आयपीएल : ‘गब्बर’चा नवा कीर्तिमान

0
152
  • सुधाकर रामचंद्र नाईक

दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या दहा सामन्यांतील १४ गुणांसह अग्रस्थानावर असून ‘गब्बर’चा धडाका जारी राहिल्यास श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखालील उमद्या दिल्लीकर संघाला पहिले आयपीएल जेतेपद मिळविण्याचे स्वप्न साकारण्याची नामी संधी आहे.

टीम इंडियाचा ‘धाकड’ सलामीवीर शिखर धवनने प्रतिष्ठेच्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये नवा कीर्तिमान प्रस्थापित करताना सलग दोन शतके नोंदण्याचा पराक्रम केला. ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या या प्रतियोगितेत आतापर्यंत चार शतकांची नोंद झालेली असून ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’चा कर्णधार के. एल. राहुल आणि त्याचा सलामीवीरसाथी मयंक अगरवाल यांनी प्रत्येकी एक शतक नोंदले आहे, तर ‘गब्बर’ या नामाभिधानाने सुपरिचित असलेल्या शिखरने ‘चेन्नई सुपर किंग्ज’ आणि ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ यांच्याविरुद्ध सलग शतके झळकवीत नवा कीर्तिमान प्रस्थापित केला.
‘चेन्नई सुपर किंग्ज’विरुद्धच्या विजयात शिखरने नाबाद १०१ धावा ठोकल्या होत्या, पण ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’विरुद्धच्या सामन्यात मात्र त्याची नाबाद १०६ धावांची खेळी ‘दिल्ली कॅपिटल्स’ला पराभवापासून रोखू शकली नाही. सलग शतकांच्या आयपीएल कीर्तिमानाबरोबरच धवनने भारतीय कर्णधार वीराट कोहली (५,७७९), सुरेश रैना (५,३६८) आणि रोहित शर्मा (५,११८) या आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा ओलांडलेल्या ‘आयपीएल हिरोज’च्या पंक्तीतही स्थान मिळविले. आयपीएलमध्ये आतापर्यंत ६२ शतकांची नोंद झालेली आहे. वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने सर्वाधिक सहा शतके नोंदलेली असून त्यापाठोपाठ वीराट कोहली (५), ऑस्ट्रेलियन डेविड वॉर्नर, शेन वॉटसन (प्रत्येकी ४), द. आफ्रिकेचा ए. बी. डिविलियर्स (३), वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे, ब्रँडन मॅकलम, मुरली विजय, के. एल. राहुल, संजू सॅमसन (प्रत्येकी २) असा क्रम आहे. पण शिखरने सलग दोन शतके झळकवीत नवा पराक्रम नोंदला आहे.
५ डिसेंबर १९८५ रोजी नवी दिल्लीत जन्मलेल्या शिखर धवनने अंडर १९ विश्‍वचषकात ३ शतकांसह सर्वाधिक ५०५ धावा ठोकीत आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले. राष्ट्रीय स्पर्धांत त्याची दिल्ली रणजी संघात निवड झाली आणि वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आदी अव्वल फलंदाजांच्या साथीत त्याने दमदार फलंदाजीचे दर्शन घडविले. पण राष्ट्रीय संघातील सकस स्पर्धेंमुळे भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. अखेर २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत शिखरला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. पण पहिल्याच सामन्यात ‘भोपळा’ फोडता न आल्याने शिखर संघाबाहेर गेला. सुमारे तीनेक वर्षे बदली खेळाडू, सहप्रवासी ठरलेल्या धवनला अखेर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. वीरेंद्र सेहवागला वादग्रस्तरीत्या संघातून वगळण्यात आले आणि शिखरला भारतीय डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली. त्याने तिचा पुरेपूर लाभ उठवीत धडाकेबाज खेळीत ८५ चेंडूत जलद कसोटी शतक आणि सामन्यात १७४ चेंडूत आकर्षक १८७ धावांची खेळी साकारली. या बहारदार खेळीनंतर शिखरला वन-डे संघातही स्थान मिळाले आणि २०१३ मधील चँपियन्स चषक स्पर्धेत त्याने पाच सामन्यांत दोन शतकांसह ३६३ धावा चोपीत ‘प्लेयर ऑफ दी टुर्नांमेंट’ किताबही मिळविला. त्याच वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही शिखरने आपला बहर जारी राखीत १ शतक आणि २ अर्धशतकांसाह सहा सामन्यांत २८४ धावा नोंदल्या. वेस्ट इंडीजविरुद्धच्या स्वगृहीच्या मालिकेतही शिखरने बहारदार फलंदाजीचे दर्शन घडवीत कॅलेंडर वर्षात भारतातर्फे सर्वाधिक धावा नोंदल्या. नंतर झालेल्या द. आफ्रिका दौर्‍यात मात्र धवनची फलंदाजीतील लय हरपली. २०१४ मधील इंग्लंड दौर्‍यात तर तो साफ असफल ठरला. सहा डावांत ३७ धावा ही त्याची मोठी धावसंख्या होती. २०१४-१५ मधील बोर्डर-गावस्कर चषक मालिकेतही ब्रिस्बेन कसोटीतील ८१ धावांची खेळी वगळता धवनला विशेष चमक दर्शविता आली नाही आणि कसोटी संघातील स्थानही गमवावे लागले.
नैसर्गिक फटकेबाजीत माहीर असलेला शिखर आपल्या आक्रमक डावखुर्‍या फटकेबाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरायचा. विशेषत: एक दिवसीय क्रिकेटमध्ये त्याची बॅट विशेष तळपायची. २०१५ मधील विश्‍वचषकात त्याने दमदार प्रारंभात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध ७२ धावांची धडाकेबाज खेळी केली. तसेच एमसीजीवरील द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात डेल स्टेन, मॉर्कल आदी तेज गोलंदाजांचा समाचार घेत १३७ धावा ठोकीत भारताला विजय मिळवून दिला. शिखरने या प्रतियोगितेत ४१२ धावा चोपल्या आणि विशेष म्हणजे भारतीय संघाला दमदार प्रारंभ करून देताना रोहित शर्माच्या सहयोगात तीन शतकी सलामी नोंदल्या. २०१७ मध्ये त्याने वन-डेमधील जलद तीन हजार धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय फलंदाज बनण्याचा मान मिळविला, तर चार हजार धावांचा जलद टप्पा गाठणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. २०१९ मधील विश्‍वचषकातील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सचा बाउन्सर हातावर आदळल्याने शिखर जायबंदी झाला आणि त्याला संघाबाहेर जावे लागले. हाताला झालेल्या दुखापतीनंतरही शिखरने या सामन्यात ११७ धावा चोपल्या. नंतर त्याच्या जागी ऋषभ पंतला पाचारण करण्यात आले.
नैसर्गिक आक्रमकता हे प्रमुख बलस्थान असलेल्या शिखरने इंडियन प्रिमियर लीगमध्येही उशिराने का होईना, आपला ठसा उमटविताना सलग दोन शतकांचा नवा कीर्तिमान प्रस्थापिला. २००८ मधील शुभारंभी आयपीएलमध्ये ‘दिल्ली डेयर डेविल्स’ या आपल्या ‘होम टीम’मधून खेळलेल्या धवनने वीरेंेद्र सेहवाग, गौतम गंभीर, ए. बी. डिविलियर्स, कॉलिंगवूड या स्टार्सच्या उपस्थितीतही तिसर्‍या क्रमावर खेळत १४ सामन्यांत ३४० धावा नोंदल्या. २००९ मध्ये ‘दिल्ली डेयर डेविल्स’ने त्याला अनपेक्षितपणे वगळले आणि ‘मुंबई इंडियन्स’मध्ये स्थान मिळाले. पण तेथे त्याला विशेष संधी मिळाली नाही. पहिल्या मोसमात केवळ पाच तर दुसर्‍या वर्षी दहा सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली. पुढील वर्षी धवनने ‘डेक्कन चार्जर्स’मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्यतम ठरला. हैदराबादच्या संघातर्फें खेळताना शिखरच्या आयपीएल खेळीला नवे आयाम मिळाले. ‘डेक्कन चार्जर्स’ आणि नंतर ‘सनरायर्झ हैदराबाद’साठी तो महत्त्वपूर्ण ‘ऍसेट’ ठरला. गतवर्षी २०१९ मध्ये शिखर आपली ‘होम टीम’ दिल्ली कॅपिटल्समध्ये परतला. गतवर्षी शानदार पुनरागमनात शिखरने ‘दिल्ली कॅपिटल्स’तर्फे १६ सामन्यांत ५२१ धावा नोंदल्या. विद्यमान प्रतियोगितेत तर धवनने पहिल्या दहा सामन्यांतच २ शतके आणि दोन अर्धशतकांसह ४६५ धावा नोंदवीत दिल्लीकर संघाची आगेकूच जारी राखण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सध्या दहा सामन्यांतील १४ गुणांसह अग्रस्थानावर असून ‘गब्बर’चा धडाका जारी राहिल्यास श्रेयश अय्यरच्या नेतृत्वाखालील उमद्या दिल्लीकर संघाला पहिले आयपीएल जेतेपद मिळविण्याचे स्वप्न साकारण्याची नामी संधी आहे.

आयपीएल शतकवीर
वर्ष फलंदाज फ्रॅचाइज धावा प्रतिस्पर्धी सामनास्थळ
२००८ ब्रँडन मॅकलम केकेआर १५८* आरसीबी बंगळुरू
२००८ मायक हसी सीएसके ११६* केइपी मोहाली
२००८ अँड्र्यू सायमंडस डीसी ११७* आरआर हैदराबाद
२००८ ऍडम गिलख्रिस्ट डीसी १०९* एमआय मुंबई
२००८ सनथ जयसूर्या एमआय ११४* सीएसके मुंबई
२००८ शॉन मार्श केइपी ११५ आरआर मोहाली
२००९ एबी डिविलियर्स डीडी १०५* सीएसके दर्बान
२००९ मनिष पांडे आरसीबी ११४* सीएसके सेंच्युरियन
२०१० युसुफ पठान आरआर १०० एमआय मुंबई
२०१० डेविड वॉर्नर डीडी १०७* केकेआर दिल्ली
२०१० मुरली विजय सीएसके १२७ आरआर चेन्नई
२०१० महेला जयवर्दने केइपी ११०* केकेआर कोलकाता
२०१० पॉल वॉर्ल्थटी केइपी १२०* सीएसके मोहाली
२०११ सचिन तेंडुलकर एमआय १००* केटीके मुंबई
२०११ खिस गेल आरसीबी १०२* केकेआर कोलकाता
२०११ वीरेंद्र सेहवाग डीडी ११९* डीसी हैदराबाद
२०११ ख्रिस गेल आरसीबी १०७ केइपी बंगळुरू
२०११ ऍडम गिलख्रिस्ट केइपी १०६ आरसीबी धरमशाला
२०१२ अजिंक्य रहाणे आरआर १०३* आरसीबी बंगळुरू
२०१२ केवीन पीटरसन डीडी १०३* डीसी दिल्ली
२०१२ डेविड वॉर्नर डीडी १०९* डीसी हैदराबाद
२०१२ रोहित शर्मा एमआय १०९* केकेआर कोलकाता
२०१२ ख्रिस गेल आरसीबी १२८* डीडी दिल्ली
२०१२ मुरली विजय सीएसके ११३ डीडी चेन्नई
२०१३ शेन वॉटसन आरआर १०१ सीएसके चेन्नई
२०१३ ख्रिस गेल आरसीबी १७५* पीडब्ल्यूआय बंगळुरू
२०१३ सुरेश रैना आरसीबी १००* केइपी चेन्नई
२०१३ डेविड मिलर केइपी १०१* आरसीबी मोहाली
२०१४ लेंडल सिमन्स एमआय १००* आरसीबी मोहाली
२०१४ वीरेंद्र सेहवाग केइपी १२२ सीएसके मुंबई
२०१४ वृध्दीमान साहा केइपी ११५* केकेआर बंगळुरू
२०१५ ब्रँडन मॅकलम सीएसके १००* एसएच चेन्नई
२०१५ ख्रिस गेल आरसीबी ११७ केइपी बंगळुरू
२०१५ एबी डिविलियर्स आरसीबी १३३ एमआय मुंबई
२०१५ शेन वॉटसन आरआर १०४* केकेआर मुंबई
२०१६ क्विंटक डी कॉक डीडी १०८ आरसीबी बंगळुरू
२०१६ विराट कोहली आरसीबी १३३ एमआय मुंबई
२०१६ स्टीव स्मिथ आरपीएस १०१ जीएल पुणे
२०१६ विराट कोहली आरसीबी १००* जीएल राजकोट
२०१६ एबी डिविलियर्स आरसीबी १२९* जीएल बंगळुरू
२०१६ विराट कोहली आरसीबी १०९ जीएल बंगळुरू
२०१६ विराट कोहली आरसीबी ११३ केइपी बंगळुरू
२०१७ संजू सॅमसन डीडी १०२ आरपीएस पुणे
२०१७ हासिम आमला केइपी १०४* एमआय इंदूर
२०१७ डेविड मिलर एसएच १२६ केकेआर हैदराबाद
२०१७ बेन स्टोकस आरपीएस १०३* जीएल पुणे
२०१७ हासिम आमला केइपी १०४ एमआय मोहाली
२०१८ ख्रिस गेल केइपी १०४* एसएच मोहाली
२०१८ शेन वॉटसन सीएसके १०६ आरआर पुणे
२०१८ ऋषभ पंत डीसी १२८* एसएच दिल्ली
२०१८ अंबाती रायुडू सीएसके १००* एसएच पुणे
२०१८ शेन वॉटसन सीएसके ११७* एसएच मुंबई
२०१९ संजू सॅमसन आरआर १०२* एसएच हैदराबाद
२०१९ जॉनी बैयरस्टॉ एसएच ११४ आरसीबी हैदराबाद
२०१९ डेविड वॉर्नर एसएच १००* आरसीबी हैदराबाद
२०१९ के. एस. राहूल केइपी १००* एमआय मुंबई
२०१९ विराट कोहली आरसीबी १०० केकेआर कोलकाता
२०१९ अजिंक्य रहाणे आरआर १०५* डीसी जयपूर
२०२० के. एल. राहूल केइपी १३२* आरसीबी दुबई
२०२० मयंक अगरवाल केइपी १०६ आरआर शारजा.
२०२० शिखर धवन दिल्ली कॅपिटल्स १०१* सीएसबी शारजा.
२०२० शिखर धवन दिल्ली कॅपिटल्स १०६* केइपी दुबई.