पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे

0
220

>> पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

>> महाराष्ट्रात रुग्णसंख्येत वाढ, केंद्र सरकारकडून दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुरूवारी, पात्र नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन केले. यावेळी त्यांनी, त्यांच्या आई हिराबेन मोदी यांना कोविड -१९ लसीचा पहिला डोस मिळाला असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली. महाराष्ट्रात रुग्णसंख्येत वाढ होत असून नागपुरात काल तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.

माझ्या आईने आज कोविड -१९ लसीचा पहिला डोस घेतला हे ऐकून मला आनंद झाला आहे. लस घेण्यास पात्र असलेल्या आपल्या सभोवतालच्या लोकांना मदत करण्यास व प्रेरणा देण्यास मी सर्वांना उद्युक्त करतो, असे पंतप्रधानांनी ट्विट केले.

ज्येष्ठ नागरिक (६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील) आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ज्यांना सहव्याधी आहेत अशांना दुसर्‍या टप्प्यात लस देण्यात येणार होती. दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला आहे. दुसर्‍या टप्प्यात १ मार्च रोजी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे सकाळी पंतप्रधान मोदी यांना कोविड -१९ लसीचा प्रथम डोस देण्यात आला. पंतप्रधानांनी घेतलेला कोवॅक्सिनचा डोस भारत बायोटेकने स्वदेशी विकसित केला आहे.