गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सात नव्या उद्योग प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. काल मंडळाच्या बैठकीनंतर बोलताना सावंत यांनी वरील माहिती दिली.
गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला नव्या प्रकल्पांना जलद गतीने मंजुरी देता यावी यासाठी आयपीबीच्या नियमांत सरकार दुरुस्ती घडवून आणणार असल्याचेही सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. नव्या प्रकल्पांना अडथळे येऊ नयेत यासाठी औद्योगिक विकास महामंडळ, नगर आणि नियोजन मंडळाला गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळावर प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
यासंबंधी बोलताना उद्योगमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, जे उद्योग जास्त रोजगार देऊ शकतील अशा उद्योगांना, तसेच ज्या उद्योगांमुळे वस्तू व सेवा कर महसुलात वाढ होईल अशा उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल. प्रकल्पांना विनाविलंब मंजुरी देता यावी यासाठी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची दर २२ दिवसांनी एकदा फेरआढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
औद्योगिक विकास महामंडळ व गंतुवणूक प्रोत्साहन मंडळ यांच्यात समन्वयाची गरज असून त्यासाठीही पावले उचलण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.