>> आचारसंहिता लागू, २६ रोजी मतमोजणी, निवडणूक आयुक्तांची माहिती
राज्यातील मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे आणि केपे या पाच नगरपालिकांसाठी येत्या दि. २३ एप्रिल २०२१ रोजी निवडणूक घेतली जाणार असून २६ एप्रिल रोजी मतमोजणी केली जाणार आहे. तसेच, याच दिवशी दोन ग्रामपंचायतींच्या दोन प्रभागांसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. राज्यात निवडणूक होणार्या नगरपालिका व पंचायत क्षेत्रात आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे, अशी माहिती निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाने पाच नगरपालिका क्षेत्रातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
आरक्षणाच्या घोळामुळे या पाच पालिकांतील निवडणूक प्रक्रिया रद्द करावी लागली होती. सर्वोच्च न्यायालयाने या पाच नगरपालिकांतील निवडणूक प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. बुधवार दि. ३१ मार्च ते ८ एप्रिल २०२१ पर्यत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २ एप्रिल आणि ४ एप्रिल रोजी सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ९ एप्रिल २०२१ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. १० एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. याच दिवशी अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. २३ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत मतदान घेतले जाणार आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. कोविड महामारीमध्ये निवडणूक होत असल्याने कोविड एसओपी जाहीर करण्यात आली आहे.
कोविडबाधित रुग्ण संध्याकाळी ४ ते ५ यावेळेत मतदान करू शकतात, असे राज्य निवडणूक आयुक्त मूर्ती यांनी सांगितले. पाच पालिका क्षेत्रांत एकूण १ लाख ८५ हजार २२५ मतदार आहेत. म्हापसा पालिकेत २० प्रभाग, मुरगाव पालिकेत २५, मडगाव २५, केपे १३ प्रभाग आणि सांगे पालिकेत १० प्रभाग आहेत. मतदान मतपत्रिकेच्या माध्यमातून घेतले जाणार आहे. उमेदवारांसाठी खर्च मर्यादा २ लाख रुपये आहे. मुरगाव पालिकेत १८ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी १७९० अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही निवडणूक आयुक्त रमणमूर्ती यांनी सांगितले.
पंचायत प्रभाग पोटनिवडणूक
डिचोली तालुक्यातील कारापूर सर्वण पंचायतीच्या प्रभाग २ आणि सासष्टी तालुक्यातील वेळ्ळी पंचायतीच्या प्रभाग ४ साठी पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे, असेही रमणमूर्ती यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आयोगाचे सचिव मेल्वीन वाझ, खास अधिकारी डॉ. दुर्गाप्रसाद, आशुतोष आपटे, सागर गुरव उपस्थित होते.