छत्रपती शिवाजी महाराज…परकीयांच्या नजरेतून…

0
1457
  • सचिन मदगे

अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूचा संपूर्ण पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी एकाही दिवसाची विश्रांती घेतली नाही की विजयही साजरा केला नाही अन् त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात कित्येक हजार चौरस मैलाचा प्रदेश झपाट्याने जिंकून घेतला. याशिवाय अनेक ठिकाणी किल्ले बांधले. या सर्व वेगवान घटनांमुळे सतराव्या शतकातील वाहतुकीची साधने लक्षात घेता या सर्व गोष्टी कल्पनेच्या पलीकडील वाटतात.

मी स्वतः व्यावसायिक शिल्पकार. शिल्पकलेच्या माध्यमातून मी शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे बनविले. माझ्याकडून शिवाजी महाराजांचे पुतळे बनवून घेणार्‍याची शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची अपेक्षा अशी असते की प्रथमतः शिवाजी महाराजांची नजर कडक पाहिजे. शिवाजी महाराजांचा जोश किंवा आक्रमकता त्यांच्या हालचालीत दिसली पाहिजे. त्यांनी म्यानातून जोशपूर्ण तलवार अशी काही उगारली पाहिजे की पाहणार्‍याला भीती आणि दरारा वाटला पाहिजे. अशाप्रकारे माझ्याकडे येणार्‍या शिवभक्तांची शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलची कल्पना असते. परंतु असे खरेच शिवाजी महाराज होते का? कायम सदैव आक्रमक रीतीने वावरणारे? शिवाजी महाराजांच्या समकालीन कागदपत्रांमधून आणि समकालीन परकीय शत्रूंनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे कोणत्या शब्दात वर्णन केले आहे ते पाहू.

सर्वप्रथम गोव्यातील पोर्तुगीजांनी केलेले वर्णन पाहू. शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी जेव्हा गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर अंतानिओ वाईस-द-सांद याला कळली तेव्हा त्याने शिवाजी महाराजांविरुद्ध फारच सूचक उद्गार काढले. तो लिहितो- ‘‘शिवाजीच्या मृत्यूमुळे हे राज्य आता काळजीतून मुक्त झाले. युद्धकाळापेक्षा शांततेच्या प्रसंगी तो अधिक भीतिदायक होता.’’
शिवाजी महाराजांच्या वेळी हयात असणारा त्यांचा शत्रू आणि पोर्तुगाल इंडियाचा प्रमुख असलेला गव्हर्नर यांनी शिवाजी महाराजांविषयी फारच सूचक आणि कर्मठ शब्दात महाराजांचे व्यक्तिचित्रण केले आहे. त्यातील ‘शांततेच्या काळात तो अधिक भीतिदायक होता’, या वाक्याची खूप खोलवर दहशत बसली होती. कारण शिवाजी महाराजांनी गोव्यात ज्या काही पोर्तुगीजांविरुद्ध मोहिमा केल्या त्या पोतुगीजांच्या कल्पनेपेक्षा भयानक होत्या. सन १५१० ते १६६७ म्हणजे एकशे सदुसष्ट वर्षं पोर्तुगीजांना गोव्यात कोणत्याही भारतीय राजाने राजकीय आणि धार्मिक कारणासाठी आव्हान दिले नव्हते. पोर्तुगीजांच्या धार्मिक अत्याचाराला उत्तर देताना शिवाजी महाराजांनी १९ नोव्हेंबर १६६७ रोजी बार्देश येथे पोर्तुगीजांवर स्वारी करून येथील हिंदूंवरील अत्याचाराविरुद्ध पोर्तुगीजांना जोरदार तडाखा दिला. तसेच शेजारील शिवाजी महाराजांच्या राज्यातील मुजोर देसायांना पोर्तुगीज आश्रय देत होते. तेव्हा या देसायांना आणि पोर्तुगीजांनाही शिवाजी महाराजांनी वठणीवर आणले.

शिवाजी महाराजांनी बार्देशवर केलेल्या या स्वारीनंतर जो पोर्तुगीज आणि शिवाजी महाराजांचा तह डिचोलीमध्ये झाला, या तहातील वाटाघाटीत शिवाजी महाराजांनी बार्देशमधील पोर्तुगीजांच्या आणि स्थानिक कॅथलिक स्त्रिया, मुले जे कैदी केले गेले होते त्या सर्वांना आदराने वागवून त्या बदल्यात एक रुपयाही न घेता त्यांना मुक्त केले. पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या १५ वर्षांनंतर गोव्यातील मुरगाव येथे कोस्मी-द-गामा या पोर्तुगीज इसमाने प्रसिद्ध शूरवीर शिवाजी- हे पोर्तुगीज भाषेत शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले. या चरित्रात शिवाजी महाराजांनी युद्धात सापडलेल्या कैदी स्त्रिया आणि मुलांचा कसा सन्मान राखला याबद्दल लिहिले आहे. हे शिवाजी महाराजांचे पहिले परकीयांनी लिहिलेले चरित्र असून हे आपल्या गोव्यात लिहिले आहे हे विशेष.
शिवाजी महाराजांचे धाडसी कृत्य आणि अत्यंत जलद आणि गुप्त हालचाली पाहून पोर्तुगीजांना शिवाजी महाराज हे प्राचीन युरोपियन वीर नायक ज्युलीयस सीझरसारखे वाटले म्हणून शिवाजी महाराजांची तुलना ज्युलियस सिझर या महान युरोपियन नायकाशी केली आहे.

शिवाजी महाराजांच्या जलद आणि अविश्रांत अशा शत्रूंविरुद्धच्या हालचालींमुळे समकालीन इंग्रजांनी शिवाजी महाराजांविषयी येथील लोकांच्या काय भावना होत्या हे लिहिले आहे. ‘‘विलक्षण धाडसी दरोडेखोर म्हणून शिवाजीची इतकी ख्याती झालेली आहे की लोकांनी ‘त्याचे शरीर हवामय असून त्याला पंखही आहेत’ असे रान उठविले होते. एरवी तो एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होतो. या बातम्या शक्य तरी कशा होतात? आज तो एका ठिकाणी आहे असे खात्रीलायक समजावे तर एक-दोन दिवसात तो दुसर्‍याच ठिकाणी आहे असे कळते तर लगेच दूर दूर असलेल्या पाच-सहा ठिकाणी एकामागून एक अशा तर्‍हेने लुटालूट व जाळपोळ करताना तो आढळतो. त्यामुळे त्याचे नाव सर्वतोमुखी झाले असून त्याच्यामध्ये हर्क्युलसचे (भीमाचे) सामर्थ्य आहे असे लोक मानतात’’. हे पत्र सुरतेच्या वखारीतून जून १६६४ रोजी कारवार वखारीस लिहिलेले आहे. या पत्रात ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचे परकीय इंग्रजांनी वर्णन केले आहे त्याला कारण सन १६५९ मधील अफजलखान वधापासून सन १६६४ पर्यंत शिवाजी महाराजांनी अविश्रांत एकामागून एक मोहिमा केल्या हे होय. अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूचा संपूर्ण पराभव केल्यानंतर एकाही दिवसाची विश्रांती घेतली नाही की विजयही साजरा केला नाही अन् त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात कित्येक हजार चौरस मैलाचा प्रदेश झपाट्याने जिंकून घेतला. कोकणात राजापूरमधील इंग्रजांच्या वखारीही लुटल्या. पुढे पन्हाळा प्रकरण, विशालगडावर सहीसलामत जाणे, कास्तबलखानाचा पराभव, शाहिस्तेखानाची फजिती, प्रांत कुडाळ जिंकून घेणे… याशिवाय अनेक ठिकाणी किल्ले बांधणे… या सर्व वेगवान घटनांमुळे सतराव्या शतकातील वाहतुकीची साधने लक्षात घेता या सर्व गोष्टी कल्पनेच्या पलीकडील वाटतात. त्यामुळे परकीय इंग्रजांना शिवाजी महाराज त्यांच्या दहशतीमुळे दरोडेखोर वाटत असले तरी त्याचबरोबर एक विलक्षण अशक्यप्राय ताकदीचे व्यक्तिमत्त्वही वाटले आहे.

जानेवारी १६६४मध्ये शिवाजी महाराजांनी मोगल बादशहाची आर्थिक राजधानी आणि व्यापारी राजधानी असलेल्या सुरत शहरातून अगणित संपत्ती मिळवली. सुरतेमध्ये त्या काळातील जगातील प्रमुख परकीय सत्तेच्या वखारी होत्या. इंग्रज, डच, अरब, इराणी, आफ्रिकन, तुर्की, रोमन इत्यादी व्यापारी त्याठिकाणी हजर होते. या सर्वांनी शिवाजी महाराजांच्या या धाडसी मोहिमेची दखल घेतली आहे. या काळात इंग्लंडमध्ये निघणार्‍या वर्तमानपत्रातही सुरतेच्या शिवाजी महाराजांच्या मोहिमेचा वृत्तांत छापून आला होता. या मोहिमेत शिवाजी महाराजांनी शत्रूच्या स्त्रिया आणि मुलांना कशाप्रकारे सन्मानाने वागवले… हे परकीयांनी लिहून ठेवले आहे. या सुरतेच्या मोहिमेची दखल इराणच्या बादशहा अब्बास यानेही घेऊन त्याने पुढे औरंगजेबाने जेव्हा रीतसर बादशहा होऊन आपला वकील इराणच्या बादशहाकडे पाठविला तेव्हा इराणच्या शहा अब्बास याने, शिवाजी महाराजांनी मोगलांना असे सळो की पळो करून सोडले होते… अशा प्रकारे लिहून औरंगजेबाचा पुरता अपमान केला आहे.
अशा प्रकारे अत्यंत धाडसी, धूर्त, मुत्सद्दी आणि अविश्रांतपणे आपल्या राज्यांच्या आणि लोकांच्या कल्याणासाठी झटणार्‍या राजाची प्रतिमा आम्ही मात्र कायम आक्रमक आणि प्रखर अशी करून ठेवली आहे.