आरक्षण स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

0
155

>> गोवा सरकारची याचिका, मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एका ऐतिहासिक निवाड्याद्वारे राज्यातील अकरापैकी पाच नगरपालिका क्षेत्रासाठीची जी आरक्षण अधिसूचना रद्दबातल ठरवली आहे. त्याला काल गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली.

लोकशाही मार्गाने नगरपालिका निवडणूका विनाविलंब व्हाव्यात अशी आमची इच्छा असून त्यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पुढे काय होते ते पाहुया अशी पुस्तीही त्यांनी जोडली. या निवडणुकीसाठीच प्रक्रिया चालू असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील ११ नगरपालिकांसाठीचे आरक्षण व प्रभाग फेररचनेचे काम कायद्यानुसार झाले नसल्याचा दावा करीत विरोधकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने आपल्या सुनावणीनंतर राखून ठेवलेला निवाडा सोमवारी देताना अकरापैकी पाच नगरपालिका क्षेत्रातील आरक्षण अधिसूचना रद्दबातल ठरवली होती.
खंडपीठाच्या या निवाड्याला गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.

पालिका निवडणुकीसाठी मंगळवारी १३२ जणांचे अर्ज

सहा पालिकांसाठी आतापर्यंत १६७ जणांचे अर्ज

सहा नगरपालिकांमध्ये हाणार असलेल्या निवडणुकांसाठी काल १३२ अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. त्यापैकी ५८ अर्ज हे उत्तर गोव्यातील डिचोली, वाळपई व पेडणे या नगरपालिकांसाठी तर ७४ अर्ज हे दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा व काणकोण या नगरपालिकांसाठी असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

काल स्वीकारण्यात आलेल्या अर्जांमध्ये डिचोली नगरपालिका निवडणुकीसाठीचे १७, वाळपई नगरपालिकेसाठीचे १३ व पेडणे नगरपालिकेसाठीच्या २८ अर्जांचा समावेश आहे. या उत्तर गोव्यातील नगरपालिका असून दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी नगरपालिकेसाठी ४१, कुडचडे-काकोडा नगरपालिकेसाठी २० तर काणकोण नगरपालिकेसाठी १३ अर्जांचा समावेश आहे.

वरील सहा पालिकांसाठी आतापर्यंत स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या १६७ एवढी असून त्यापैकी ६९ अर्ज हे उत्तर गोव्यातील डिचोली, वाळपइ व पेडणे या पालिकांसाठीचे आहे. तर ९८ हे दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा व काणकोण या नगरपालिकांसाठीचे आहेत.
डिचोली पालिकेसाठी आतापर्यंत २४ अर्ज स्वीकारण्यात आले असून, वाळपईसाठी १७, पेडणे २८, कुंकळ्ळी ५८, कुडचडे-काकोडासाठी २३ तर काणकोण पालिकेसाठी १७ अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत.

साखळीत तीन अर्ज
दरम्यान, साखळी नगरपालिकेच्या प्रभाग ९ मधील पोटनिवडणुकीसाठी काल ३ अर्ज स्वीकारण्यात आले. गेल्या ४ दिवसांत या पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज आला नव्हता. काल पाचव्या दिवशी ३ अर्ज आल्याने आतापर्यंत आलेल्या अर्जांची संख्या ३ एवढी झाली आहे.
ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी काल मेरशी पंचायत क्षेत्रात-५, मावशी-१, हरमल-२, कोरगाव-१ मोरजी-२, नावेली-१, वेलिंग-प्रियोळ-कुंकळ्ये-१, चिखली-१.
उत्तर गोव्यातील पंचायतींसाठी एकूण १७ तर दक्षिण गोव्यातील पंचायतींसाठी ६ अर्ज स्वीकारण्यात आले. दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या यावेळी येथील पोटनिवडणुकीसाठी काल एक अर्ज स्वीकारण्यात आला.

पणजी मनपासाठी एकूण ३८ अर्ज
पणजी महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठीच्या कालच्या पाचव्या दिवशी एकूण ३७ अर्ज स्वीकारण्यात आले. सोमवारी १ अर्ज स्वीकारण्यात आला होता. त्यामुळे आतापर्यंत पणजी महापालिका निवडणुकीसाठी स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या ३८ एवढी झाली आहे. भाजप पॅनलमधील सर्व ३० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

दरम्यान, विष्णू नाईक या उमेदवाराने प्रभाग १० मधून भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात आपला अर्ज भरला आहे. नाईक हे अर्ज भरण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्यासोबत पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर व दत्तप्रसाद नाईक हे होते.

पणजीतील ३० ही
जागा जिंकू : बाबुश
पणजी महापालिका निवडणुकीत भाजपच्या पॅनलला ३० पैकी ३० जागा मिळतील असा विश्‍वास काल भाजपचे पणजीतील आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
काल भाजपच्या काही उमेदवारांनी निवडणूक अर्ज भरल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनधिकृतरित्या पत्रकारांशी बोलताना मोन्सेर्रात यांनी वरील विश्‍वास व्यक्त केला.
तुमच्या पॅनलला काही जण बाबुश भाजप पॅनल असे म्हणतात असे त्यांच्या नजरेत आणून दिले असता आपण भाजपचा आमदार असून पॅनलही भाजपचेच आहे. त्याला बाबुश भाजप पॅनल म्हणणे योग्य नसल्याचे मोन्सेर्रात यांनी स्पष्ट केले.

हे पॅनल पणजीच्या विकासासाठीचे पॅनल आहे. पणजी महापालिकेवर आपले पॅनल सलग तीन वेळा निवडून आलेले आहे. मात्र, त्यावेळी आपण पणजी मतदारसंघाचा आमदार नव्हतो. त्यामुळे पणजीत विकासकामे करण्यास अडचण येत होती. आता आपण पणजीचा आमदार असून त्यामुळे विकासकामे करणे सोपे होणार असल्याचे ते म्हणाले.
यंदा आपण तरूण व नव्या दमाच्या उमेदवरांना संधी दिली असल्याचे सांगून कुणावरही अन्याय केला नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वी कित्येक वेळा पणजी महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आलेले काही जण पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आली नसल्याचे सांगून या लोकांना पुन्हा पुन्हा नगरसेवक का व्हायचे आहे ते कळत नसल्याचे मोन्सेर्रात म्हणाले.