केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरुद्ध गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईत महामुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील जवळपास २१ जिल्ह्यांतून हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानात जमा झाले आहेत. या आंदोलनात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहभागी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत.
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा या झेंड्याखाली या आंदोलनासाठी राज्यभरातून शेतकरी, कामगार मुंबईतील आझाद मैदानावर जमत आहेत. नाशिक येथून अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुमारे १५ हजार शेतकरी दाखल झाले आहेत.आझाद मैदानात शेतकर्यांचे हे तीन दिवसांचे धरणे आंदोलन असून या आंदोलनाला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचाही पाठिंबा आहे. आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान राजभवनावर मोर्चाने जाऊन शेतकरी प्रतिनिधी मागण्यांचे निवेदनही राज्यपालांना देणार आहेत. २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी आझाद मैदानात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. आज दि. २५ रोजी शरद पवार मोर्चाला मार्गदर्शन करणार असून यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे सहभागी होतील.