गुढी उभारूया .. नवस्वप्नांची

0
111
  • पौर्णिमा केरकर

ते दृश्य पाहून मला माझं बालपण आठवलं. देवळात गुढीपाडव्याचे नाटक बघण्यासाठी आम्ही ही अशीच जागा अडवून झोपी जायचो. पण तीन दशकांपूर्वी. आत्ता तर आधुनिक युग! आताही असं काही अनुभवता येईल असं वाटलंच नव्हतं. पण ती प्रचिती आली. संपूर्ण गाव झाडून रणमालेचा आनंद लुटण्यासाठी आला होता.

जगभरात मानवी समाजाला नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे पूर्वापार आकर्षण असून नवीन स्वप्ने, आकांक्षा, ध्येयाची पूर्तता व्हावी म्हणूनच तर जुन्या वर्षाचा निरोप घेताना नवसंकल्प केले जातात. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रेगोरियन कालगणनेला विशेष प्राधान्य लाभलेले असून ही कालगणना बर्‍याच राष्ट्रांनी स्वीकारलेली असली तरी बदलत्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्याठिकाणी वास्तव्यास असलेल्या लोकमानसाने आपल्या संस्कृतीनुसार कालगणनेचे नियोजन केलेले दिसते. भारतात प्रदेशानुसार तसेच संस्कृतीप्रमाणे विभिन्न कालगणना असली तरीही चांद्र कालगणनेचा स्वीकार बर्‍याच राज्यांनी स्वीकारला आहे. गोव्यात सरकारी पातळीवर ग्रेगोरियन कालगणनेचा स्वीकार केलेला असला तरीही गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आदी राज्यात चांद्र कालगणनेलाच लोकमानसाने पसंती दर्शवलेली आहे. पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टीत वसलेल्या गोव्यात पूर्वापार भारतीय संस्कृतीचे प्राबल्य असून येथील विविध जातीजमातीत चांद्र कालगणनेनुसार पहिल्या दिवसाचा प्रारंभ गुढी उभारून केला जातो. पश्चिम घाटामुळे गोव्यातील जैवविविधतेच्या वैविध्यपूर्ण वैभवाचे दर्शन याच ऋतुराजाच्या आगमनाने अनुभवता येते. निसर्ग शिशीरातल्या पानगळतीला सामोरा जातो आणि निष्पर्ण झालेल्या वृक्षवनस्पती ओक्याबोक्या वाटू लागतात. त्यासाठी महाशिवरात्रीनंतर फाल्गुन या शेवटच्या महिन्यात जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी शिशिरोत्सव साजरा करण्यासाठी मर्दानी लोककलांचे सादरीकरण करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. शाल्मली, पालाश, पांगारा अशा वृक्षांवर लाल भगव्या फुलांचा विलोभनीय आविष्कार घडतो. पानगळतीच्या मौसमात वृक्षांवर नवपालवी दिसते. ही प्रचिती येताच लोकमनाला प्रेरणा मिळाली असावी. चैत्र कालगणनेचा पहिला दिवस गोव्यात ‘संसार पाडवा’ म्हणून साजरा करतात. एकेकाळी खेड्यापाड्यात जंगलाच्या सान्निध्यात स्थिरावलेल्या माणसाला त्याच्या सभोवतालचा निसर्ग सखा म्हणूनच भेटत होता. त्यामुळे मौसमानुसार निसर्गात उद्भवणार्‍या परिवर्तनाला सामोरे जाण्यासाठी विविध सणउत्सवांची सांगड घातली गेली. गुडी पाडव्याचा दिवस सर्वांगाची लाही लाही होणार्‍या ग्रीष्मात येत असला तरी फुलं, फळं, पानांनी बहरणारा निसर्ग सुगंध सु-रसानी आणि हिरव्या तांबूस रंगांनी मानवी मनाला नवोत्सवाची प्रेरणा देतो. हिवाळ्यातील वायंगणी शेतीतील भाताचे दाणे घरात आलेले असले तरी पुढे येऊं घातलेल्या मान्सूनमधील भातशेती लहरी पावसावर अवलंबून असते. भातशेत चांगले व्हावे म्हणून पाऊस महत्त्वाचा असतो. पावसाच्या या मौसमी ढगांवरच शेतकर्‍यांच्या कष्टाचे चीज होणारे असते.

आपला देश आणि प्रदेशसुध्दा दर दिवशी ऋतुपरत्वे कोणत्या ना कोणत्या सणउत्सवात व्यस्त असतो. उत्सव मनाला उत्साहित प्रोत्साहित करतात. जगण्याला ऊर्जा पुरवितात.
ही ऊर्जा आपल्या अवतीभवतीच्या निसर्गाने पुरविलेली असते. फाल्गुन सरत आला की परिसरही कोवळीक धरू लागतो. लाल..भगव्या रंगाची गुढी तर रणरणत्या उन्हात दूर दूर पर्यंत अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे भासते. शाल्मली, पांगारा, पळस, अगस्ती, देवचाफा, फांद्या फुटून अंतरातील भाव अभिव्यक्त करतात. चैत्रात नुकतीच कोठेतरी शाल्मली सावरीला पान गळतीची वेदना सहन करावी लागली होती असे तिच्याकडे पाहून जाणवतच नाही. एवढी ती नवपालवी धारण करते. याच कोवळीकतेत छोटे लाल कळे उमटतात. अजूनही त्यांच्यात परिपूर्ण फुलांची परिपक्वता दिसत नाही. सावर, पळस, पांगारा हे वृक्ष मोठ्या प्रमाणात दिसतात ते उघड्या माळरानावर. डोंगरावर!
फुली फुलून आलेला देवचाफा तर मंदिरापरिसरातच देखणा दिसतो. भक्तीने शुचिर्भूत न्हाऊन निघालेल्या भक्तासारखा सोज्वळ ..सात्विक. त्याला पाहताना निसर्गाने लाल- पिवळ्या पांढर्‍या- पिवळ्या रंगाची गुढीच उभारून नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी केलेली आहे याची अनुभूती होते. हे असे असताना चोर्ला घाटातून जाणार्‍या बेळगावी रस्त्याच्या कडेकुशीला चैत्रोत्सवात कितीतरी शाल्मली वृक्ष उन्हात तळपत आपला राजबिंडा देखणा आविष्कार वाटसरूना घडवीत असतात. घाटातून खाली गोव्यात येण्यासाठी उतरल्यावर केरीत वाकाणावर या जागेत डाव्या बाजूला असलेला शाल्मली वृक्ष येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. मी तर गेली दोन दशके त्याला विविध ऋतूत पाहात आहे. पावसाळ्यात भरगच्च पानांचा संभार लेवून ऐन तारुण्यातील त्याची परिपक्वता पुढे थोडीशी जुन होत जाते न जाते तोच शिशिरोत्सव साजरा करताना पान गळती होऊन अगदी निःस्वार्थ भावाने पुढे होऊ घातलेल्या बदलाला सामोरा जातो.
पान न् पान गळून गेल्यावर ऐन बहरात येतो.. लाल गुंज दाट पाकळ्यांची फुलं घोसाघोसांनी फांद्यावर डवरून येतात. या दिवसात तर तो लेकुरवाळा होतो. कोठून कोठून असंख्य प्रकारचे पक्षी पाखरे थव्या थव्यानी त्याच्याकडे झेपावतात..
तोही तेवढ्याच जिव्हाळ्याने त्यांना अंगाखांद्यावर घेऊन मिरवतो. हळूहळू पोपटी कोवळी कापुसबोण्ड फांद्यांना लटकतात. फुलं अंतर्धान पावतात. आणि पुन्हा नव्याने वय झटकून ही शाल्मली चैत्राच्या स्वागतासाठी कोवळ्या लुसलुशीत पालवीने सजते. कधी तुरळक फुले आणि कोवळी पालवी यांची जाळी, त्या जाळीतून आकाश तुकड्या-तुकड्यांनी दिसते .. वाकाणावरच्या या शाल्मलीच्या जाळीतून एका बाजूला वाघेरी तर दुसर्‍या बाजूला मोरलेगड डोळ्यात साठवता येतो. भर उन्हात ही त्याची कोवळीक मनाला आल्हाददायक
झुळूक प्रदान करते. हे चित्र खूपच अनोखे म्हणूनच अवर्णनीय वाटते. सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळचे अनोखे विभ्रम मनात भरून ठेवताना रखरखीत ऊनसुध्दा कोवळे होत आत आत उतरत जाते ..एकटी सावरच नाही तर पळस, पांगारासुध्दा चैत्रोत्सूक होतात. कोसंम तर अगदी लालेलाल होऊन उठतो. भर जंगलात दुरुनही तो सहज नजरेत भरतो. लाल पांढरा पिवळा देवचाफा पाने गाळून बहरतो. हा बहर वसंताचा तसाच तो चैत्राचाही असतो. निसर्गच जर असा बेहोषीत वावरतो तर मग माणसाला ती धुंदी चढणारच की!

चैत्राच्याच स्वागतासाठी अनेक सणउत्सवांची निर्मिती प्रेरणा लोकमनाला लाभली. सत्तरीतल्या पर्यें गावात धाकटा आणि थोरला असे दोन शिमगोत्सव साजरे होतात. त्यातील थोरल्या शिमग्याची समाप्ती गुढीपाडव्याला होते. यावेळी उपस्थित सुवारी वादनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. चैत्राचे स्वागत करायचे तर मग मंदिरात भजन, कीर्तन, नाटकांची मेजवानी, पूजाअर्चा चालू होते. मराठी महिन्यातील हा पहिला दिवस आपल्या संस्कृतीत जे साडेतीन मुहूर्त महत्त्वाचे मानले गेले आहेत त्यातील गुढी पाडवा हा एक आहे! नवीन वास्तू, व्यवसाय, वगैरेची सुरुवात करण्यासाठी लोक याच मुहूर्ताची वाट पाहात असतात. जीव उष्णतेने हैराण होत असला तरी हा ऋतू मनातळाला ओलावा पुरवितो. सर्जकतेची नवंपालवी ..कोवळीक थंडावा देतो. मल्लिकार्जुन देवाला आदिवासी समाजात आगळेवेगळे महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गावडोंगरी काणकोण येथे होणारी ‘दिंड्या जत्रा’ प्रसिद्ध आहे. लग्न होण्यापूर्वी किंवा लग्नायोग्य झालेले तरुण दिंडे आंकवार असतात. या आकवारपणाचीच ही जत्रा असते. या जत्रेत कुमारिका मुलींना दिवजोत्सवात सहभागी व्हावे लागते तर कुमार मुलगे हातात आम्रपल्लवानी सुशोभित केलेली काठी घेऊन ढोलताशांच्या निनादात अभूतपूर्व नृत्य करतात. पेडणे तालुक्यातील मोपा गावात लाकूड कोरून गिरोबाची मूर्ती घडवली जाते. आदल्या वर्षीची जी होळी असते त्याच लाकडाचा वापर या मूर्तीसाठी केला जातो. मूर्ती कोरण्यासाठी च्यारी समाज आपले कौशल्य पणाला लावतो. उत्सव मोठ्या गर्दीत उत्साहात संपन्न होतो.

अनेक ठिकाणी गुढीपाडव्याला नाटके केली जातात. हौशी रंगभूमीवरील या नाटकांतून पूर्वी तर गावातील, वाड्यावरील लोकमानस सहभागी व्हायचे. आजही ही परंपरा काही ठिकाणी अनुभवता येते. दैनंदिनीच्या कामातून वेळ काढून आंतरिक श्रद्धेने या नाटकांसाठी जागरण करून सराव केला जायचा. सर्व कलाकार जरी वाड्यावरील असले तरीही नटी- महिला कलाकार मात्र खास निमंत्रित करून तिच्या कलाने सरावाची वेळ ठरवावी लागायची. बाकी कलाकार जर एक महिन्यापासून सराव करीत आहेत तर त्या मात्र दोनच दिवस
सरावासाठी सहभागी व्हायच्या. तो संपूर्ण दिवस रंगीत तालमीचा असायचा. बर्‍याच वेळा या महिला कलाकाराची खातीरदारी करताना नाकीनऊ यायचे. परंतु गुढीपाडव्याच्या नाटकाची ओढच एवढी तीव्र की आयोजक तिच्या लहरी सांभाळीत सर्वच मागण्या मान्य करायचे. चैत्र मासाची सुरुवात लोकमन आजही आनंदाने साजरी करतात. निसर्गाच्या सोबतीने घराघरात गुढी उभारली जाते. गोडाधोडाचे जेवण करून तृप्तीचा ढेकर दिला जातो. मंदिरात कीर्तन-भजनात सहभागी होऊन, नाटकाचा आनंदही लुटला जातो. नवीन नवरीसाठी हा संसार पाडवा तर वेगळा ठरतो. लग्नात तिची जी ओटी भरलेली असते ती शिजवून तिचा पायस करून तो वाड्यावरील घरात वाटायची परंपरा होती. गुढीपाडवा हा उत्साहाचा कारण इतर सर्व सण-उत्सवांची ती अभूतपूर्व आनंदाने केलेली सुरुवात असते. साखळीचा पाच दिवस चालणारा चैत्रोत्सव याचे प्रतीक आहे. चैत्राची ही सुरुवात ..
एखादा ऋतू झाडं, निसर्ग अंगाखांद्यावर घेऊन मिरवतात, इथं तर माणसे ऋतूच्या सहवासात आपले आयुष्य काढतात, याची प्रचिती साखळीच्या या प्रसिद्ध चैत्रउत्सवातून अनुभवता येते. विठ्ठलाच्या मंदिरातून धार्मिक विधी तर केले जातातच शिवाय लहान मोठ्यांच्या मनोरंजनासाठी परिसरात भरलेली जत्रा खास असते. गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत वीरभद्राचे तांडव नृत्य था थैया थ थ थैयाच्या गजरात उपस्थित रसिक भक्तगणांना वेगळीच प्रचिती आणून देते. वीरभद्राची वेशभूषा आणि त्याच्या नृत्याच्या सादरीकरणाचे क्षण डोळ्यात हृदयात साठविण्यासाठी लोक तासन् तास बैठक मांडून बसतात. पहाटेला हा सोहळा संपन्न होतो तेव्हा सूर्याच्या कोवळ्या किरणांनी निसर्ग अधिकच विलोभनीय दिसतो. नवीन स्वप्ने, नवे संकल्प, सकारात्मक जीवन जाणिवांनी काही क्षण का असेना तृप्तता भरून येते. संकट समस्या वर मात करून पुन्हा नव्याने जगण्याची तीव्रता जागी होते. केपे तालुक्यातील चन्द्रेश्वर भूतनाथाची जत्रा अशीच चंद्राच्या शीतलतेचा शिडकावा करणारी. पूर्वी लोक हा पर्वत
पायी चढायचे. पायर्‍या चढून मंदिरात पोहोचेपर्यंत आजूबाजूच्या निसर्गातील बदल टिपले जायचे. उंचीवर असलेले मंदिर, सभोवतालचे घनदाट जंगल, निळेशार पाणी, प्राणी पक्षांचे सान्निध्य परिसरालाच देवत्वाची अनुभूती जोडून असायची. या सर्वच वातावरणात भगवान शंकराचा साक्षात्कार भाविकांना व्हायचा. लोक शांततेच्या आनंदाच्या समाधानाच्या ओढीने इथे यायचे. एखादा दुसरा दिवस घालवून आनंदाची गुढी हृदयात घेऊन परतायचे .. सत्तरीतल्या काही गावात, सीमेवर कर्नाटक, महाराष्ट्र राज्यात गुढीपाडवा रणमाले हे लोकनाट्य सादरीकरण करून साजरा करण्याची परंपरा दिसून येते. कर्नाटकात भीमगड अभयारण्यात गवाळी हा गाव येतो. तिथं जायचे तर सोबतीला जंगल आणि हृदयात जंगली प्राण्यांची भीती घेऊनच जावे लागते. परंतु गुढीपाडव्याच्या रात्री उशिरापर्यंत सादर केल्या जाणार्‍या या लोकनाट्याची भुरळच एव्हढी की हा प्रवास करायचाच असेच मनोमन ठरवले होते आणि खरंच.. उत्सव असाही साजरा होतो याची प्रचिती आली. कोठल्याही प्रकारचा कृत्रिम झगझगाट
चकचकाट नाही, एक छोटं देवराईतील मंदिर. सभोवताली सर्व बाजूनी डोंगराचा वेढा. अवतीभवती भात कापून मोकळे झालेले कुणगे वर अथांग निळाई देणारं आकाश. त्यावेळी तर ते तृप्तीच्या चांदण्याची पखरण करीत होते. रणमाले मध्यरात्रीला सुरू होणार होते, मात्र घराघरांतील लहान मुले आणि जाणती माणसे अंगाभोवती चादरी आणि गोधडी लपेटून मंदिराच्या दिशेने चक्क अनवाणी पावलांनी चालत होती. चैत्रात उष्णता असते मग हे लोक अंगभर चादरी लपेटून का बरे असा प्रश्न मनात निर्माण होणार, तर त्याचे उत्तर हेच होते की तो परिसर सर्वच ऋतूत थंडी पांघरून असतो आणि दुसरं म्हणजे आपल्या घरातील सदस्य येतील त्यांना बसण्यासाठी जागा अडवायला कुणग्यानी या चादरी अंथरायाला हव्या होत्या. आईबहिणी घरची कामे आटोपून येणारी होती. तोपर्यंत ही बाळे चादरी अंथरून झोपी जात.

ते दृश्य पाहून मला माझं बालपण आठवलं. देवळात गुढीपाडव्याचे नाटक बघण्यासाठी आम्ही ही अशीच जागा अडवून झोपी जायचो. पण तीन दशकांपूर्वी. आत्ता तर आधुनिक युग! आताही असं काही अनुभवता येईल असं वाटलंच नव्हतं. पण ती प्रचिती आली. संपूर्ण गाव झाडून रणमालेचा आनंद लुटण्यासाठी आला होता. अकृत्रिम असे ते वातावरण आणि तेवढाच अकृत्रिम लोकांचा सहभाग. हे दृश्य दुर्मिळ पण ते आम्ही अनुभवले. मी अनुभवले. पहाटेला जेव्हा रणमाले संपले तेव्हा पूर्वेकडील दिशा लाल पिवळ्या रंगाने माखून गेली होती. मागे काही चांदण्यांची लुकलूक तर चंद्रही फिकट होत सूर्याशी हसत होता ..पक्षांचा किलबिलाट आणि पानांच्या जाळीतून लहरत गेलेली हलकीशी वार्‍याची झुळूक जागरणाचा सारा शीण दूर करून गेली. .. आता चक्क उजाडलं होतं. परिसर तोच होता मात्र नवे संकल्प नवे विचार, नव्या आशा, स्वप्नांची गुढी उभारायाची होती. त्यासाठीचा पुढचा प्रवास सुरु केला.
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!