हेच ‘काका’ दे गा देवा!

0
378
  • प्राजक्ता प्र. गावकर
    नगरगाव-वाळपई

सर्व कामात काका पुढेच, मग ते काम गावातले असू दे किंवा घरातले! सदा हसतमुख. उदास असे ते क्वचितच असतात. माझ्या मनात नेहमी येते की पुढील जन्मीसुद्धा मला हेच काका मिळावे. भरपूर मनसोक्त हट्ट- लाड करवून घ्यायला! हेच काका दे गा देवा!

मला समजू लागल्यापासून मी पाहतेय, माझ्या माहेरी आईवडलांपाठोपाठ एक प्रेमळ दिलखुलास व्यक्ती म्हणून मला माझ्या काकांचे नाव घ्यावे लागेल.
माझा काका.. एक मायाळू व्यक्तिमत्त्व.. आबालवृद्धांपासून सार्‍यांनाच त्यांचे वेड. गावातील सारी वृद्धवयस्कर मंडळी त्यांना सुरेकांत म्हणून ओळखत. त्यांचे नाव सूर्यकांत. पण ते कुणाचे सुरेकांत, कुणाचे भाई तर कुणाचे घडघड्या. होय घडघड्या असे पण त्यांना नाव पडले. काकांना घडघड्या म्हणायची ती फक्त काकूआई. काकूआई नि त्यांचे यजमान या दाम्पत्याला देवाने मुलबाळ नाही दिले पण उदरात मायेचा झरा होता. म्हणून स्वतःच्या दिराच्या पाचही मुलांना आईच्या वात्सल्याने त्यांनी वाढवले. त्यातल्या त्यात माझ्या काकांवर त्यांचे काकणभर अधिक प्रेम. काकांवर त्यांचा भारी जीव.

मला माझ्या काकांचा खूप लळा. काकांचा वचक होताच पण भीतीयुक्त आदर होता. काकूआई माझ्या काकांना घडघड्या म्हणायची ते बिलकुल आवडत नव्हते. माझे बालमन विचार करी.
शेवटी एक दिवस मनाचा हिय्या करून मी त्यांना विचारलेच, ‘‘माझ्या काकांना तुम्ही घडघड्या का हो म्हणता काकूआई?’’
तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘तुझ्या काकांचे हसणे घडघड्यासारखे म्हणून!’’ मी परत विचारले, ‘‘घडघड्यासारखे हसणे म्हणजे?’’ त्या म्हणाल्या, ‘‘आकाशात पावसाच्या वेळी घडघडा येतो तसेच हसतो सुरेकांत’’.
तेव्हाकुठे मला पटले. कारण काका अगदी तसेच हसतात. गडगडाटी. काकांचे व्यक्तिमत्त्व आहेच तसे. गोरापान गोल चेहरा, उभे कपाळ, काळे-कुरळे केस आणि ओठांवर काळ्याभोर झुपकेदार मिशा. समजा डोक्याला फेटा आणि अंगात सदरा-धोतर घातले की गडी अगदी कोल्हापुरीच वाटावा, असे माझे काका!
आजी आणि माझे बाबा सोडून सारेजण यांना भाईच म्हणायचे. वागण्यात एकदम नम्र. स्वभाव दिलखुलास, सर्वांना आपलेसे करण्याचा. काका शाळा मास्तर होते. आता निवृत्त झाले. शाळेत सर्व मुलांचे लाडके शिक्षक. गावात नाटकात काम करण्याची आवड. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माझे चुलत बंधूही नाटकात काम करतात. मोठी वहिनी ही आईच्या ठिकाणी असते. हे महावचन स्मरणात ठेवून काका माझ्या आईला विशेष करून खूप मान देत.
घरात कोणताही सण-समारंभ असला की काका सर्वांबरोबर करंज्या करायला बसायचे. पुर्‍या तळायला बसायचे. पत्ते खेळायला बसायचे. काकांना बायकोही तशीच लाभली त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणारी… सदाचारी, सद्वर्तनी. काकांचा संसार गोडीगुलाबीने करणारी!
लहान मुलांवर त्यांचा जास्त जीव. सार्‍यांनाच बाय, बाळा असेच हाक मारत. विशेष करून माझ्यावर त्यांचा फार जीव. मला लहानपणी कसलीच भाजी खायला आवडत नसे. मग काय.. जेवायच्या वेळी काकांच्या बाजूला बसायचे आणि काकांना साखरपेरणी करत माझ्या ताटातली भाजी खायला लावायची.

त्या बदल्यात काका दुपारी झोपत त्यावेळी त्यांच्या डोक्यातील पिकलेले केस काढायचे… तेपण संध्याकाळच्या जेवणात भाजी खाणार.. या अटीवर! आमच्यासाठी काका नाना तर्‍हेचे खाऊ आणत. निरनिराळ्या प्रकारचे खेळ आणत. गोष्टींची पुस्तके आणत. खूप लाड करत, तशीच शिस्तही लावत. नको ते हट्ट ते पुरवत नसत. आम्ही आईकडे हट्ट करायचो तेव्हा आई सरळ काकांना हाक मारी. आता काका येणार व आम्हाला चोपणार या भीतिने हट्ट सोडून काका समोरच्या बाजूला बसले आहेत हे पाहूनमागच्या बाजूने धुम पळून जात होतो.
संध्याकाळ झाली की काका मला म्हणत, ‘‘शाणी, देवाचं गाणं म्हण गो’’. आता आमची लग्न झाली. मी गोव्यात व माझी बहीण मुंबईला. काकांनी गोव्यातच घर बांधलं. ते तिथे सहकुटुंब सहपरिवार राहतात. मीही गोव्यातच आहे. पण जाताच येत नाही. काकांची खूप आठवण येते. त्यांनी केलेली माया आठवते. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला खांद्यावर घेऊन काका मैलन् मैल चालत जात असत.

घरातील देवकार्य करायचे झाल्यास काकाच पुढाकार घेत. कोणतेही धडाडीचे काम काकाच करत. कुणालाही मदत करायला ते सदैव तत्पर असत. मला कळायला लागल्यापासून मी काकांना पाहात आलेय. सर्व कामात काका पुढेच, मग ते काम गावातले असू दे किंवा घरातले!
माझे काका एक अजब वल्लीच आहेत. सदा हसतमुख. उदास असे ते क्वचितच असतात. माझ्या मनात नेहमी येते की पुढील जन्मीसुद्धा मला हेच काका मिळावे. भरपूर मनसोक्त हट्ट- लाड करवून घ्यायला! हेच काका दे गा देवा!