२४ तासांत ३१०१ बाधित, २४ मृत्यू

0
144

>> बुधवारी विक्रमी ८०१८ स्वॅब चाचण्या

>> आतापर्यंत १११० बळी

राज्यात कोरोना विषाणूचे थैमान सुरूच असून काल बुधवारी कोरोनामुळे २४ जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधित उच्चांकी ३१०१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे सध्याची कोरोनाची रुग्णसंख्या १८,८२९ एवढी झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १११० एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८५ हजारांच्या वर गेली असून ती ८५,००९ एवढी झाली आहे.
काल राज्यात ८३९ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ६५,०७० एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.५४ टक्के इतके खाली घसरले असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

विक्रमी स्वॅब चाचण्या
काल चोवीस तासांत राज्यात एकूण विक्रमी ८०१८ एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच राज्यातील चाचण्या वाढवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार गेल्या काही दिवसांत चार ते पाच हजार स्वॅब चाचण्या केल्या जात आहेत. काल मात्र विक्रमी ८ हजारांच्या वर ह्या चाचण्या करण्यात आल्या. ह्या चाचण्या वाढवण्यात येत असल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णसंख्येतही वाढ होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे राज्यात बर्‍या होणार्‍या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. काल राज्यात ८३९ एवढेजण कोरोनामुक्त झाले आहेत.

काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने १२६७ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर २३९ नवे रुग्ण इस्पितळात विलगीकरणात राहिले आहेत.

३१ जणांचा मृत्यू
काल राज्यात कोरोनामुळे २४ जणांचा मृत्यू झाला. त्यात मडगावच्या जिल्हा इस्पितळात १२ जणांचा तर गोमेकॉमध्ये ११ आणि दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात एकाचा मृत्यू झाला. काल मृत्यू पावलेल्यांमध्ये मडगाव येथील ७४ वर्षीय पुरुष, सांकवाळ येथील ६७ वर्षीय पुरुष, पणजीतील ६२ वर्षीय महिला, केपेतील ७५ वर्षीय महिला, करंझाळेतील ६६ वर्षीय महिला, आकेतील ३५ वर्षीय महिला, बार्देशमधील ७० वर्षीय पुरुष, सांगेतील ६३ वर्षीय पुरुष, थिवीतील ७० वर्षीय पुरुष, पारोड्यातील ७६ वर्षीय पुरुष, कुंकळ्ळीतील ६३ वर्षीय पुरुष, वास्कोतील ५८ वर्षीय पुरुष, म्हापशातील ७२ वर्षीय महिला, सासष्टीतील ६७ वर्षीय पुरुष व ७० वर्षीय महिला, ५३ वर्षीय हरयाणातील पुुरुष, केपेतील ७६ वर्षीय पुरुष, कांदोळीतील ८० वर्षीय महिला, फातोर्ड्यातील ४६ वर्षीय पुरुष, शिवोलीतील ६७ व ६२ वर्षीय दोघेजण, करंबोळीतील ६८ वर्षीय महिला, डिचोलीतील ८१ वर्षीय महिला आणि एका अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे.

मडगावात सर्वाधिक रुग्ण
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या मडगावात असून ती १८२८ एवढी झाली आहे. कांदोळीत त्या खालोखाल म्हणजे १४३६, पर्वरीत १२९१, पणजीत ११६२, कुठ्ठाळीत ११९२ तर फोंड्यात १०९१ एवढे कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

कोरोना संसर्ग झालेल्या १९,२९७ जणांनी राज्यातील इस्पितळात उतर ४३,२२९ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत. आतापर्यंत ६,४०,१४९ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

तसेच परराज्यातून आलेल्या २४ प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.