कोरोनाच्या धास्तीतही विधानसभा अधिवेशन

0
155

कोरोनाचा वाढता उद्रेक व पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांना झालेला कोरोनाचा संसर्ग या पार्श्‍वभूमीवर आज मंगळवारी गोवा विधानसभेचे अधिवेशन होणार की नाही याविषयी शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सभापती राजेश पाटणेकर यांनी आज ठरल्याप्रमाणे अधिवेशन होणार असल्याचे सोमवारी स्पष्ट केले.

सभापतींनी बाबुश मोन्सेर्रात यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्व आमदारांना कोरोना चाचणी करण्याची सूचना केली होती. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथील सामाजिक आरोग्य केंद्रात कोरोनासाठीची चाचणी करून घेतली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सावंत हे यापूर्वी कोरोनाबाधित झाले होते.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचाही अहवाल निगेटिव्ह आला असून तशी माहिती त्यांनी स्वत: प्रसारमाध्यमांना दिली आहे. आमदार दयानंद सोपटे, विनोद पालयेकर, रोहन खंवटे, विजय सरदेसाई, जयेश साळगावकर, मंत्री गोविंद गावडे आदींचेही अहवाल निगेटिव्ह आले असून बाबुश मोन्सेर्रात यांच्या पाठोपाठ अन्य एकाही आमदाराला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अद्याप वृत्त नाही. त्यामुळे सभापती राजेश पाटणेकर यांनी आज गोवा विधानसभेचे अधिवेशन ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.