‘माझी रक्षा सिंधूत टाका…’

0
263
  • प्रा. रमेश सप्रे

त्यांना स्पष्ट दिसत होतं एक काळ असा उगवेल ज्यावेळी संपूर्ण सिंधू नदी- जिच्या काठावर आपली सिंधु संस्कृती बहरली ती सिंधु सरिता भारतातून वाहू लागेल. त्या दिवशी विसर्जन करा माझ्या रक्षेचं सिंधू नदीत. तिच्यातून सिंधुसागरात (अरबी समुद्र) ती रक्षा मिसळून भारताचा संपूर्ण किनारा धूत राहील. भारतभूमीवर – स्वतंत्रते भगवतीवर – आपल्या लाटांनी अभिषेक करत राहील.

….. हे तेजस्वी उद्गार काढणारी नि मनस्वी आकांक्षा असलेली व्यक्ती कोण?…याला तरुण पिढीकडून कदाचित उत्तर मिळणार नाही. पण ज्येष्ठ नागरिकांची स्मृती चाळवली जाईल नि उत्तर येईल, ‘अर्थातच… स्वातंत्र्यवीर सावरकर… विनायक दामोदर सावरकर!’
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे शब्द कानाला अनुप्रासासारखे प्रभावी नि यमकासारखे मधुर वाटतात. इतके की दुसर्‍या कोणत्याही नावापुढे ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी शोभूनच दिसणार नाही.
कलियुगाबद्दल असं म्हटलं जातं – ‘कलौ चंडीविनायकौ|’ म्हणजे कलियुगात समाजासमोर दोनच दैवचं हवीत. विनायक म्हणजे विशेष रीतीनं नायकत्व – नेतृत्व करणारा जनगणमन अधिनायक गणेश! नि समाजक्रांतीसाठी उग्र रौद्र शक्ती चंडी… रणदेवता चंडी!

स्वा. सावरकरांच्या जीवनात – कार्यात – वाङ्‌मयात – एकूण व्यक्तिमत्त्वात या दोन्ही अशा दैवतांचा संगम आढळतो. त्यांना त्यांचं ‘विनायक’ नाव खरोखर शोभून दिसतं. २८ मे १८८३ रोजी जन्म आणि २६ फेब्रुवारी १९६६ साली मृत्यू! पण एकाच जन्मात अनेक जन्ममरणं अनुभवलेले स्वा. सावरकर नुसते मृत्युंजय बनले नाहीत तर अखेरीस मृत्यूला छातीनं सामोरं जाऊन कवटाळलं तेही प्रायोपवेशन करून!
विद्यार्थी दशेत कुशाग्र बुद्धिमत्ता, तर्कशुद्ध विवेकशक्ती यांचा अनोखा त्रिवेणी संगम साधणारी प्रतिभा किंवा सर्जनशीलता यामुळे विनायक हा अद्भुत शक्ती असलेला बालक (गिफ्टेड चाइल्ड) म्हणून ओळखला गेला. याचं उदाहरण म्हणजे त्याच्या अरुणावस्थेतील, संवेदनशील मनोवस्थेतील काव्यरचना – स्वतंत्रतेचा फटका (पोवाड्यासारखी आवेशयुक्त रचना) आणि कळस म्हणजे ‘स्वतंत्रतेचं स्तोत्र’.- हे जणू त्यांच्या भावी जीवनाचं प्राणसूत्र बनलं. ओघात आलं म्हणून सांगितलं पाहिजे की अंदमानच्या काळकोठडीत प्रसवलेलं ‘कमला’ हे दीर्घकाव्य आणि ‘सागरा प्राण तळमळला’सारखी भावकविता!
स्वा. सावरकरांचा हा प्रतिभापैलू आधी वर्णन केला कारण धगधगणार्‍या सूर्याच्या तेजाचंच रुपांतर चंद्राच्या शीतल स्पर्शात होतं याचा अनेकदा अनेकांना विसर पडतो.

विवाह करून सहधर्मचारिणीला स्पष्ट सांगणारे, ‘कावळेचिमण्यांसारखा काटक्याकुटक्या जमवून घरटं बांधून स्वतःचा संसार करणारा मी नाही.’ समर्थ रामदास राष्ट्रप्रपंच करण्यासाठी लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेले तशाच कृतीचं प्रतिबिंब सावरकरांच्या या उद्गारात दिसून येतं.
लहानपणापासूनच देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचं वेड त्यांच्या डोक्यात थैमान घालत होतं. लहान वयातच त्यांच्या धडाडीच्या निर्णयातून जी ‘राष्ट्रभक्तसमूह’ संघटना निर्माण झाली तिचंच पुढे ‘अभिनव भारत’ संघटनेत रुपांतर झालं. पुढे इटालीचा क्रांतिवीर जोसेफ मॅझिनीच्या चरित्रानं ते एवढे भारावून गेले की त्याचं त्यांनी मराठीत भाषांतर केलं.

क्रुरकर्मा जॅक्सनच्या खुनानंतर चापेकर बंधूंना फाशी झाली तो दिवस सावरकरांच्या एकूणच वैचारिक दिशा नि प्रत्यक्ष कार्य त्यांच्या दृष्टीनं क्रांतिकारक ठरला. त्यांनी आपली कुलदेवता भगवतीसमोर शपथ घेतली-
‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून
मारिता मारिता मरेतो झुंजेन.’
यालाच जोडून सर्वांना उद्देशून त्यांनी ‘याल तर सह, न याल तर शिवाय’ अशी गर्जनाही केली.
देशकार्यानं भारित नि प्रेरित झाले असतानाही त्यांची अष्टावधानी बुद्धी अनेक – आघाड्यांवर क्रांती आणण्यात व्यस्त होती. त्यातील काही गोष्टी अशा –

  • भाषाशुद्धी नि लिपिशुद्धी – या गोष्टी कोणताही स्वातंत्र्यवीर लक्ष देणार नाही. पण स्वा. सावरकरांना या गोष्टीही महत्त्वाच्या वाटत होत्या. त्यांचं योगदान महत्त्वाचं होतं.
  • अस्पृश्यता, जातिभेद निर्मूलन यासाठी पतितपावन संघटनेसारखे प्रयत्नही त्यांनी केले.
  • अंधश्रद्धा, भाबड्या समजुती, संस्कृती विषयक भोळसट भावना यांची त्यांना चीड होती. गाईकडे त्यांनी एक उपयुक्त पशू म्हणून जरी पाहिलं तरी गोमातेबद्दल त्यांना कृतज्ञताही होती. जेव्हा ते ‘गोपूजन नकोे, गोपालन हवं’ अशासारखे विषय मांडत त्यावेळी त्यांना नुसतं गोपूजन न करता गायींचं शास्त्रशुद्ध पालन-पोषण करण्याकडे लक्ष देणं अभिप्रेत असे.
    आज रस्त्यारस्त्यावर बेवारशी भटकणार्‍या गोवंशाची संख्या पाहिली, वाहनांच्या धडकांमुळे होणारे त्यांचे करुण मृत्यू पाहिले की स्वा. सावरकरांची दृष्टी योग्य वाटते.
  • फारच थोड्यांना माहीत असेल की स्वदेशी कापडाची पहिली जाहीर होळी पुण्यामध्ये सावरकरांनी १९०५ साली केली. यात त्यांची भारतीय उद्योगांविषयीची दृष्टी दिसून येते.
  • स्वा. सावरकरांची जाज्ज्वल्य विज्ञाननिष्ठा हा त्या काळच्या राजकीय नेत्यांशी तुलना करता आगळावेगळा विशेष होता. धर्मशास्त्रातल्या अज्ञान नि अंधश्रद्धा यावर आधारित कर्मकांडं – विधिनिषेध यावर त्यांनी नुसता चाबूकच मारला नाही तर स्वतःच्या जीवनात अखेरच्या प्रवासापर्यंत ही विज्ञाननिष्ठा ज्वलंत ठेवली.
    मृत्यूनंतरच्या त्यांनी दिलेल्या सूचना अगदी स्पष्टपणे विज्ञाननिष्ठ होत्या.
  • माझा मृतदेह कोणाही माणसांच्या खांद्यावरून स्मशानाकडे नेला जाऊ नये.
  • या कामासाठी यांत्रिक शववाहिका वापरली जावी.
  • देहाचं दहन विद्युत दाहिनीतच केलं जावं.
  • श्राद्धासारखे कोणतेही विधी, पिंडदानासारख्या क्रिया अजिबात केल्या जाऊ नयेत.
    आज या गोष्टी सामान्य वाटल्या तरी पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी एका महान क्रांतिकारकाच्या अंत्ययात्रेच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाच्या होत्या. शिवाय दुकानं बंद ठेवली जाऊ नयेत, सुट्टी दिली जाऊ नये. सारा प्रकार अगदी सामान्य व्यक्तीसारखा असावा. ही गोष्ट असामान्य नव्हे का?
  • उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले तेही ‘शिवाजी शिष्यवृत्ती’ मिळवून जी श्यामजी कृष्ण वर्मा या शिक्षणप्रेमी व्यक्तीनं परदेशात जाऊन उच्च शिक्षण मिळवू इच्छिणार्‍या होतकरु विद्यार्थ्यांसाठी ठेवली होती. विशेष म्हणजे यासाठी सावरकरांच्या नावाची शिफारस लोकमान्य टिळकांनी केली होती.
    सावरकर परदेशात गेले ते कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी. आता तर ते सिंहाच्या गुहेत गेले होते. पण त्यांच्यातला उसळत्या रक्ताचा क्रांतिकारक गप्प बसला नाही.

जाड जाड ग्रंथांची पानं पिस्तुलाच्या आकारासारखी कापून त्यात पिस्तुल ठेवून अगदी शिताफीनं भारतातील क्रांतिकारकांपर्यंत पोचवायची व्यवस्था सावरकरांनी केली. यातीलच एका पिस्तुलानं कलेक्टर जॅक्सन या जुलमी अधिकार्‍याचा खून केला गेला. चौकशीचे धागेदोरे सावरकरांपर्यंत गेले. त्यांना अटक करून भारतात जहाजानं पाठवत असताना तो ऐतिहासिक प्रसंग घडला.

बोट फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात आली असताना खूप कायदेविषयक विचार करून फ्रान्स हे इंग्लंडच्या सत्तेखालचं राष्ट्र नसून स्वतंत्र देश आहे हे लक्षात घेऊन बोटीतून थेट सागरात उडी मारून पोहत पोहत सावरकर फ्रान्सच्या बंदरात पोचले. फ्रेन्च भाषेची अडचण आल्याने ते आपल्या पलायनाचा अर्थ नीट पटवून देऊ शकले नाहीत. त्यांना ब्रिटिश अधिकार्‍यांकडे हस्तांतरित केलं गेलं. भारतात आणल्यावर खटला भरुन त्यांना दोन काळ्या पाण्यांची म्हणजे अंदमान येथील तुरुंगात ५० वर्षं बंदिवासात – सश्रम कारावासात – ठेवण्याची भयंकर शिक्षा झाली.
** स्वा. सावरकरांच्या जीवनातील सर्वांत यातनामय पण तितक्याच तेजस्वी अध्यायाचा आरंभ झाला. तिथला जेलर उद्धटपणे त्यांना कारागृहात शिरताना म्हणाला, ‘आता याच काळकोठडीत तुझा अंत होणार. पन्नास वर्ष कोण जगू शकेल का असल्या कष्ट नि क्लेश यांनी भरलेल्या वातावरणात?’
यावर स्वा. सावरकरांनी काढलेले उद्गार खरे ठरले – ‘माझी चिंता करण्याऐवजी स्वतःची कर. मी तर जिवंत बाहेर येईनच. पण हे पाहायला तू या जगात नसशील.’ तो वेदनामय कालखंड म्हणजे रोजचं जिवंत मरण होतं.- हाताची जळजळ करणारं, फोड आणणारं ते नारळाच्या काथ्या कुटण्याचं काम, मान मोडणारं ते बैलासारखं घाणा ओढून तेल काढण्याचं काम, याच्या जोडीला बेड्या साखळ्यात जखडून ठेवणं, शारीरिक मारहाण नि शाब्दिक अपमान तर अखंड चालू असे. पण याच्या पार्श्‍वभूमीवर हा राजकीय कैदी काय करत होता?
एका इंग्रजी कवितेतील तेजस्वी पंक्ती आहे – ‘ब्राइटेस्ट इन् डंजन्स, लिबर्टी दाऊ आर्ट’ म्हणजे ‘हे स्वतंत्रते अधिकाधिक अंधार्‍या कोठडीत तू सर्वाधिक तेजानं तळपतेस!’
सावरकरांच्यातला कवी अधिक सचेत, जिवंत होऊ लागला होता. पण त्या यातनामय वातावरणात लिहायचं कसं- कशानं- कशावर? या संदर्भात लोककवि मनमोहन नातू यांची अप्रतिम कविता आहे. त्यात एक अफलातूंन कल्पना आहे –
सावरकर विचारात गढलेले असताना त्यांना जाणवतं त्या काळकोठडीची भिंत पुढे सरकून म्हणते – ‘मी कागद होऊन आले’ – लिही माझ्यावर – मग बाभळीचे काटे, कोळसे, विटांचे तुकडे यांच्या साह्यानं भिंतीवर काव्यलेखन सुरू झालं. त्याचंच पुढे ‘कमला’ नावानं प्रकाशन झालं. हे सारं नुसतं विधिलिखित नव्हतं तर त्यामागे यज्ञकुंड होतं. स्वा. सावरकरांच्या दैदिप्यमान प्रतिभेचं.
१९२४ साली सुटका झाल्यावर या सार्‍या आत्मानुभवावर आधारित ‘माझी जन्मठेप’ हा त्यांचा ग्रंथ मराठी साहित्यक्षेत्रातला एक मानदंड आहे. ‘हिंदुपदपादशाही’, ‘अठराशे सत्तावनचं स्वातंत्र्यसमर’, ‘हिंदुत्व’, ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’ असे ग्रंथही त्यांनी लिहिले. यामुळे ते मराठी साहित्यसंमेलनाडे अध्यक्षही झाले.
स्वतंत्रता देवीला उद्देशून रचलेल्या महन्मंगल स्तोत्राचे त्याचं स्वतःचं जीवन हे एक जिवंत प्रतीकच होतं. बघा ना, या ओळी आत्मकथनच वाटत नाहीत का?-

  • जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
    स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते….
  • तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
    तुज सकल चराचर शरण… चराचर शरण’
    हे स्वा. सावरकरांचंच जीवनदर्शन वाटत नाही का?
    अन् म्हणूनच हा महाकवी, महामानव… जो भग्न भारताचं करुण दृश्य (मानचित्र) पाहणं सहन न होत असल्याने आपल्या क्रांतदर्शी द्रष्टेपणानं मृत्युसमयी बजावून गेला- ‘माझी रक्षा सिंधूत टाका!’ त्यांना स्पष्ट दिसत होतं एक काळ असा उगवेल ज्यावेळी संपूर्ण सिंधू नदी- जिच्या काठावर आपली सिंधु संस्कृती बहरली ती सिंधु सरिता भारतातून वाहू लागेल. त्या दिवशी विसर्जन करा माझ्या रक्षेचं सिंधू नदीत. तिच्यातून सिंधुसागरात (अरबी समुद्र) ती रक्षा मिसळून भारताचा संपूर्ण किनारा धूत राहील. भारतभूमीवर – स्वतंत्रते भगवतीवर – आपल्या लाटांनी अभिषेक करत राहील. असं नाही वाटत की तो दिवस आता फार दूर नाही?