राज्यात कडक संचारबंदीला सुरूवात

0
58

>> पोलिसांची देखरेख, सामानासाठी गर्दी न करण्याचे आवाहन

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची साखळी मोडून काढण्यासाठी राज्यस्तरीय संचारबंदीला काल रविवारी सकाळी ९ वाजता प्रारंभ झाला. ही संचारबंदी २३ मे २०२१ पर्यंत कायम राहणार आहे. या संचारबंदीच्या काळात नागरिकांनी नाहक घराबाहेर पडू नये म्हणून पोलीस यंत्रणेने प्रयत्न चालविला आहे. या संचारबंदीच्या काळात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहणार आहेत.

राज्यातील बाजारपेठांत रविवारी सकाळी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बाजारपेठेत गर्दीत वाढ होऊ लागल्याने पोलिसांनी राज्यातील काही भागांतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्याची सूचना करावी लागली. संचारबंदीच्या काळात दररोज सकाळच्या सत्रात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सामानाच्या खरेदीसाठी एकाचवेळी गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या संचारबंदीच्या काळात राज्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, आस्थापने, औषधनिर्मिती कंपन्याचे कामकाज सुरू ठेवण्यात आले आहेत. राज्यात संध्याकाळच्या सत्रात फिरण्यास मनाई करण्यात आल्याने रस्त्यावरील वर्दळ थोडी कमी झाली आहे. तरी, मोठ्या प्रमाणात नागरिक कामधंद्यानिमित्त घराबाहेर पडत आहेत. पोलिसांकडून रस्त्यावर ठिकठिकाणी अडथळे निर्माण करून वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहन चालकांकडून समाधानकारक उत्तर मिळाल्याने पुढे जाण्यास परवानगी दिली जात आहे. पोलीस यंत्रणेकडून मार्केटमध्ये गस्त घातली जात आहे. दुकाने वेळेवर बंद करण्यास गस्तीवरील पोलिसांनी दुकान चालकांना भाग पाडले.

पर्यटकांसाठी आजपासून
निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे

राज्यात आज सोमवार दि. १० मेपासून प्रवेश करणार्‍या पर्यटकांना कोविड निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मूळ गोमंतकीय असलेल्यांना, नोकरीसाठी गोव्यात बाहेरून येणार्‍यांना ओळखपत्राची अट लागू करण्यात आली आहे. वैद्यकीय उपचारांसाठी येणार्‍यांना आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. राज्यात कालपासून सुरू झालेल्या कडक संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर ह्या अटी लागू करण्यात आल्या आहेत.