जखमी वाघीण

0
246

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यातील सत्य बाहेर येईल तेव्हा येईल, परंतु तुर्त त्या राज्यातील राजकीय हवा त्या घटनेने निश्‍चित तापली आहे. ममता जखमी झाल्या आहेत, त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे यात काही वाद नाही, परंतु हा खरोखर त्या म्हणतात तसा राजकीय स्वरूपाचा हल्ला होता की जे घडले ते अपघाताने घडले हे निष्पक्ष चौकशीतूनच स्पष्ट होऊ शकेल. परंतु ममता यांच्यासारख्या झेड प्लस सुरक्षा असलेल्या राजकीय नेत्याच्या एवढे जवळ ही दार ढकलणारी माणसे कशी पोहोचू शकली हा मोठा प्रश्न आहे.
वास्तविक झेड प्लस सुरक्षा असलेल्या नेत्यासमवेत त्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी अधीक्षक दर्जाचा पोलीस अधिकारी जातीने उपस्थित असणे आवश्यक असते, परंतु जेथे हा प्रकार घडला तेथे पोलिसांची उपस्थिती का नव्हती हा यातील महत्त्वाचा मुद्दा ठरतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः ममता यांचे अंगरक्षक यावेळी त्यांच्यासोबत होते. घटना घडल्यानंतर त्यांनी त्यांना उचलून गाडीच्या मागच्या सीटवर ठेवले. मग जेव्हा हल्ला झाला तेव्हा ते कथित हल्लेखोरांना वा जमावाला का रोखू शकले नाहीत? जे घडले त्याचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कसे नव्हते? वेळ संध्याकाळची होती. भोवताली बरीच गर्दी होती, त्यामुळे स्थानिकांना काय झाले हे नीट दिसलेले नसू शकते व ज्यांनी पाहिले तेही पश्‍चिम बंगालचे राजकीय भवितव्य अनिश्‍चित दिसत असल्याने आपण काही पाहिलेच नाही असे सांगून स्वस्थ बसण्याचीच शक्यता अधिक आहे.
ममता यांच्यावर हल्ला होण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. खूप पूर्वी नव्वद साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या एका युवा कार्यकर्त्याने त्यांच्या डोक्यावर लाठी मारल्याने त्यांचे डोके फुटले होते. महिनाभर त्या तेव्हा इस्पितळात होत्या. यावेळी आपली आणि आपल्या पक्षाची अस्तित्वाची लढाई त्या लढत असल्याने सध्या विश्रांती घेणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे लवकरच त्या व्हीलचेअरवरून आपल्या पूर्वनियोजित सभांना उपस्थिती लावतील असे दिसते. त्यांच्या ह्या अशा प्रकारे जखमी होण्याने मतदारांची त्यांना कितपत सहानुभूती मिळते हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पश्‍चिम बंगाल दौर्‍यावेळी त्यांच्या ताफ्यावरही असाच कथित हल्ला झाला होता. पश्‍चिम बंगालमधील राजकीय संघर्ष अशा प्रकारच्या रक्तरंजित घटनांनी डागाळला जाऊ नये हे पाहण्याची जबाबदारी आता निवडणूक आयोगावर आहे.
ममता बॅनर्जी यांच्यापुढे भारतीय जनता पक्षाने यावेळी अत्यंत कडवे आव्हान उभे केलेले आहे. त्यांच्याच मंत्रिमंडळातले एकेकाळचे सहकारी सुवेंदु अधिकारी यांनाच त्यांच्या विरोधात उतरवले आहे. आपला पारंपरिक मतदारसंघ सोडून ममता यावेळी नंदीग्राममधून युद्धात उतरल्या आहेत. नंदीग्राममध्ये त्यांनी येण्याला विशेष महत्त्व आहे, कारण काही वर्षांपूर्वी याच नंदीग्राममधील जनतेच्या राज्य सरकारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करीत त्यांनी पश्‍चिम बंगालमधील डाव्यांची राजवट उलथवून टाकली होती. ह्यावेळी तर त्यांचा सामना भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रीय पातळीवर सर्वशक्तिमान बनलेल्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या पक्षाशी आणि त्याच्या केंद्रातील सरकारशी आहे. पश्‍चिम बंगाल तृणमूलच्या हातून हिसकावून घेण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावलेली आहे. ही निवडणूक भाजपसाठीही प्रतिष्ठेची बनलेली आहे, कारण आजवर पक्षाचा सुसाट वारू पश्‍चिम बंगालमध्ये ममता रोखत आल्या होत्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली, त्यामुळे ह्यावेळी पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. डावे तर नेस्तनाबूत झालेले आहेत. कॉंग्रेस धराशाही आहे. अशावेळी ममतांना सत्तेवरून खाली उतरवून राज्य काबीज करू पाहणार्‍या भाजपला आता ही जखमी वाघीण रोखू शकेल?