>> गुरूवारी ५८ बळींसह ३८६९ बाधित
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ५८ रुग्णांच्या बळींची नोंद झाली असून कोरोना बळींच्या संख्येने दीड हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या १५०१ एवढी झाली आहे. तसेच, नवे ३८६९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २९ हजार ७५२ झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५१.४६ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत इस्पितळामधून १९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात मागील सहा दिवसांपासून मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. काल गुरूवारी आणखी ५८ कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये ३५ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात १८ रुग्ण, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात २ रुग्ण, धारबांदोडा आणि कासावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १ रुग्ण, ईएसआय इस्पितळात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. इस्पितळात उपचारार्थ दाखल १९ रूग्णांचा चोवीस तासांच्या आत मृत्यू झाला आहे. तर, पाच रूग्णांना मृतावस्थेत इस्पितळात आणण्यात आले होते. कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस घेतलेल्या ५ रूग्णांचा मृतांमध्ये समावेश आहे.
नवे ३८६९ रुग्ण
राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कायम आहे. चोवीस तासांत नवे ३८६९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ७५१८ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आला. राज्यात कोविड स्वॅबबाधित होण्याचे प्रमाण ५१.४६ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ८ हजार २६७ एवढी झाली आहे.
मडगावबरोबर राजधानी पणजीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पणजीतील रुग्णसंख्या दोन हजाराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. कांदोळी, पर्वरी, म्हापसा, फोंडा, कुठ्ठाळी या परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे.
मडगावातील रूग्णसंख्या २२५३ एवढी झाली आहे. पणजीतील रुग्ण संख्या १९७६, कांदोळी भागातील रूग्णसंख्या १५८७, पर्वरी १४५८ रुग्ण, म्हापसा येथे १६२२ रुग्ण, फोंडा १५१६ रुग्ण, कुठ्ठाळी १३०९ रुग्ण, डिचोली १०५७ रुग्ण, कासावली १०८३ रुग्ण, साखळी १३३६ रुग्ण, चिंबल १००७ रुग्ण, शिवोली ११२६ रुग्ण, वास्को येथे ८६१ रुग्ण आहेत.
२०२३ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाबाधित आणखी २०२३ रुग्ण काल बरे झाले आहेत. बर्या झालेल्या रुग्णांची संख्या ७७ हजार ०१४ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०३ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन २९०५ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.