ऑक्टोबरमध्ये राज्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

0
261

>> दैनंदिन सरासरी सप्टेंबरमधील १८० वरून ६० वर

राज्यात ऑक्टोबर महिन्यात कोविड स्वॅब तपासणीचे प्रमाण कमी असून कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट होत असल्याचे दिसून येत आहे. इस्पितळात दाखल होणार्‍या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पंचवीस दिवसांत १ हजार ६१५ कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. गत सप्टेंबर महिन्यात ५ हजार ४२३ कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल केले होते.

ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्ण इस्पितळात दाखल होण्याचे दर दिवशीचे सरासरी प्रमाण ६० च्या आसपास आहे, तर, सप्टेंबर महिन्यात दर दिवशीचे प्रमाण १८० रूग्णांच्या आसपास होते. ऑक्टोबर महिन्यात राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, तसेच सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्यात सध्या कोरोना रुग्णाच्या संख्येत घट होत असली तरी येत्या हिवाळ्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने नागरिकांत कोरोना विषाणूची भीती कायम आहे.

राज्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत भरपूर वाढ झाली होती. त्या महिन्यात ५५ हजार ८३३ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली होती. त्यात १६ हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. कोरोना पॉझिटिव्ह २३६ रुग्णांचा बळी गेला होता. तर, १४ हजार ५४८ कोरोना रुग्ण बरे झाले होते.

राज्यात ऑगस्ट महिन्यात सर्वांधिक ७१ हजार ६६९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात ११ हजार ५०५ रुग्ण आढळून आले होते. ऑक्टोबर महिन्याच्या पंचवीस दिवसांत ३५ हजार ५४९ स्वॅबच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे. गत महिन्याच्या तुलनेत स्वॅब तपासणीच्या संख्येत घट झालेली दिसून येत आहे. या ऑक्टोबर महिन्यात १४८ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. ८८२४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, १० हजार ९६५ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सरासरी दर दिवशी १५०० स्वॅबची तपासणी केली जात आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी स्वॅबची तपासणी दोन ते अडीच हजारांपर्यत वाढविण्याची जाहीर केलेले आहे.

२४ तासांत कोरोनाचे आणखी सहा बळी

राज्यात चोवीस तासांत आणखी ६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली. त्या सहा मृत्यूंमध्ये म्हापसा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे.
ऑक्टोबर महिन्यातील कोरोनाने झालेल्या मृत्यूच्या संख्येने १५० चा टप्पा पार केला असून कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या १५४ एवढी झाली आहे. तर, राज्यातील कोरोना रुग्ण मृत्यूची एकूण संख्या ५८२ झाली आहे.

बांबोळी येथील गोमेकॉमध्ये उपचार सुरू असताना चार कोरोना रुग्णांचे निधन झाले. मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात २ रुग्णांना मृतावस्थेत आणण्यात आले. त्या दोन रुग्णांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मडगाव येथील ६८ वर्षाचा पुरुष रुग्ण, म्हापसा येथील ५८ वर्षाचा पुरुष रुग्ण, ५६ वर्षाची महिला रुग्ण आणि ५८ वर्षाच्या पुरुष रुग्ण, बाणावली येथील ५२ वर्षाचा पुरुष रुग्ण, फातोर्डा येथील ६४ वर्षाच्या महिला रुग्णाचे निधन झाले आहे.