दुपदरीकरण काम थांबवा

0
256

>> कॉंग्रेसचे हुबळी रेल्वे अधिकार्‍यांना निवेदन

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्त्वाखाली काल सुमारे १०० कॉंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी हुबळी येथे जाऊन दक्षिण, पश्‍चिम रेल्वेचे अतिरिक्त सरव्यवस्थापक पी. के. मिश्रा यांची भेट घेतली व रेल्वेने पर्यावरणाची होऊ घातलेली मोठी हानी लक्षात घेऊन रेल्वे दुपदरीकरणाचा प्रस्ताव मागे घ्यावा, असे निवेदन देत मागणी केली. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मोले वाचवा’ व ‘कोळसा नको’ अशा घोषणा दिल्या.

दिगंबर कामत व गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्त्वाखाली हुबळी येथे गेलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, उत्तर गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष विजय भिके, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष जोजेफ डायस, युवा कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, कॉंग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस जनार्दन भंडारी आदींचा समावेश होता.
दक्षिण पश्‍चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक पी. के. मिश्रा यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, जोजेफ डायस, विजय भिके व रॉयला फर्नांडिस आदींचा समावेश होता.

वरील प्रश्‍नी मिश्रा यांना सादर केलेल्या निवेदनातून कॉंग्रेसने रेल्वे दुपदरीकरणाला गोव्यातील जनतेचा तीव्र विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. फक्त कोळसा वाहतुकीसाठी हे केले जात असून त्यासाठी लोकांची निवासी घरे पाडावी लागणार असून मोले येथील अभयारण्याचा विद्ध्वंस होणार असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.