- पल्लवी दि. भांडणकर
प्रजेचा विश्वास जिंकून मावळ्यांना एकत्र आणणारे राजे आज आपल्या देशाला हवे आहेत. मग बाजीप्रभूसारखे सैनिक तयार व्हायला वेळ लागणार नाही. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी मातृभूमीशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया.
आई-बाबांना देवाप्रमाणे मानणारा, मावळ्यांना सगेसोयरे मानणारा, अत्याचारावर सिंहगर्जना करून अत्याचार दूर करणारा, हिंदुत्वाची रक्षा करून स्वराज्य स्थापन करणारा स्वराज्यरक्षक राजा… राजा शिवछत्रपती १९ फेब्रुवारी १६३० साली भूतलावर अवतरला. तो दिवस विदर्भ देशातल्या कोपरान् कोपर्यात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. शिवनेरी डोंगराच्या पायथ्याशी बाळ शिवाजी माता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या कुळात जन्मले. शिवाजीराजे म्हटलं की आठवतात ती अफजलखानाला फाडून टाकणारी वाघनखे, कडक बंदोबस्त असूनसुद्धा आग्र्याहून त्यांनी स्वतःची केलेली सुटका. पावन खिंडीत आपल्या प्राणांची पर्वा न करता आपला राजा गडावर पोचेपर्यंत लढत राहणारा त्यांचा शूर वीर योद्धा बाजी प्रभू. अशा असंख्य मावळ्यांना एकत्र आणून मोगलांना तोंडघशी पाडणारा जाणता राजा शिवाजी राजा. कुशल रणनीती आणि अंगी छत्तीस हत्तींचे बळ घेऊन अवतरला राजा शिवछत्रपती. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊनच शिवाजीमहाराजांनी मराठी माणसांचा मराठीपणा टिकवला. मोगलांना त्यांची खरी जागा दाखवली व त्यांच्याविरुद्ध लढा देताना कुठेही आपली शुद्ध नीती न सोडता आपला मान राखला.
अशा तत्ववादी आणि नीती शुद्ध नेत्यांची आज आपल्या देशाला फार गरज आहे. एकेकाळी आपले शिवाजीराजे परकीयांकडे आपल्यासाठी लढले. आपले असंख्य मावळे गमावले. पण आज आपण त्याच मराठमोळ्या मातीत स्वतःच्याच माणसांशी पैसा आणि सत्ता मिळवण्यासाठी लढत आहोत… ही तर खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रजेचा विश्वास जिंकून मावळ्यांना एकत्र आणणारे राजे आज आपल्या देशाला हवे आहेत. मग बाजीप्रभूसारखे सैनिक तयार व्हायला वेळ लागणार नाही. आज शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी मातृभूमीशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करून शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया.