मडगावातील एका हॉटेलात सापडले कोरोनाचे ११ रुग्ण

0
156

>> हॉटेल बंदचा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

गेल्या पाच दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. काल मडगाव कदंबा बसस्थानकाजवळील एका हॉटेलात कोरोनाचे ११ रुग्ण सापडले. सर्वजण त्या हॉटेलाचे कर्मचारी असून त्यात तीन वेटर, स्वयंपाकी तसेच व्यवस्थापकाचा समावेश आहे. मोठ्या संख्येने रुग्ण सापडल्याचे समजताच जिल्हाधिकार्‍यांनी सदर हॉटेल बंद करण्याचा आदेश दिला आहे.

सदर हॉटेल कदंबा स्थानकाजवळ असून बसमधून ये-जा करणारे प्रवासी, जिल्हाधिकारी कार्यालयात जाणारे व एसपीडीए बाजारात जाणारे लोक या हॉटेलात जास्त असतात. त्यामुळे मडगाव शहरात जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हा इस्पितळातील सर्व खाटा भरल्या आहेत. पण डॉक्टर व कर्मचारी बाधितांवर योग्य उपचार करत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

सरकारने विशेषत: आरोग्य खात्याने रेल्वे स्टेशन, बस स्थानकावर परप्रांतातून येणार्‍या पर्यटकांची चाचणी करावी व मगच तेथून राज्यात फिरण्यास प्रवेश द्यावा तसेच गोव्याच्या सीमेवर चाचण्या कराव्यात अशी मागणी होत आहे.

मडगाव पोलिसांनी काल शहरात कोरोनासंबंधी लोकांनी घ्यावयाची काळजीसंबंधी जागृती केली. तसेच मायणा-कुडतरी पोलीस, कोलवा पोलिसांनी जागृती मोहीम हाती घेतली. तसेच वीनामास्क वाहनांवरून व शहरात फिरणार्‍या लोकांकडून दंड वसूल केला. गांधी मार्केट, मासळी बाजार व समुद्रकिनार्‍यावर बहुतांश लोक मास्क घालत नसताना खरेदीसाठी गेलेले पहायला मिळाले. आरोग्य खात्यानुसार काल मडगावात १६१, वास्कोत २०, बाळ्ळी २०, कांसावली ६३, चिंचोणे ३६, कुठ्ठाळी ७२, लोटली २० व फोंडा येथे १११ बाधितांची संख्या होती.

दिगंबर, विजय,
चर्चिल निगेटिव्ह

काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई, चर्चिल आलेमाव यांनी चाचणी करून घेतली. त्याचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले. पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांना कोरोना झाल्याने सर्व मंत्री, आमदारांना कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. सध्या विधानसभा अधिवेशन सुरू असल्याने खबरदारी म्हणून सगळ्या आमदारांना चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.