राज्यात ३ मृत्यूंसह १६२ बाधित

0
240

राज्यात चोवीस तासांत नवीन १६२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन झाले आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ६७० एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४६ हजार ३४४ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या १३६४ एवढी झाली आहे.

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आणखी १७८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६१ टक्के एवढे आहे. बर्‍या झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ३१० एवढी झाली आहे.

बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत नवीन १७१६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या आणखी १७२ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३६ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

पणजीत नवे रुग्ण
बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात तीन कोरोना रुग्णांचे निधन झाले आहे. फातोर्डा येथील ६६ वर्षीय पुरुष रुग्ण, म्हार्दोळ येथील ६७ वर्षीय महिला रुग्ण, हळदोणा येथील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे.

पणजी परिसरात नवीन ८ रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची सध्याची संख्या ९३ झाली आहे. कॅसिनोमध्ये काम करणारा आणखी एक कर्मचारी कोरोनाबाधित झाला आहे. करंजाळे, मिरामार, पाटो-रायबंदर, सांतइनेज या भागात नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
फोंड्यात १०७ रुग्ण, मडगाव परिसरात १०३ रुग्ण, वास्कोत ८६ रुग्ण, पर्वरी येथे ७७ रुग्ण, चिंबल येथे ६६ रुग्ण आहेत.