दुभंगलेली मने, तुटलेली नाती

0
357
  • ज. अ. रेडकर.

  • सांताक्रूझ मुलाने मख्खपणे सगळे ऐकून घेतले पण त्याच्यावर कोणताच परिणाम झाला नाही आणि तो माघारी बंगळूरूला निघून गेला. निदान.. बाबा तुम्ही असे का बोलता, तुमच्या मालमत्तेपेक्षा, तुमच्या पैशाअडक्यापेक्षा तुम्ही आम्हाला हवे आहात, असे शब्द काही त्याच्या मुखातून आले नाहीत.

मानवी आयुष्य सुखदुःखाने भरलेले असते. वरवर सुखी दिसणारी माणसे किंवा चेहर्‍यावर हास्य ठेवणारी माणसे खरोखरच सुखी किंवा आनंदी असतातच असे नाही. अनेकदा मनातले दुःख लपवून माणसाला जगावे लागते. कधी लोकलाजेस्तव तर कधी मन मोकळे करणारे विश्वासू माणूस सोबत नसल्याने! रघुनाथराव यांचीदेखील तशीच काहीशी अवस्था होऊन बसली होती. चार वर्षापूर्वी त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाचा धूमधडाक्यात विवाह करून दिला. विवाह मंडळातून हे लग्न जुळले होते. मुलगी उच्च शिक्षित. रघुनाथराव व त्यांची पत्नी शांताबाई यांनी प्रथम मुलगी पाहिली. मुलगी पाहण्याचा हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने न होता तो एका मंदिरात देवदर्शनाच्या निमित्ताने घडवून आणला होता. मुलगी नापसंत ठरली तर त्या गोष्टीचा बभ्रा होऊ नये म्हणून हा घाट घातला होता. मुलीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे होते असे रघुनाथराव यांचे म्हणणे होते. परंतु इथेच सर्व चुकले आणि पुढचे सगळे रामायण घडले.
मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असा गुपचूप करण्याचा उद्देश जरी चांगला असला तरी तो धोकादायक असतो याची कल्पना रघुनाथरावांना नव्हती. चार जाणकार व चौकस माणसे आणि त्यात एखाददुसरी स्त्री अशा गोतावळ्यासह मुलीच्या घरी जाऊन मुलगी पाहण्याची जी प्रथा होती तीच योग्य होती.. हे रघुनाथरावाना आता वाटू लागले. असा कार्यक्रम जेव्हा होतो तेव्हा मुलीच्या घरची इतर माणसे कोण व कशी, त्यांची एकूण परिस्थिती काय, त्यांचे एकंदरीत वागणे काय, त्यांचे इतर नातेवाईक कोण व कसे याचा अंदाज बांधता येतो. शेजार्‍या-पाजार्‍या कडून माहिती मिळवता येते. त्यांत कुणी ओळखीचे निघाले तर त्याला विश्वासात घेता येते आणि नंतरच होकार किंवा नकार कळवता येतो. मंदिरात किंवा हॉटेलमध्ये जेव्हा पाहण्याचा कार्यक्रम होतो तेव्हा मुलीच्या घरच्या अंतर्गत गोष्टी आपणाला कळत नाहीत.. याची जाणीव रघुनाथरावांना आता होत होती. आपले तेव्हा चुकलेच असे त्यांना वाटत होते. पण झाल्या गोष्टीचा पश्चात्ताप करण्यापलीकडे हातात काहीच उरलेले नाही या जाणिवेने रघुनाथराव कष्टी होत होते.
मुलगी पाहण्याचा कार्यक्रमदेखील मुलाच्या परोक्ष झाला कारण तेव्हा तो फ्रान्समध्ये नोकरीला होता आणि आई-वडिलांना जी मुलगी पसंत असेल ती आपणाला चालेल हे त्याचे म्हणणे होते. तरीदेखील रघुनाथरावानी मुलीचा फोटो मुलाला ई-मेल करून पाठवला. मुलगा म्हणाला मुलगी तशी काही फारशी चांगली दिसत नाही. पण तुम्हाला पसंत असेल तर माझे काही म्हणणे नाही. पाहण्याच्या वेळी मुलगी अत्यंत नम्र वागली, गोड बोलली, वाकून नमस्कार करणे वगैरे झाले. या तिच्या वागण्याने रघुनाथराव खूश झाले. मुलगी सुसंस्कारी आहे असे त्यांचे मत झाले प्रत्यक्षात दिसायला सुमार असली तरी रंगरंगोटी केल्याने मुलगी उठावदार दिसली. रूपापेक्षा गुण महत्त्वाचे कारण रूप हे काही काळचे तर गुण चिरंतन टिकणारे आणि संसारात तेच महत्त्वाचे असा विचार करून रघुनाथराव यांनी मुलगी पसंत केली.
मुलगी अपेक्षेपेक्षा स्मार्ट निघाली. तिने रघुनाथरावांच्या मुलाचा फोन नंबर मिळवला व त्याच्याशी च्याटींग सुरू केले. मात्र याची कल्पना रघुनाथरावांना नव्हती. मुलगी बोलण्यात पटाईत होती. साखरेत घोळून पाकात तळून लोकांना आपलेसे करण्यात तरबेज होती. तिने रघुनाथरावांच्या मुलाला चांगलेच घोळात घेतले. तो मुद्दाम चार दिवसांची रजा काढून मुलीला भेटण्यासाठी गावी आला. तिच्या प्रेमळ वागण्याने घायाळ झाला आणि लग्न ठरले. साखरपुडा झाला. पुढच्या सहा महिन्यांनी यथासांग विवाह संपन्न झाला. चार आठ दिवस देव दर्शन, जवळच्या नातेवाइकांच्या भेटीगाठी यात गेले आणि नवविवाहित जोडपे फ्रान्सला रवाना झाले. लग्नात कोणतेही विघ्न न येता लग्न पार पडले होते. रघुनाथराव खूश होते. आपल्या मुलाला योग्य जोडीदारीण मिळाली याचे समाधान त्यांना वाटत होते.
म्हणता म्हणता चार वर्षे मागे पडली. यात दोन वेळा रघुनाथरावांची सूनबाई फ्रांसहून आपल्या माहेरच्या नातेवाइकांच्या लग्नसमारंभासाठी म्हणून गावी आली. सासरी राहण्यापेक्षा तिने माहेरीच राहणे पसंत केले. ही गोष्ट रघुनाथरावाना खटकत होती पण ‘ती नातेवाइकांच्या लग्नासाठी आली आहे, राहू दे तिला माहेरी’ असे शांताबाईंचे म्हणणे पडले. परंतु लग्नसोहळे उरकल्यानंतरदेखील ती महिनाभर माहेरीच राहिली आणि फ्रान्सला जाण्याच्या दिवशी सासरी आली. दोन्ही वेळा असेच घडले. रघुनाथराव यांना हे काही आवडले नाही. पण ते काही बोलू शकत नव्हते. उगाच सूनबाईचे मन दुखवायला नको. आपण हिला काही बोललो तर आपल्या मुलाला ही उलटसुलट सांगेल आणि त्याला मानसिक त्रास होईल असा विचार करून ते गप्प बसले.
कोरोना संकट येते आहे म्हटल्यावर रघुनाथरावांचा मुलगा फ्रांस सोडून बंगळूरू येथील कंपनीत रुजू झाला. अधूनमधून मुलगा-सून चार-आठ दिवसांसाठी गावी यायची. सून सासरी फक्त पाय लावायची आणि आपल्या माहेरी निघून जायची! ना सासुसासर्‍यांची परवानगी ना विचारणा! बंगळूरूला जायच्या दिवशी ती पुन्हा सासरी यायची. बस्स! रघुनाथरावांचा मुलगा आपल्या बायकोच्या एवढा आहारी गेला होता की आपल्या बायकोला तो असे वागणे बरे नव्हे हे सांगत नव्हता. उलट आपली बायकोच कशी योग्य हे तो सांगू लागला. याचेच दुःख रघुनाथराव यांना अधिक वाटत होते. कायम आपल्या आज्ञेत राहणारा, कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी परवानगी घेणारा, वडिलांच्या शब्दाबाहेर न जाणारा मुलगा लग्नानंतर एवढा बदलेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. रघुनाथरावांची बायको शांताबाई अगदीच साधी होती. मानापमान याचे तिला कधी वैषम्य वाटत नसे. परंतु रघुनाथराव भलतेच स्वाभिमानी होते. आपल्या मनाविरुद्ध गोष्टी झाल्या की त्यांना राग यायचा. आजवरच्या आयुष्यात त्यांचा कुणी अनादर, अवमान किंवा अपमान केला नव्हता. सन्मानाचे जीवन ते जगले आणि जीवनाच्या शेवटच्या पर्वात हे अवमानित जिणे नशिबी आले. आपलेच नाणे खोटे निघाले त्याला कोण काय करणार असे त्यांना वाटायचे!
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे जोडणे नसते तर दोन परिवारांचे मीलन असते. मुलगी सासरी येते तेव्हा तिने आपल्या वागणुकीने सासरची मने जिंकायची असतात. माहेरची ओढ कमी करायची असते. कारण पुढचे सगळे आयुष्य या नव्या घरी तिला काढायचे असते. मुलगी कितीही लाडाची लेक असली तरी मुलीच्या आईने आपल्या मुलीला काही गोष्टी मुद्दामहून सांगायच्या असतात. वरचेवर माहेरी येऊन राहणे, घरातील कामे टाकून सतत मोबाईल, टीव्ही, संगणक यात गुंतून राहणे, सतत आपल्याच खोलीत स्वतःला कोंडून घेऊन आत्ममग्न होणे, आपल्या वागण्या-बोलण्याने सासुसासर्‍यांचा उपमर्द करणे हे योग्य नव्हे हे तिला तिच्या आईने सांगणे जरुरीचे असते. याच गोष्टी जर सासरच्या माणसांनी सांगितल्या तर तो सासरचा जाच वाटू लागतो.. त्यापेक्षा सोनारानेच कान टोचले की नेहमीच बरे असते. परंतु लाडावलेल्या आपल्या मुलीला आई या गोष्टी सांगत नाही. अशाने सासरी वादविवाद वाढत जातात, मने दुभंगतात आणि नाती तुटतात.
सूनबाईच्या माहेरचे सगळेच लोक तसे चंगळवादी होते. मुलं करतील तो हट्ट पुरवणे यातच त्यांना धन्यता वाटायची. हॉटेलिंग काय, पार्ट्या काय, पिकनिक काय, सगळी मज्जाच मज्जा! यांतच त्या सर्वांना अधिक रस होता. त्यामुळे योग्य काय अयोग्य काय याची जाणीव ना या कुटुंबातील वडीलधार्‍यांना होती ना त्यांच्या मुलांना! रघुनाथराव यांचे कुटुंब शिस्तीत राहणारे, चंगळवादापासून अलिप्त राहणारे. गैरवाजवी खर्च न करणारे होते. दोन कुटुंबातील हा मूलभूत फरक होता जो वधूपरीक्षेच्या वेळी रघुनाथरावाना समजून आला नव्हता.
हळूहळू रघुनाथराव मानसिकदृष्ट्या खचत चालले. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होऊ लागला. आपण चुकीच्या माणसांशी संबंध जोडले याचा त्यांना पश्चाताप होत होता. आपला मुलगा आपल्या हातातून गेला याचे दुःख त्यांना वाटत होते. पण आता इलाज नव्हता. त्यांची जगण्यावरची इच्छाच संपून गेली. आपणाला लवकरात लवकर शांतपणे मृत्यू यावा अशी प्रार्थना ते आपल्या कुलदेवतेपाशी करीत होते. स्वाभिमानी माणसाला अवमानित जगणे कठीण होत असते. रघुनाथरावदेखील याला अपवाद नव्हते. एक दिवस त्यांनी आपल्या मुलाला बंगळूरूहून बोलावून घेतले. आपल्या मालमत्तेची कागदपत्रे, पैसा अडका, बँकेतील ठेवी याविषयी कल्पना दिली. आपली पुन्हा भेट होईल किंवा नाही हे माहीत नाही असे भावविवशतेने सांगितले. मुलाने मख्खपणे सगळे ऐकून घेतले पण त्याच्यावर कोणताच परिणाम झाला नाही आणि तो माघारी बंगळूरूला निघून गेला. निदान बाबा तुम्ही असे का बोलता, तुमच्या मालमत्तेपेक्षा, तुमच्या पैशाअडक्यापेक्षा तुम्ही आम्हाला हवे आहात, असे शब्द काही त्याच्या मुखातून आले नाहीत. रघुनाथरावाना वाईट वाटले. आता मने दुभंगली होती, नाती संपुष्टात आली होती. कालाय तस्मै नमः… म्हणून रघुनाथरावानी उसासा सोडला आणि त्याच रात्री त्यांनी आपला प्राण सोडला.