हॉटेलसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार : विश्‍वजित

0
259

महामारीचे कारण पुढे करून या पर्यटन मोसमात पर्यटकांना गोव्यात येण्यापासून अडवले जाणार नाही. सरकार हॉटेलवाल्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार असल्याचे काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी स्पष्ट केले.

गोव्यात येणार्‍या पर्यटकांना जर कोविडचा संसर्ग झाला तर त्यांना विलगीकरणात ठेवता यावे यासाठी हॉटेलवाल्यांना आपल्या हॉटेलमध्ये एक खोली आरक्षित ठेवण्याची अट घालण्यात येणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. सध्या पर्यटन मोसम चालू असून गोवा सरकार पर्यटकांवर राज्यात येण्यास बंदी घालणार नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.

हॉटेलवाल्यांसाठीच्या एस्‌ओपीविषयी बोलताना राणे म्हणाले की, आम्ही लवकरच हॉटेलवाल्यांसाठी एस्‌ओपी तयार करून ती त्यांना पाठवणार आहोत. हॉटेलमध्ये उतरलेल्या पर्यटकांपैकी जर कुणालाही कोविड झाल्याची लक्षणे आढळून आली तर अशा पर्यटकांना आरक्षित केलेल्या खोलीत ठेवले जावे. असे हॉटेलवाल्यांना एस्‌ओपीद्वारे कळविण्यात येणार असल्याचे आरग्यमंत्री म्हणाले.
हॉटेल्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे काम हाती घेतले असून एक खोली विलगीकरणासाठी दर एका हॉटेलात आरक्षित करण्याची हॉटेलवाल्यांना अट घालण्यात येणार आहे.

गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांवरही विशेष लक्ष ठेवले जात असून त्यामुळे कोविडमुळे होणारे मृत्यू कमी झाले असल्याचे राणे म्हणाले.