घोषणेनंतरही मांडवीतील कॅसिनो अजूनही बंदच

0
281

येथील मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो १ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आल्याने देशी पर्यटक पर्यटक आनंदात होते. त्यामुळे रविवार १ रोजी अनेक पर्यटकांनी कॅसिनोंच्या कार्यालयाबाहेर उपस्थिती लावली होती. तथापि, कॅसिनो सुरू न झाल्याने पर्यटकांना नाराज होऊन परतावे लागले. दरम्यान, तरंगत्या कॅसिनोंमध्ये साफसफाई व इतर कामे कामगार वर्गाकडून केली जात असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत कॅसिनो व्यवहार सुरळीत होतील, अशी माहिती कामगार वर्गाकडून मिळाली आहे.

राज्यातील मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. या घोषणेमुळे राज्यात दाखल झालेले पर्यटक खूष झाले होते. तथापि, तरंगते कॅसिनो सुरू न झाल्याने पर्यटक नाराज बनले. कॅसिनो कंपन्यांनी तरंगते कॅसिनो पुन्हा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. गेले आठ महिने कॅसिनो बंद असल्याने साफसफाई, विद्युत रोषणाई व इतर कामावर भर देण्यात आला आहे. कामगार वर्गाला सुट्टी देण्यात आल्याने अनेक कामगार मूळ गावी गेले आहेत. कॅसिनोंमध्ये कामगार वर्ग पूर्ण क्षमतेने रुजू झालेला नाही. थोडे कामगार रुजू झाले आहे. बहुतांश कामगार रुजू होण्यास आणखी एक – दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्य्ता व्यक्त केली जात आहे.