एसओपीचे पालन न केल्यास कडक कारवाई ः मुख्यमंत्री

0
179

कोरोना रोखण्यासाठी कोविड मार्गदर्शक सूचनांची (एसओपीची) कडक अंमलबजावणी आवश्यक असून एसओपीचे पालन न करणार्‍यावर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यातील वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतो. लॉकडाऊन करून नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होणार नाही. लॉकडाऊन करून राज्यातील अर्थव्यवस्था पुन्हा एकदा विस्कळीत करायची नाही. रात्रीच्या वेळी संचारबंदी तसेच, राज्यात प्रवेशावर निर्बंध घालण्याचा विचार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊनच्या वेळी मजुरांना ठेवण्यासाठी आणि त्यांना परत गावी पाठविण्यासाठी खास व्यवस्था करावी लागली होती.

केवळ गोव्यात नव्हे तर, देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्य सरकारकडून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. राज्यात कोविड एसओपी पालनावर जास्त भर दिला जाणार आहे.
४५ वर्षांवरील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. मास्क, सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे. मार्गदर्शक सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

गोमेकॉत ओपीडीसाठी फोनद्वारे
आगाऊ नोंदणी करा ः विश्‍वजीत

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर गोमेकॉच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी फोनवरून आगाऊ नोंदणी करावी लागेल अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. आरोग्यमंत्री राणे यांनी कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर गोमेकॉ इस्पितळाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेतली. ओपीडीमध्ये एका ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून रुग्णांच्या सोयीसाठी खास मंडप उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोमेकॉमध्ये कोविड एसओपीचे कडक पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली.