राहुल बेपत्ता

0
240

कॉंग्रेस पक्षाने आपला १३६ वा स्थापनादिन काल साजरा केला. ज्यांच्याकडे सारा पक्ष मोठ्या आशेने पाहत आहे, ते राहुल गांधी मात्र एकाएकी परदेश दौर्‍यावर निघन गेले असल्याने कालच्या समारंभास उपस्थित नव्हते. कोणी कोठे कधी व का जावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो हे खरे, परंतु आधीच नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेल्या आणि ज्याचे राजकीय अस्तित्वच हळूहळू मिटत चालल्याचे चित्र निर्माण झालेले आहे अशा कॉंग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याची आत्यंतिक गरज असताना ज्यांच्याकडे अवघा पक्ष आणि त्याचे देशभरातील कार्यकर्ते आशेने बघत आहेत, त्या राहुल गांधींनीच रणमैदान सोडून ऐनवेळी देशाबाहेर सुटीवर जावे हे चित्र काही बरे नाही. ते आपल्या आजारी असलेल्या आजीला भेटायला गेले आहेत असे पक्षातर्फे सांगण्यात आले, पण त्यासाठी पक्षाच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातील हजेरी चुकविण्याची काही आवश्यकता नव्हती. कार्यक्रमाची तारीख व वेळ त्यांच्या सोयीनुसार बदलता आली असती, किंवा आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी दर्शविता आली असती. परंतु पक्षाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाकडे संपूर्ण पाठ फिरवून जाणे, तेही ज्याने पक्षाचे नेतृत्व आपल्याकडे घ्यावे यासाठी सामान्य कॉंग्रेसजन देव पाण्यात घालून बसले आहेत व गेल्याच आठवड्यामध्ये ज्याने ‘तुमच्या सर्वांच्या इच्छेखातर पक्षाची जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार आहोत’ असे सांगितले आहे, अशा नेत्याने असे निघून जाणे हे काही पचनी पडणारे नाही.
कॉंग्रेसची स्थिती दिवसेंदिवस राजकीयदृष्ट्या बिकट बनली जात आहे हे वास्तव तर आता सर्वांनाच कळून चुकले आहे. जेथे जेथे जनतेने पर्याय म्हणून त्या पक्षाची निवड केली, त्या जनतेला एक तर पक्षाच्या नेत्यांनी नाही तर पक्षातून फुटून गेलेल्या नेत्यांनी तोंडघशी पाडले. केंद्रीय पातळीवर पक्षामध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झालेली आहे ती तर वेगळीच. खरे तर राजकारणात चढउतार येतच असतात. ते अपेक्षितच धरायचे असतात. राखेतून वर उठायची विजीगिषू वृत्ती नेतृत्वापाशी असावी लागते. आणीबाणीनंतर पानीपत झालेल्या कॉंग्रेसला इंदिरा गांधींनी वर आणलेच ना? किंवा अटलबिहारी वाजपेयींच्या पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर कॉंग्रेस पुन्हा दमदारपणे सत्तेवर आलीच ना? परंतु आता ती लढण्याची जिद्दच कॉंग्रेस पक्षात दिसत नाही हे त्या पक्षाच्या सार्वत्रिक पतनाचे खरे कारण आहे. आज सत्ताधारी भारतीय जनता पक्ष एवढ्या प्रबळ स्थितीत आहे की त्याच्या मुकाबल्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आल्याखेरीज तुल्यबळ सामना होऊच शकणार नाही इतपत विरोधकांची शकले उडालेली आहेत. परंतु कॉंग्रेस अजूनही आपण देशात सर्वत्र तळागाळात पोहोचलेले राष्ट्रीय पक्ष आहोत याच भ्रमामध्ये वावरताना दिसत आहे. एक काळ होता जेव्हा पक्षापाशी सत्ता होती, तेव्हा गुळाच्या ढेपेला मुंगळेच मुंगळे चिकटलेले असायचे. आज त्याच कॉंग्रेसी मुंगळ्यांना गुळ तर हवे आहे, पण त्यासाठी सत्तेवरील भाजपला दुखवायची वा त्यांची इतराजी ओढवून घ्यायची मात्र त्यांची तयारी नाही. काही जण तर थेट कुंपणावरच बसले आहेत. अशा परिस्थितीत पक्षही निर्नायकी स्थितीत असेल तर त्यातून पक्षाची हानी होणार नाही तर दुसरे काय होणार? मध्यंतरी २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी ‘हे करा, ते करा’ अशा सूचना केल्या. त्यानुसार हल्लीच बैठक झाली. सोनियांनी पक्षांतर्गत बंडखोरांनाही त्यात सहभागी करून घेतले आणि त्यामध्ये राहुल गांधी यांनी पक्षनेतृत्व स्वीकारावे अशी मागणी होताच हो नाही करता करता त्यांनी तुमची सर्वांची इच्छा असेल तर त्याचा विचार करू इतपत तयारीही दर्शविली आहे. पण मग आता पुन्हा आघाडीवर येऊन लढायचे सोडून राहुलबाबा गेले कुठे? त्यांच्यात नेत्यापाशी आवश्यक असणारे सातत्य नाही हे आता देशाला कळून चुकले आहे. राजकारणात काही ते आता नवखे उरलेले नाहीत. पुरेसा अनुभव त्यांच्यापाशी नक्कीच जमा झालेला आहे. पण त्यापासून काही शिकायचे की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे. पुन्हा पुन्हा त्याच चुका करून आधीच हास्यास्पद बनलेली आपली प्रतिमा अधिकच डागाळून घेण्याची त्यांना एवढी हौस का? पक्षामध्ये परिवर्तन घडवायचे असेल, पक्षाला नवचैतन्य द्यायचे असेल तर त्यासाठी राखेतून वर उठणार्‍या फिनिक्सची जिद्द असलेल्या नेतृत्वाची आधी गरज असेल. रणांगण सोडून भीतीने पळून चाललेल्या सैनिकांना माघारी बोलावण्याची धमक असलेला आणि त्यासाठी स्वतः आघाडीवर लढणारा नेता कॉंग्रेसला हवा आहे. तोच जर नसेल तर पतन थांबणार तरी कसे? सध्याच्या पतनाच्या मालिकेतून वर काढायला बाहेरून कोणी मसीहा येणार नाही. ज्यांच्यापाशी पक्षाची धुरा आहे, त्यांनाच त्याला सध्याच्या निराशाजनक परिस्थितीतून बाहेर काढावे लागणार आहे!