प्राणवायू वाहतूक रोखू नका ः मोदी

0
139

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वाढती रुग्णसंख्या असलेल्या ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी कोणत्याही राज्याने प्राणवायूची वाहतूक करणार्‍या वाहनांना कुठेही अडवू नये किंवा त्यांना वेठीस धरू नये असे सांगितले. हा पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न चालू असून सध्या औद्योगिक क्षेत्राकडचा प्राणवायू निकड भागवण्यासाठी वळवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच प्राणवायू पुरवठ्यातील प्रवासातला वेळ कमी करण्यासाठी हवाई दलाचीही मदत घेणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
राज्यांनी लसीकरण मोहिमेवर अधिक भर द्यावा असेमोदी म्हणाले. सध्या भारत जगातली सर्वात मोठी लसीकऱण मोहीम राबवत असून भारत सरकारने १५ कोटींहून अधिक लसी राज्यांना मोफत दिल्याचे सांगितले.

जर्मनीहून प्राणवायू प्लांट
देशात प्राणवायूची कमतरता जाणवत असल्याचे पाहून आता जर्मनीहून २३ मोबाईल प्राणवायू प्लांट हवाईमार्गे आणण्यात येणार आहे. यामुळे एका तासात २४ हजार लीटर प्राणवायू उत्पादित केला जाऊ शकतो अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.