मार्च २०२१ पर्यंत कोविड लस भारतीयांसाठी उपलब्ध होईल

0
111

>> भारत बायोटेकने दिली माहिती

भारत बायोटेकने आयसीएमआर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेली कोरोनावरील लस २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यांत भारतीयांसाठी उपलब्ध होईल अशी माहिती दिली आहे. या लशीची चाचणी १४ राज्यांत विविध रुग्णालयांतून सुरू आहे. प्रत्येक रुग्णालयात अंदाजे २००० स्वयंसेवकांवर या लशीची चाचणी सुरू आहे.
लशीचे उत्पादन करण्यात आल्यानंतर सरकारी रुग्णालयांत तसेच सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा करणार्‍या दुकानांना या लशीचा पुरवठा करण्याबाबत सध्या चर्चा सुरू असून लशीची किंमत मात्र अद्याप निश्‍चित करण्यात आलेली नसल्याची माहिती बायोटेककडून देण्यात आली. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोरोना लशीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीला परवानगी देण्यात आल्यानंतर ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत लस उपलब्ध होईल की नाही हे आत्ताच सांगणे अशक्य असून रोगप्रतिकारक शक्ती व कार्यक्षमतेवर चाचणीचे यश अवलंबून असते. त्यामुळे जर आपत्कालीन परवान्यासाठी अर्ज केला नाही तर चाचणी जानेवारीपर्यंत संपेल व त्यानंतर यूकेतील चाचणी प्रक्रिया जानेवारीमध्ये भारतात आम्ही दाखल करू शकतो अशी माहिती बायोटेकच्या अधिकार्‍यांनी दिली.
चाचणीसाठी आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिले जाणार असून मंत्रालयातून मंजुरी मिळाल्यानंतर भारतात चाचण्या केल्या जातील अशी माहिती यावेळी देण्यात आली.