Home बातम्या प्रत्येक तालुक्यात तात्पुरते इस्पितळ उभारणार ः मुख्यमंत्री

प्रत्येक तालुक्यात तात्पुरते इस्पितळ उभारणार ः मुख्यमंत्री

0

>> पहिल्या इस्पितळाचे ताळगावात काम सुरू

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी तालुका पातळीवर तात्पुरते इस्पितळ उभारण्यात येणार आहेत. असे पहिले तात्पुरते इस्पितळ ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये उभारले जात आहे. या ठिकाणी प्राणवायूची गरज नसलेल्या बाधित रुग्णांना ठेवले जाणार आहेत. अशाच प्रकारची आणखी दोन इस्पितळे चिखली आणि कासावली येथे ५ मेपासून सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल एका निवेदनातून दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे आणि सरकारी अधिकार्‍यांसमवेत राज्यातील आरोग्य अधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून काल संवाद साधला. राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी होम आयसोलेशनवर जास्त भर देण्याची गरज आहे. राज्यात कोरोना रूग्णांना मदत करण्यासाठी तालुका पातळीवर स्टेप अप इस्पितळ सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. पेडणे, डिचोली, वाळपई, काणकोण, कुडचडे या तालुक्यात अशा तात्पुरती इस्पितळे उभारली जाऊ शकतात. संबंधित तालुक्यातील उपजिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकार्‍यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अशा प्रकारची इस्पितळे सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची सूचना करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी अशी इस्पितळे चालविण्यासाठी एकत्र येण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. रुग्णांच्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिका किंवा बालरथ, मिनी बसगाड्यांचा वापर केला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.