चर्चिलचा निसटता विजय

0
182

गमावलेल्या अनेक सोप्या संधींमुळे पणजी फुटबॉलर्सला काल बुधवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सकडून १-० असा पराभव पत्करावा लागला. वार्कास्थित चर्चिलकडून राकेश दास याने एकमेव गोलाची नोंद केली. साळगावकर एफसीकडून ०-५ असा दारुण पराभव पत्कराव्या लागलेल्या संघात चर्चिलने तब्बल सहा बदल केले. उभय संघांनी या सामन्यात तोडीस तोड खेळ केला. परंतु, फिनिशिंग टच् देण्यात दोन्ही संघ कमी पडले.

पणजीने पहिला गोलप्रयत्न केला. डाव्या बगलेतून लोकेश कुमार याने आगेकूच करत बॉक्समध्ये मारलेला चेंडूवर जॉयसन गावकर याने ताबा मिळविण्यापूर्वीच गोलरक्षक देबनाथ मोंडल याने अडविला. यानंतर राकेश दास याच्या ‘फ्लोटर’वर बचावपटूला व्यवस्थित हेडर लगावता न आल्याने चर्चिलची संधी हुकली. यानंतर लिस्टन कार्दोझने जॉयसनला दिलेल्या अचूक पासवर जॉयसनला ताबा राखता न आल्याने चेंडू गोलरक्षकापाशी गेला व पणजीची संधी हुकली. ४१व्या मिनिटाला चर्चिलने गोलांचे खाते उघडले. चर्चिलचा मोहम्मद शहजाद चेंडूवर ताबा राखत पुढे सरसावण्याच्या प्रयत्नात असताना अक्रम याडवड याने त्याच्याकडील चेंडूवर ताबा मिळवत चेंडू राकेश दासच्या दिशेने ढकलला. राकेशने कोणतीही चूक न करता सामन्यातील विजयी गोल केला. आज युथ क्लब ऑफ मनोरा व गार्डियन एन्जल स्पोर्टस् क्लब यांच्यात सामना खेळविला जाणार आहे.