अधिवेशन चार दिवसांत गुंडाळले

0
74

राज्यातील निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमीवर गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या १९ जुलै २०२१ रोजी सकाळी ११.३० पर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा सभापती राजेश पाटणेकर यांनी काल केली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २४ मार्चला प्रारंभ करण्यात आला होता. केवळ चार दिवसांत अधिवेशन गुंडाळण्यात आले आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला.

राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार ३० मार्चला राज्यातील पाच नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता लागू केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येत्या ३० एप्रिलपर्यंत नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत निवडणूक आचारसंहितेच्या काळात अधिवेशन घेणे योग्य नसल्याचे एकमत झाले. त्यामुळे पाच महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून घेऊन विधानसभा अधिवेशन तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आमदारांनी केली कोविड चाचणी
आमदार बाबूश मोन्सेरात कोविडबाधित झाल्याने अधिवेशनावर अनिश्‍चिततेचे सावट पसरले होते. विधानसभा सचिवालयाने सर्व आमदार, मंत्र्यांना कोविड चाचणी करून घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार चाचणी केली असता आणखी कुणालाही कोरोनाची बाधा झालेली नाही.

आमच्या मागणीकडे दुर्लक्ष ः कामत
विरोधी पक्षाच्या आमदारांनी १७ मार्च २०२१ रोजी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पाच नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चार महिन्यांसाठी लेखानुदान घेऊन अधिवेशन स्थगित करण्याची मागणी केली होती. नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पण, सरकारने त्या दिवशी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. आता, आचारसंहिता लागू झाल्यानंतर विरोधी आमदारांचा प्रस्ताव सरकारने स्वीकारल्याचे कामत यांनी सांगितले.

पारंपरिक शिमगोत्सवासाठी १४४
कलम लागू नाही : मुख्यमंत्री

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने राज्यात १४४ कलम लागू केलेले असले तरी गावागावात पारंपरिक शिमगोत्सव, धार्मिक उत्सव, पूजा-अर्चा आदींचे आयोजन करणार्‍यांना हे कलम लागू होणार नसल्याचा खुलासा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शून्य प्रहराला विधानसभेत केला.

काल शून्य तासाला आमदार दयानंद सोपटे यांनी सरकारने राज्यात १४४ कलम लागू केलेले असल्याने गावागावात पारंपरिक शिमगोत्सव व धार्मिक उत्सवांचे आयोजन करणार्‍या लोकांना ह्या कलमाचा त्रास होण्याची भीती व्यक्त केली होती. त्याविषयी खुलासा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे १४४ कलम गावागावातील पारंपरिक शिगमोत्सव तसेच दरवर्षी केल्या जाणार्‍या धार्मिक उत्सवांना लागू होणार नाही. त्यामुळे कुणीही काळजी करण्याचे कारण नाही. लोकांना आपला पारंपरिक शिमगोत्सव व धार्मिक उत्सव आनंदाने साजरे करावेत, असेही स्पष्ट केले.