मुंबई इंडियन्स आयपीएल चॅम्पियन

0
256

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५ गडी व ८ चेंडू राखून पराभव करत पाचव्यांदा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. दिल्लीने विजयासाठी ठेवलेले १५७ धावांचे लक्ष्य मुंबईने १८.४ षटकांत ५ गडी गमावून गाठले. यंदाच्या मोसमात मुंबईने दिल्लीवर मिळविलेला हा सलग चौथा विजय ठरला. या विजयासह मुंबई हा आयपीएलचे जेतेपद राखणारा चेन्नईनंतरचा दुसरा संघ ठरला. या मोसमापूर्वीच ‘मुंबई’ला दिलेला ट्रेंट बोल्ट दिल्लीच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरला.

लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक यांनी केवळ ४.१ षटकांत ४५ धावांची खणखणीत सलामी संघाला दिली. फलंदाजीत भोपळाही फोडू न शकलेल्या स्टोईनिसने आपल्या स्पेलच्या पहिल्याच चेंडूवर डी कॉकला बाद करत ही जोडी फोडली. कर्णधार रोहित शर्मा याच्या चुकीच्या ‘कॉल’मुळे सूर्यकुमार याला बाद व्हावे लागले. चोरटी धाव घेण्याच्या नादात रोहित नॉन स्ट्राईकरपर्यंत पोहोचल्यानंतर सूर्यकुमारने क्रीझ सोडत कर्णधाराची विकेट वाचवण्यासाठी तंबूत परतणे पसंत केले. संघाला विजयासाठी वीस धावांची गरज असताना कर्णधार रोहित बाद झाला. त्याने ५१ चेंडूंत ६८ धावा चोपल्या. कायरन पोलार्ड (९) व हार्दिक पंड्या (३) यांना बाद करत दिल्लीने थोडा दबाव टाकला. परंतु, तोपर्यंत सामना त्यांच्या हातातून निसटला होता. ईशान किशनने आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली. १९ चेंडूंत ३३ धावा करून तो नाबाद राहिला. कृणाल पंड्या (१) याच्यासह त्याने संघाच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
तत्पूर्वी, ‘क्वॉलिफायर २’ मध्ये सनरायझर्सवर विजय मिळविलेला संघ दिल्लीने या सामन्यासाठी कायम ठेवला तर मुंबईने धवनला रोखण्यासाठी ऑफस्पिनर जयंत यादव याला लेगस्पिनर राहुल चहरच्या जागी पसंती दिली.

मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशाने दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्कुस स्टोईनिसला हैदराबादविरुद्ध सलामीला पाठवण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर दिल्लीने पुन्हा एकदा स्टोईनिसला धवनसह डावाची सुरुवात पाठवले. परंतु, डावातील पहिल्याच चेंडूवर बोल्टने स्टोईनिसला क्विंटन डी कॉककरवी झेलबाद केल्याने दिल्लीला चांगली सलामी लाभली नाही. तिसर्‍या क्रमांकावर उतरलेला अजिंक्य रहाणेदेखील फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. बोल्टचा लेगसाईडला जाणारा चेंडू छेडण्याच्या नादात रहाणे बाद झाला.
धवन मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच जयंत यादवने त्याचा त्रिफळा उडवत दिल्लीची ३ बाद २२ अशी केविलवाणी स्थिती केली. श्रेयस अय्यर (नाबाद ६५) व ऋषभ पंत (५६) यांनी ९६ धावांची भागीदारी रचत संघाला ११८ धावांपर्यंत नेले. १५व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पंत परतल्यानंतर शेवटच्या पाच षटकांत दिल्लीला केवळ ३८ धावा करणे शक्य झाले.

धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः मार्कुस स्टोईनिस झे. डी कॉक गो. बोल्ट ०, शिखर धवन त्रि. गो. यादव १५, अजिंक्य रहाणे झे. डी कॉक गो. बोल्ट २, श्रेयस अय्यर नाबाद ६५ (५० चेंडू, ६ चौकार, २ षटकार), ऋषभ पंत झे. हार्दिक गो. कुल्टर नाईल ५६ (३८ चेंडू, ४ चौकार, २ षटकार), शिमरॉन हेटमायर झे. कुल्टर नाईल गो. बोल्ट ५, अक्षर पटेल झे. रॉय गो. कुल्टर नाईल ९, कगिसो रबाडा धावबाद ०, अवांतर ४, एकूण २० षटकांत ७ बाद १५६
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ४-०-३०-१, जसप्रीत बुमराह ४-०-२८-०, जयंत यादव ४-०-२५-१, नॅथन कुल्टर नाईल ४-०-२९-२, कृणाल पंड्या ३-०-२०-०, कायरन पोलार्ड १-०-१३-०
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा झे. ललित गो. नॉर्के ६८ (५१ चेंडू, ५ चौकार, ४ षटकार), क्विंटन डी कॉक झे. पंत गो. स्टोईनिस २०, सूर्यकुमार यादव धावबाद १९, ईशान किशन नाबाद ३३, कायरन पोलार्ड त्रि. गो. रबाडा ९, हार्दिक पंड्या झे. रहाणे गो. नॉर्के ३, कृणाल पंड्या नाबाद १, अवांतर ४, एकूण १८.४ षटकांत ५ बाद १५७
गोलंदाजी ः रविचंद्रन अश्‍विन ४-०-२८-०, कगिसो रबाडा ३-०-३२-१, ऍन्रिक नॉर्के २.४-०-२५-२, मार्कुस स्टोईनिस २-०-२३-१, अक्षर पटेल ४-०-१६-०, प्रवीण दुबे ३-०-२९-०

पंजाबच्या राहुलला ऑरेंज कॅप

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल सर्वाधिक धावांसाठी दिल्या जाणार्‍या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. त्याने १४ सामन्यांत ५५.८३च्या सरासरीने व १२९.३४च्या स्ट्राईकरेटने ६७० धावा जमवल्या. नाबाद १३२ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. पाच अर्धशतके व १ शतक त्याने ठोकले.

दिल्लीच्या रबाडाला पर्पल कॅप

दिल्लीता वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याला सर्वाधिक बळींसाठी दिली जाणारी पर्पल कॅप मिळाली. रबाडाने १७ सामन्यांत ३० बळी घेतले. १८.२६च्या सरासरीने व ८.३४च्या इकॉनॉमीने त्याने हे बळी घेतले. यंदाच्या मोसमात सर्वाधिक ६५.४ षटके गोलंदाजी करताना दोनवेळा डावात चार बळी रबाडाने घेतले.

इतर पुरस्कार
उदयोन्मुख खेळाडू ःदेवदत्त पडिकल ४७३ धावा, ५ अर्धशतके, स्ट्राईकरेट ः १२४.८
शिस्तबद्ध संघ ः मुंबई इंडियन्स
कलाटणी देणारा खेळाडू ः लोकेश राहुल
सर्वाधिक स्ट्राईकरेट ः कायरन पोलार्ड ः १९१.४२
सर्वाधिक षटकार ः ईशान किशन (३०)
पॉवरप्लेयर ः ट्रेंट बोल्ट
मौल्यवान खेळाडू ः जोफ्रा आर्चर २० बळी,
१७५ निर्धाव चेंडू, ५ झेल, १० षटकार