>> चोवीस तासांत दोघांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ६० हजारांवर
राज्यात चोवीस तासांत नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. चोवीस तासांत नवे ५२७ बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच, काल आणखी दोन रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या २८५८ एवढी झाली आहे. तर कोरोना बळींची एकूण संख्या ८४० झाली आहे. राजधानी पणजीसह पर्वरी, मडगाव, म्हापसा, कांदोळी, वास्को, कुठ्ठाळी, फोंडा या भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्याच्या इतर भागातसुद्धा कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.
एप्रिल महिन्यापासून दर दिवशी मोठ्या संख्येने बाधित रुग्ण आढळून येत असून कोरोना बळींची नोंद होत आहे. चोवीस तासांत आणखी २ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये फोंडा येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्ण आणि कामुर्ली येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्येने ६० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६० हजार २२९ एवढी झाली आहे. कोरोनाबाधित आणखी १३८ रुग्ण बरे झाले आहेत. बर्या झालेल्या रुग्णांची संख्या ५६ हजार ५३१ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.८६ टक्के एवढे आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन २९१ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ५१ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. चोवीस तासांत २६३९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील १९.९६ टक्के नमुने बाधित आढळून आले आहेत.
मडगाव परिसरात सर्वाधिक बाधित रुग्ण असून सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २९५ झाली आहे. पर्वरीत २७३ रुग्ण, पणजीत २४४ रुग्ण, कांदोळीत २३८ रुग्ण, वास्कोत १४६ रुग्ण, म्हापशात १४५ रुग्ण, कुठ्ठाळीत १३६ रुग्ण आणि फोंड्यात २१७ रुग्ण, शिवोली १०२ रुग्ण आहेत.
तसेच, आत्तापर्यंत २१ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत.