आवाहने कसली करता?

0
187


कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेला मास्क लावण्याचे आवाहन स्वतः मास्क न लावता केले. सध्या सर्वत्र दिसून येणारी कोरोनाबाबतची बेफिकिरी अशा नुसत्या उथळ आवाहनांनी संपुष्टात येणार आहे काय? शब्दांमागे जेव्हा तपश्‍चर्या असते, तेव्हाच त्या आवाहनाला किंमत असते. नुसत्या वरवरच्या शाब्दिक आवाहनांनी सध्याची सार्वत्रिक बेफिकिरी संपुष्टात येणे निव्वळ अशक्य आहे. त्यावर मात करण्यासाठी गरज आहे ती सरकारकडून गांभीर्यपूर्वक व्यापक दंडात्मक कारवाईची. त्यासाठी मुळात आधी नेत्यांनी कोरोनाबाबत गंभीर व्हावे लागेल.
राज्यात कोरोना फार मोठ्या प्रमाणात वाढत चालला असला, तरी सरकार जनतेवर कोणतेही निर्बंध घालण्यास उत्सुक दिसत नाही. लॉकडाऊन करणे पुन्हा उभ्या राहू पाहणार्‍या अर्थव्यवस्थेस मारक ठरेल हे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे जरी खरे असले तरी किमान सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, गर्दीचे कार्यक्रम टाळणे, अनावश्यक हिंडण्या-फिरण्यावर निर्बंध आणणे अशा आज अत्यावश्यक गोष्टींच्या आग्रहपूर्वक कार्यवाहीसाठी सरकारने पुढे होणे आणि त्याचे पालन न करणार्‍यांवर प्रत्यक्षात कारवाईसाठी व्यापक पावले उचलणे आवश्यक होते, परंतु येथे सरकार तर आपण लागू केलेले १४४ कलम आगामी पालिका निवडणुकांच्या प्रचाराला वाव मिळावा म्हणून लगोलग हटवून मोकळे झालेे. गर्दीचे प्रमाण कमी व्हावे हे पाहण्याऐवजी वाढीव सार्वजनिक उपस्थितीला तथाकथित तज्ज्ञांच्या समितीने मंजुरी देऊन टाकली आहे. एकीकडे गोवा रेड झोनमध्ये चालला आहे आणि सरकार नेमके उलट्या दिशेने निघालेले दिसते. रात्रीची संचारबंदी लागू केली, जमावबंदी केली, पर्यटकांवर निर्बंध घातले, विनामास्क फिरणार्‍यांविरुद्ध व्यापक मोहीम उघडली, जिथे सामाजिक अंतर पाळले जात नाही अशा आस्थापनांना दंड केला, तर काही बिघडणार आहे काय? परंतु सरकार हे करण्यास धजावत नाही, कारण नेत्यांना सवंग लोकप्रियता हवी आहे. लॉकडाऊन नको असे म्हणता म्हणता आपल्याकडून चाललेल्या बेफिकिरीमुळे उद्या लॉकडाऊन अपरिहार्य ठरेल अशा गंभीर स्थितीकडे आपण वाटचाल करीत आहोत त्याचे काय?
कोरोनावर नियंत्रण आणण्याऐवजी दर दिवसागणिक जनतेला संकटाच्या खाईत लोटले जात असल्याचे आता स्पष्ट दिसू लागले आहे. ‘आम्ही चुकलेलो नाही. देशात कोरोना वाढतो आहे म्हणूनच गोव्यातही वाढतो आहे’, ‘शेजारील राज्यांनी गोमंतकीय प्रवाशांवर निर्बंध घातलेले नाहीत म्हणून आम्ही घातले नाहीत’ असली भंपक विधाने राज्यातील सध्याच्या दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर बनत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल केली. संपूर्ण देशभरात कोरोना वाढलेला नाही. केवळ काही राज्यांमध्ये तो वाढला आहे आणि त्यामागे तेथील जनतेची बेफिकिरी हेच ठळक कारण आहे. किमान जेथे कोरोना वाढला आहे, अशा त्या राज्यांनी जनतेच्या ह्या बेफिकिरीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न तरी चालवले आहेत. रात्रीची संचारबंदी, जमावबंदी, मास्क न घालणार्‍यांविरुद्ध व्यापक मोहीम, जेथे ग्राहक सार्वजनिक अंतराचे पालन करीत नसतील त्या आस्थापनांवर कारवाई, कोरोनाच्या हॉटस्पॉटस्‌मधून येणार्‍या प्रवाशांना कोविड नसल्याच्या दाखल्याची सक्ती अशा प्रकारच्या उपाययोजना तेथे गांभीर्याने केल्या जात आहेत. गोवा सरकारला मात्र यापैकी कशाशीही सोयरसुतक दिसत नाही ही गलथानपणाची कमाल आहे. येथे पर्यटनाला चालना देण्याच्या नावाखाली जे चालले आहे ते दिवसेंदिवस स्थानिक नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडू लागले आहे.
कोरोनाने गोव्यात आजवर आठशेहून अधिक निरपराध नागरिकांचा जीव घेतला. सरकारला आणखी किती नरबळी गेलेले हवे आहेत? बदलती परिस्थिती लक्षात घेता कमीत कमी सरकारचा जो काही तथाकथित एस.ओ.पी. आहे, त्याची राज्यभरामध्ये अत्यंत कसोशीने आणि गांभीर्याने अंमलबजावणी होईल हे पाहण्याचे काम तरी किमान प्रशासनाने करणे अत्यावश्यक होतेे, परंतु विनामास्क फिरणार्‍यांना क्वचित केला जाणारा दंड वगळल्यास कोठेही अशा प्रकारची कठोर कार्यवाही होत असल्याचे अजिबात दिसत नाही. सरकारपाशी मुळात एसओपीच्या कार्यवाहीचे गांभीर्यच नाही. नेते स्वतः लस घेऊन मोकळे झाले आहेत आणि जनतेला वार्‍यावर सोडले आहे. सर्व सत्ताधारी नेते विनामास्क वावरत आहेत, गर्दीत मिसळत आहेत, गर्दी गोळा करीत आहेत. जनतेला केलेल्या नुसत्या आवाहनांवर वेळ मारून नेऊ पाहणार्‍या असल्या बोलबच्चन नेत्यांच्या हाती असलेल्या ह्या बेफिकिर सरकारमुळे गोव्यात पुन्हा एकदा कोरोनाचे मृत्यूकांड सुरू होण्याची आणि संपूर्ण लॉकडाऊन ओढवून घेणारी परिस्थिती निर्माण होण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. इथे दिवसाला पाचशे रुग्ण सापडू लागले आहेत आणि तुम्ही नुसती आवाहने कसली करता आहात?