पुजाराची प्रगती; विराटची घसरण

0
216

>> आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे झालेल्या तिसर्‍या कसोटीनंतर ताजी क्रमवारी जाहीर केली असून या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टीव स्मिथ याने टीम इंडियाच्या विराट कोहली याला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळविला आहे. चेतेश्‍वर पुजारा याने सिडनीतील दोन अर्धशतकांच्या बळावर दहाव्या स्थानावरून आठवे स्थान मिळविले आहे.

ख्राईस्टचर्च कसोटीत २३८ धावांची खेळी केलेला न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसन ९१९ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. विल्यमसन हा आयसीसी क्रमवारीत सर्वाधिक गुण मिळविणारा किवी खेळाडू ठरला आहे. २०१८ साली डिसेंबरमध्ये विल्यमसनने ९१५ गुणांपर्यंत मजल मारली होती. न्यूझीलंडकडून केवळ रिचर्ड हॅडली (डिसेंबर १९८५) यांना ९०० गुणांचा टप्पा पार करता आला होता.

दुसरीकडे स्मिथने सिडनीतील १३१ व ८१ धावांच्या बळावर कोहलीला मागे टाकले. विराट याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतणे पसंत केले होते. ऑस्ट्रेलियाचा अजून एक आघाडीचा फलंदाज मार्नस लाबुशेन याने कारकिर्दीतील सर्वाधिक ८६६ गुणांची कमाई करत चौथा क्रमांक आपल्या नावे केला आहे. मार्नसने एससीजीवर ९१ व ७३ धावांची उपयुक्त खेळी साकारली होती. गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड याने तीन क्रमांकांची सुधारणा करत पाचवे स्थान प्राप्त केले आहे. त्याने एससीजी कसोटीत ४ बळी घेतले होते. भारताकडून ऋषभ पंतच्या आक्रमक ९७ धावांनी त्याला २६ वरून १९वे स्थान मिळवून दिले आहे. शुभमन गिल, हनुमा विहारी व अश्‍विन यांनीदेखील सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे.

न्यूझीलंडच्या हेन्री निकोल्स याने पाकिस्तानविरुद्धच्या ख्राईस्टचर्च कसोटीतील १५७ धावांच्या जोरावर फलंदाजांच्या यादीत ‘टॉप १०’ मध्ये प्रवेश करताना नववा क्रमांक मिळविला आहे. जलदगती गोलंदाज काईल जेमिसन याने ११७ धावांतील ११ बळींमुळे सात स्थानांची उडी घेत थेट २१वा क्रमांक मिळविला आहे. केवळ सहा कसोटी खेळलेला जेमिसन अष्टपैलूंमध्ये पाचव्या स्थानी विराजमान झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-२ असा सपाटून मार खावा लागल्यानंतरही पाकिस्तानच्या काही फलंदाजांनी प्रगती केली आहे. माजी कर्णधार अझर अली याने सात स्थानांनी वर सरकत १८वे तर विद्यमान कर्णधार मोहम्मद रिझवान याने दहा स्थानांची उडी घेत ३७वा क्रमांक मिळविला आहे. दक्षिण आफ्रिका व श्रीलंका यांच्यातील जोहान्सबर्ग कसोटीनंतर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गार (१२७ व नाबाद ३१ धावा) तेराव्या स्थानी आहे. त्याचे सहकारी ऍन्रिक नॉर्के, वियान मुल्डर, लुंगी एन्गिडी व लुथो सिपाम्ला हे गोलंदाजांमध्ये अनुक्रमे ३८, ४५, ४७ व ४९व्या स्थानी आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने १५व्या तर कुशल परेरा ५६व्या स्थानी आहे.