ आली नसती, पर्यटनक्षेत्र खुले केल्याने राज्यात पर्यटक वाढल्यानेच आजची स्थिती ओढवली अशी स्पष्ट कबुली आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सीएनएनच्या बॅकी अँडरसनला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. आपण वारंवार निर्बंधांची, लॉकडाऊनची मागणी करीत होतो, पण राजकीय नेतृत्वाने ते ऐकले नाही हेही त्यात त्यांनी अधोरेखित केले आहे. म्हणजेच सध्याच्या परिस्थितीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच जबाबदार असल्याचेच विश्वजित यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. ‘पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्बंध घालू नका असे कधीही सांगितलेले नव्हते. ते स्वातंत्र्य मुख्यमंत्र्यांना नक्कीच होते’ असे राणे म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून वेळीच निर्बंध न घातल्यानेच आजची परिस्थिती ओढवली असाच होतो. विधानसभेची निवडणूक जवळ आहे आणि निवडणुकीत जनता नेतृत्वाला जबाबदार धरील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
विश्वजित अत्यंत परखडपणे बोलले आहेत. किमान महिनाभर आधी लॉकडाऊन व्हायला हवे होते हे त्यांचे म्हणणेही काही चुकीचे नाही, परंतु आज राज्य एवढ्या बिकट परिस्थितीतून चालले असताना राज्याचे आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातील ह्या राजकीय विसंवादाचे पडसाद अशा रीतीने उमटणे योग्य म्हणता येत नाही. राज्यातील बिकट स्थिती लक्षात घेता दोन्ही नेत्यांनी एकदिलाने काम करण्याची गरज आम्ही आजवर अनेकदा व्यक्त केली, परंतु हे मनोमीलन आजतागायत कधी दिसलेले नाही आणि दिसण्याची शक्यताही नाही. उलट परस्परांवर राजकीय कुरघोडी करण्याचा खटाटोप मात्र सदैव दिसतो. चांगल्या कामांचे श्रेय आरोग्यमंत्र्यांना आणि अपश्रेय मुख्यमंत्र्यांना जाऊ लागताच दोन लाखांच्या व्हेंटिलेटरची साडे आठ लाखांना खरेदी, गोमेकॉतील प्राणवायूचे एकाच पुरवठादाराला दिलेले कंत्राट असे विश्वजित यांच्याविषयी संशय निर्माण करणारे स्फोटकविषय अचानक बाहेर येणे, बाबुश यांच्याकडून त्यांना एकाएकी लक्ष्य केले जाणे, ह्या सगळ्यावर सीएननला दिलेली मुलाखत हा विश्वजित यांनी केलेला पलटवार आहे असेच एकूण दिसते. बॅकी म्हणजे रिबेका अँडरसन ह्या ब्रिटीश पत्रकार सीएननच्या मध्य पूर्वेच्या व्यवस्थापकीय संपादक. त्या अबुधाबीतून काम करतात. ज्या प्रकारे विश्वजित मुलाखतभर बॅकी, बॅकी करीत त्यांना उत्तरे देताना दिसतात, ते पाहता त्यांना त्या बर्यापैकी परिचित असाव्यात. त्यामुळे एकूणच ह्या स्फोटक मुलाखतीमागे चांगलेच नियोजन असावे. परंतु खरोखर ही वेळ राजकीय हिशेब चुकते करण्याची नाही.
राज्यामध्ये आज दर अर्ध्या तासाला एक मृत्यू होतो आहे. चाचणी करणार्या दर दोन व्यक्तींपैकी एक पॉझिटिव्ह निघते आहे, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण गेल्या महिन्यातील ९८ टक्क्यांवरून अगदी ७० टक्क्यांवर घसरले आहे. दिवसागणिक इस्पितळात दाखल करावे लागणार्यांची संख्या तीनशेच्या वर गेलेली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोनाबाधितांची संख्या बत्तीस हजारांवर आहे. सर्व कोविड इस्पितळांतील अडीच हजार खाटा भरल्या असल्याची कबुली स्वतः राणेंनीच दिलेली आहे. ही सगळी आकडेवारी पाहिली तर आपण आज कोणत्या भीषण परिस्थितीतून वाटचाल करतो आहोत ते कळते. ही वेळ एकजुटीने, एकदिलाने कोरोनाबाधितांच्या पाठीशी उभे ठाकण्याची आहे. राजकीय डाव – प्रतिडाव खेळण्याची ही वेळच नव्हे. सत्ताधारी असोत, विरोधक असोत, राजकारणी असोत, समाजकारणी असोत, प्रसारमाध्यमे असोत वा जनता असो, सर्वांनी मिळून आज गोव्याला ह्या कोरोनाच्या खाईतून बाहेर काढायचे आहे. हा निर्धार दिसून आला तरच आपण हे युद्ध जिंकू!