‘नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी’

0
4846
  • ज.अ. ऊर्फ शरदचंद्र रेडकर.
    (सांताक्रूझ)

बायको, मुलगा, सून, घरदार हे सगळे असून नसल्यासारखे झाले होते. आपण आयुष्यभर कुटुंबासाठी खस्ता खातो पण दुर्धर प्रसंग ओढवला की कुणी कुणाचे नसते हेच खरे! रेडिओवरचे एकनाथ महाराजांचे भारूड ऐकताना वसंतरावांच्या डोळ्यांसमोरून हा जीवनपट अभावितपणे सरकून गेला.

नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी |
अंती जाशील एकाला प्राण्या, माझे माझे म्हणोनी ॥

रेडिओवर एकनाथ महाराजांचे भारूड चालू होते. हार्मोनिअमवादक कल्पेश जाधव आपल्या सुरेल आणि आंतरिक तळमळीने भारूड गात होता. ‘स्नेहमंदिर’ या वृद्धाश्रमातील खाटेवर डोळे मिटून पहुडलेले विकलांग वसंतराव ते ऐकत होते. त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. आपल्या गत जीवनाचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोरून झरझर निघून गेला. किती आनंदाचे आणि उमेदीचे दिवस होते ते! नवीन नवीन लग्न झालेले, तारुण्यसुलभ वाटणारी शरीर सुखाची ओढ, हवेहवेसे आणि हुरहुर लावणारे ते क्षण! पत्नी- आसावरीचे हट्ट पुरवताना झालेली आर्थिक ओढाताण, बायकोची बाजू घेऊन आईशी झालेली धुसफुस, दोन वर्षांनी झालेला मुलाचा जन्म! त्याचा पायगुण म्हणून नोकरीत मिळालेली बढती, नवीन जागा हा आयुष्याचा सगळा चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेला.

वसंतराव हे मध्यम कुटुंबात जन्मलेले, नाकासमोर चालणारे, कोणतेही वाईट छंद नाहीत, व्यसने नाहीत. वडिलांची वागण्या-बोलण्यावर करडी नजर, घरात धार्मिक वातावरण, चंगळ ही माहीतच नाही अशा वातावरणात वसंतरावांचे बालपण सरले. शालान्त परीक्षा उत्तीर्ण होताच लगेच महसूल खात्यात कारकून म्हणून चिकटले. त्यावेळी म्यॅट्रिक झालेल्या आणि १८ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला सरकारी खात्यात किंवा बँकेत सहज नोकरी मिळायची आणि नोकरी मिळाली की छोकरीही मिळायची असा तो काळ होता. नोकरी मिळवण्यासाठी वशिलेबाजी, लाचलुचपत हा प्रकार त्यावेळी नव्हता. नोकरी पक्की झाली आणि वसंतरावांची गाडी मार्गी लागली.
पितृछत्र डोक्यावर असेपर्यंत संसाराच्या झळा कुटुंबातील इतरांना लागत नाहीत. बाहेरची सगळी वादळे अंगावर झेलून वडीलधारी माणसे आपले कुटुंब सांभाळतात. रघुनाथरावांचे अकाली निधन झाले आणि कुटुंबाचा भार वसंतरावावर पडला. पतीच्या अकाली झालेल्या निधनाने राधाबाईनी अंथरूण धरले. घरात संसार सांभाळायला कुणीच नाही. म्हणून मग घाईघाईने वसंतरावांचे लग्न उरकण्यात आले. आसावरी नवी नवरी, तिच्या संसाराच्या काही कल्पना असणे स्वाभाविक होते. दिवसभर नवरा नोकरीनिमित्त बाहेर आणि ही घरात सासूच्या दिमतीला! चार-सहा महिने ठीक गेले, पण मग कुरबुर सुरू झाली. सासू-सुनेचे लहानसहान गोष्टीवरून खटके उडू लागले. यांत वसंतरावांची कुचंबणा होऊ लागली. आईची बाजू घ्यावी तर बायकोचा रुसवा आणि बायकोची बाजू घ्यावी तर मुलगा बाईलवेडा झाला असा दोषारोप! दिवस असेच चालले होते. हळूहळू राधाबाईंची तब्येत सुधारली. त्या हिंडूफिरू लागल्या. घरातील वादळ थोडे शांत झाले.
वसंतराव संध्याकाळी दमूनभागून घरी आले की थोडा आराम करायचे आणि नंतर ताजेतवाने होऊन बायकोसह जवळच्या मंडईत जायचे. आसावरीला असे बाहेर जाणे, भेळपुरी खाणे, थियेटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे या गोष्टी खूप आवडायच्या! परंतु सासूबाईची कटकट आणि वसंतरावांचा जुजबी पगार आडवा यायचा. असे असले तरी महिन्यातील एखादा रविवार तरी थियेटरात चित्रपट किंवा नाटक पाहणे व्हायचेच. साठच्या दशकात चित्रपट किंवा नाटक हेच विरंगुळ्याचे साधन होते.

नवीन वर्ष उजाडले आणि आसावरीला एके सकाळी कोरड्या उलट्या सुरू झाल्या. राधाबाईना आनंद झाला. कारण आसावरीला दिवस गेले होते. वसंतरावदेखील खूश झाले. या नव्या वार्तेने आसावरीचे आयुष्यच बदलून गेले. घरात आता तिचे अधिक लाड होऊ लागले. तिला आराम मिळावा म्हणून राधाबाईच घरातील सर्व कामे करू लागली. यथावकाश आसावरीला पुत्ररत्न झाले. घर आनंदाने भरून गेले. नातवाला पाळण्यातील नाव आजोबांचेच ठेवण्यात आले परंतु सगळे आवडीने त्याला पप्पू म्हणायचे. पप्पूच्या बाललीला पाहण्यात कुटुंबाचा वेळ जायचा. पप्पूच्या जन्माला तीन वर्षे झाली, त्याच्या मागे धावताना राधाबाईंची दमछाक व्हायला लागली. एवढ्यात वसंतरावाना बढती मिळाली ते अव्वल कारकून म्हणजे भाऊसाहेब झाले. परंतु त्यांची नवी नेमणूक परगावी झाली होती. रोज घरून जाऊन येऊन नोकरी करणे शक्य नव्हते. कारण त्यावेळी आत्तासारखी वाहतुकीची साधनसुविधा उपलब्ध नव्हती. शेवटी निर्णय झाला की हे घर सोडायचे आणि नोकरीच्या ठिकाणीच छोटेसे घर घ्यायचे.

नवीन शहर, नवीन घर, नवीन वातावरण, नवीन शेजारी! सगळेच नवीन पण वसंतरावांचे कुटुंब इथे रुळले. वसंतराव हे कुळकायद्यासंबंधीची प्रकरणे हाताळायचे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांशी त्यांचा संबंध यायचा. आपली कामे लवकर निपटावीत म्हणून हे गरीब शेतकरी त्यांची विनवणी करायचे. येताना शेतात पिकलेले धान्य तर कधी पालेभाजी, नारळ इत्यादी वस्तू घेऊन यायचे. वसंतरावाना हे सुरुवातीला आवडत नसे पण नंतर नंतर त्यांना या गोष्टी सवयीच्या झाल्या. पुढे कर्जात बुडालेल्या एका शेतकर्‍याची फळबाग वसंतरावांनी स्वस्तात विकत घेतली. निवृत्तीनंतर उत्पन्न मिळवण्याचे एक साधन त्यांनी तयार केले. निवृत्तीनंतर तिथे त्यांना टुमदार फार्महाऊस बांधायचे होते.

काळ कुणासाठी थांबत नाही. तो सतत पुढे सरकत असतो. पप्पू आता मोठा झाला होता. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला पोहोचला होता. सेवा ज्येष्ठतेनुसार वसंतरावदेखील भाऊसाहेबांचे रावसाहेब झाले होते. वसंतरावांची आई आता थकली होती. वयोमानानुसार विविध व्याधी तिला जडल्या होत्या आणि एके दिवशी तिने शेवटचा श्वास घेतला. घराला एक प्रकारची अवकळा यावी तसे झाले. पण संसाराचे रहाटगाडगे कुणासाठी थोडेच थांबणार! वसंतरावांचे, आसावरीचे आणि पप्पूचे थबकलेले जीवन पुन्हा प्रवाहित झाले.

वसंतरावानी आता वयाची ५८ वर्षे पूर्ण केली होती. हे वर्ष त्यांचे निवृत्तीचे वर्ष होते म्हणजे कार्यालयातील कामकाजाचे आवराआवरीचे वर्ष! नेहमीची धावपळ, दगदग यांना आता विराम मिळणार होता. निवृत्तीनंतर मिळणारा फंड, ग्रॅच्युटी याद्वारे मिळणार्‍या काही पैशातून त्यांच्या इच्छेनुसार ते फार्महाऊस बांधणार होते. तिथेच राहणार होते. याच दरम्यान त्यांच्या मुलाचे- पप्पूचे कॉलेज शिक्षण पूर्ण झाले. तो आता नोकरीच्या शोधात होता.

आज सकाळपासूनच वसंतरावाना थोडे अस्वस्थ वाटत होते पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात दाखल झाले. निवृत्तीपूर्वी काही महत्त्वाच्या फायली त्यांना हातावेगळ्या करायच्या होत्या. काम करता करता ते खुर्चीवरून कधी खाली कोसळले हे त्यांचे त्यांनादेखील समजले नाही. शेजारच्या टेबलावरील काम करणारी मंडळी धावली. त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. वसंतराव शुद्धीवर येईनात. त्यांना लगेच शहरातील इस्पितळात दाखल केले. वसंतरावाना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. या घटनेने त्यांचे कुटुंब आणि सहकारी हबकून गेले.

महिनाभराच्या उपचाराने वसंतराव बर्‍यापैकी सावरले पण त्यांची संपूर्ण एक बाजू अर्धांगवायूने कायमची लुळी पडली. त्यांचे जिणे परस्वाधीन झाले. समाधानाची गोष्ट म्हणजे वसंतरावांच्या प्रामाणिक सेवेची दखल घेऊन महसूल खात्याने त्यांच्या मुलाला सरकारी नोकरीत सामावून घेतले. म्हणता म्हणता पाच वर्षे सरली. घरातील अडचण ओळखून पप्पूचे नात्यातील मुलीशी- आशालताशी लग्न लावून देण्यात आले. पप्पूची आई आता पूर्णवेळ आपल्या नवर्‍याच्या सेवेला देऊ शकत होती. खरं तर तीदेखील आता थकली होती. तिला गुडघेदुखी व कंबरदुखीचा त्रास व्हायचा. तरीही जमेल तशी ती कामे उरकत होती. सूनबाईशी तिचे काही पटत नसे. सासर्‍याच्या आजारपणामुळे आशालताला आपल्या मनासारखे काही करता येत नव्हते, हौसमौज करता येत नव्हती. नवरा-बायकोत याच गोष्टीवरून वादावादी व्हायची. रोजच्या कटकटीला पप्पू देखील कंटाळला.

एक दिवस पप्पू आपल्या आईला म्हणाला, ‘आई, मिरजेला चांगले हॉस्पिटल आहे. तिथे आपण बाबांना घेऊन जाऊ, तिथे चांगले उपचार होतील व तुझा त्रासपण कमी होईल’. आसावरीदेखील आता रोजच्या त्रासाला कंटाळली होती. ती म्हणाली, ‘ठीक आहे, तू म्हणशील तसे! एक दिवस पप्पू आपल्या आईसह वडिलांना घेऊन मिरजेला निघाला. पण तत्पूर्वी त्याने आईला विश्वासात घेऊन काही गोष्टी समजावल्या! मिरजेचे स्टेशन आले. वडिलांचे मुटकुळे उचलून पप्पू खाली उतरला. पाठीमागून आसावरी तोंडाला पदर लावून हुंदका दाबत उतरली. तिघेही फलाटावरील बाकड्यावर थोडावेळ विश्रांती घ्यावी म्हणून विसावली. पप्पू स्टेशनाच्या बाहेर रिक्षा पाहण्याच्या बहाण्याने तर आसावरी बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने तिथून निघाली. वसंतरावांचे मुटकुळे बाकावर एकाकी! दोन तास झाले, चार तास झाले, तिन्हीसांजा झाल्या. फलाटावर शुकशुकाट! ना पप्पू फिरकला ना आसावरी! शेवटी रेल्वे पोर्टल व रेल्वे पोलिसांनी वसंतरावांची विचारपूस केली परंतु अर्धांगवायूमुळे ते काय बोलतात हेच कुणाला समजेना. अखेर एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना या वृद्धाश्रमात आणले होते आणि तेव्हापासून वसंतराव या स्नेहमंदिराचे सदस्य बनले.

बायको, मुलगा, सून, घरदार हे सगळे असून नसल्यासारखे झाले होते. आपण आयुष्यभर कुटुंबासाठी खस्ता खातो पण दुर्धर प्रसंग ओढवला की कुणी कुणाचे नसते हेच खरे! रेडिओवरचे एकनाथ महाराजांचे भारूड ऐकताना वसंतरावांच्या डोळ्यांसमोरून हा जीवनपट अभावितपणे सरकून गेला. त्यांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहत होते आणि इकडे रेडिओवर भारूड वाजतच होते, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी…!