दुर्गा निवास

0
206
  • शरत्चंद्र देशप्रभू

कोकणात एक समज आहे, मूळ मठीत दिवा लागला तर आपल्या भाग्याचे दिवे उजळतात. परंतु एक खरे की, घर राखून असीम मानसिक शांतता लाभते. कुठल्याही वाड्याला, घराला जोपर्यंत माणसांची ऊब असते तोपर्यंत ‘घरघर’ लागण्याची शक्यता कमीच.

पेडण्यातील शिगमोत्सवाला आज जरी सांकेतिक स्वरूप आले तरी माझ्या या काळात पेडण्यात जाण्याच्या सवयीत खंड पडलेला नाही. काही कारणास्तव जरी मुक्काम शक्य झाला नाही तरी सात दिवसांच्या उत्सवानिमित्त एकदोन वेळा पेडण्यात गेल्याशिवाय अस्वस्थ मनाला शांती मिळत नाही.
होळीपौर्णिमेला जाऊन आल्यावर लगेच दोन दिवसांनी पेडण्याला जायची संधी लाभली; किंबहुना साधली! वर्षातून किमान दोनवेळा तरी मी बसने पेडण्याला जाऊन येतो. यामुळे एक आगळाच प्रवासाचा अनुभव येतो. विशेषतः बसप्रवाशांची देहबोली अन् मालवणी भाषेतील हेल ऐकून मन तृप्त होते. बस पेडण्याला पोहोचेपर्यंत दुपारचे बारा वाजले. बसस्टॅण्ड श्रीरवळनाथ मंदिराच्या नजीकच. श्री रवळनाथाचे दर्शन हा माझ्या कार्यक्रमपत्रिकेवरचा प्राधान्यक्रम. श्री देव रवळनाथावर अपार श्रद्धा लहानपणापासून मनात बिंबलेली. मूर्तीवर मन एकाग्र केल्यावर मनावरचा ताण हलका होतो अन् आवारातील पवित्र तरंग मनाच्या गाभार्‍यात उमटतात. या ग्रामदैवतात प्रखरता अन् शीतलता याचा अनोखा संयोग दृगोच्चर होतो. भगवती मंदिराला भेट देऊन ‘सन्मान हॉटेल’मध्ये थोडी पोटपूजा केली. पन्नास वर्षांपूर्वी आमच्यावर बंधने होती. आता ती कालानुरूप बरीच सैल झाली आहेत. यानंतर तडक घरी पोहोचलो. मूळ घरातील समंधाला दंडवत घालून जवळच वास्तूत जी आमच्या आजोबांनी दूरदृष्टी ठेवून मूळघराशी मूळबंध न तोडता उभारली होती, त्या घरात पाऊल टाकले. आजोबाच वापरत असलेल्या खाटीवर पडल्यापडल्या मनाच्या सांदिकोपर्‍यांत जपलेले संदर्भ, क्षण पुनरुज्जीवित झाले. आजच्या प्रगतीचा वेग आणि आंतरिक लवचीकता याचा समन्वय साधला तर संवेदना बोथट होत नाही. प्रवेशद्वारावर डावीकडे भितीत कोरलेली एक पाटी आहे. यावर काळ्या दगडाने कोरलेली अक्षरे लहानपणी मुळाक्षरांशी ओळख झाल्यावर आम्ही वाचत असू. परंतु ‘दुर्गा निवास, प्रवेश- २५-४-१९४२’ या शब्दाचा अर्थच कळत नव्हता. तो जाणून घ्यायची तसदी पण आम्ही भावंडांनी घेतली नाही. परंतु यांत्रिकरीत्या रिक्त वेळात या पाटीचे वाचन चालूच होते. एक सुप्त आकर्षण पण होते. वयात आल्यावर कळले की, आजोबांनी वास्तूला आपल्या दिवंगत मातोश्रीचे नाव दिले होते. आमचे वास्तव्य या घरात बालपणातील पाचसहा वर्षांपुरतेच. परंतु इतरत्र गोव्यात राहिल्यानंतर पण पेडण्यात आमचे येणे उत्सवानिमित्त अन् उन्हाळी सुट्टीनिमित्त होत असे. आता येणे-जाणे जरी पूर्वीच्या मानाने कमी झाले तरी चौथ्या पिढीचे आकर्षण कमी झालेले नाही. आज चॅनल बदलतात तशी घरे बदलतात. कुठल्याच जागेत मन गुंतवणे नाही. या पार्श्‍वभूमीवर आमची या घराबद्दलची ओढ अनाकलनीयच असे म्हणावे लागेल.
आमच्या मूळ घरात कुटुंबाचा विस्तार होऊ लागला तशी जागा अपुरी पडू लागली. तसे आजोबांनी हे त्याकाळच्या संदर्भात छोटेखानी घरकुल उभारले. स्थित्यंतरावेळी घराला ना दारे, ना खिडक्या अन् मध्यरात्री बिबटे मळीतल्या ओहोळावर पाणी पिण्यासाठी गुरगुरत जात. परंतु ना घरातील माणसांना बिबट्याची भीती वाटली, ना बिबट्याला घरातील माणसाच्या रक्ताची ओढ! त्या काळचे सारेच विपरित. घरचा राखणदार म्हणजे ‘राष्टोळी’ हातातला सोटा आपटीत जाणार, तर हजारो वर्षांपासून वास्तव्य करणारा सर्परूपी ब्राह्मण आपले संरक्षणकवच पुरवणार. या सार्‍याला त्याकाळी अनन्यसाधारण महत्त्व होते, व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवनात. आजी तर भितोंडीतून जाणार्‍या राष्टोळीच्या सोट्याचा खळ्ळ खळ्ळ आवाज कैकदा ऐकल्याचे सांगत होती. भुसनोड, नानेरवाडा, मळीवाडा अन् कोंडलवाडा यांत अशा चमत्कारिक आविष्काराचे जिवंत साक्षीदार होते. काळाच्या ओघात हे सारे लुप्त झाले, किंबहुना हे जाणवण्याचे सहावे इंद्रीय तर्कनिष्ट विचारसरणीमुळे बोथट झाले असेल. परंतु तो अंधश्रद्धेचा भाग मानणे म्हणजे पूर्वजांवर अविश्‍वास प्रकट करणे ठरेल. काही का असेना, या अतिमानुष अनुभवकथनामुळे नैतिक आचरणाचे कसोशीने पालन होत असे. आमचा जन्म होईपर्यंत या घरकुलाने चांगलाच आकार घेतला होता. घराभोवतीचे कुंपण म्हणजे ‘गडगा’- एकावर एक ठेवलेले ओबडधोबड दगड. घराच्या दर्शनी भागाला पडवी किंवा व्हरांडा- इंग्रजी ‘एल’ या आकाराचा. या पडवीबाहेर आम्ही मुले पडू नये म्हणून कुठूनतरी आणलेली, वापरलेली लाकडी ‘गरात.’ पडवी ओलांडून आत आल्यावर एक आयताकृती ‘साल.’ याच्या डाव्या बाजूला ओळीने तीन खोल्या. यातील पहिलीचा उपयोग दिवाणखाना यादृष्टीने केला जायचा. सालानंतर सुबक माजघर. दोन खिडक्या असलेले. घराचा पाया उंच असल्यामुळे या खिडक्यांना आपोआप पहिल्या मजल्यावरच्या खिडक्यांचे स्थान प्राप्त झाले होते. दोन पायर्‍या उतरल्यावर एक छोटासा चौक. याला पाठीमागे भव्य खिडकी अन् उजवीकडे मागीलदार अन् दहा-बारा पायर्‍यांचा कठड्यासह जिना. यालाच लागून स्वयंपाकघर अन् न्हाणीघर… नेहमीसारखे बिनदरवाजाचे. दिवाणवजा खोली फोटो फ्रेमनी भरलेली. अजून ते तसेच आहे. परंतु व्यवस्थित लावलेले. बालपणी घराच्या जमिनी शेणामातीच्या. पोपडे आलेल्या. १९५४ च्या दरम्यान या घराचे थोडेफार नूतनीकरण तीर्थरूपानी हाती घेतले. आजोबांचा या घरावर सारा जीव. भिंतीवर खिळा ठोकला तरी यांचे अंग शहारणार. याचमुळे घराचा सांभाळ करण्याचे आश्‍वासन दिल्यावरच कावळा पिंडाला शिवला. वैज्ञानिक युगात हे थोतांड असेल, परंतु त्यामुळे परिस्थितीत अन् मानसिकतेत फरक पडणार नाही. वडिलांनी दिवाणखान्याच्या अन् झोपण्याच्या खोलीला सुंदर कोरेयन मार्बल (मार्मर) बसवले. मार्बलच्या काळ्या-पांढर्‍या चिप्सचे वेगळ्याच रसायनाने कॉंक्रीटवर थर काढणे म्हणजे त्याकाळी ‘मार्मर’ घालणे. हे सारे सुकल्यावर गुळगुळीत चौकोनी दगडाने घासून काढून त्यावर पॉलिश करणे. त्याकाळी फरशा गुळगुळीत करणारी विजेवर चालणारी मशीन नव्हती. या मार्मरला डिझाईन करतेवेळी कै. रामा या कारागिराला बरेच त्रास घ्यावे लागले. अजूनही साठ वर्षांनंतर या मार्मरच्या जमिनीचे तेज अबाधित राहिले आहे. वडिलांनी भिंती कोरून लाकडी कपाटे बसवली. अजून यात आजोबांचा ग्रंथसंभार आहे. पोर्तुगीज, मराठी, इंग्रजी अन् कायदेविषयक पुस्तके, तसेच जिकिरीने पैदा केलेला सातारा संस्थानचा इतिहास आहे. यात कामोयश यांच्या काव्याच्या प्रती असतील, मॅकोले, बर्क यांची निवडक संसदीय भाषणे असतील. क्रमवारी शास्त्रोक्त नसली तरी व्यवस्थित.

गेल्या ऐंशी वर्षांत या घराने कितीतरी स्थित्यंतरे पाहिली. सरंजामशाही पाहिली, गोवामुक्ती पाहिली, लोकशाही पाहिली, ‘कामरा’चे पंचायतीत, नगरपालिकेत झालेले स्थित्यंतर पाहिले. सणासुदीला हे घर उजळून गेलेले अन् सरकारी कामानिमित्त अन्य ठिकाणी गेल्यावर दाराला लावलेले कुलूप पण पाहिले. थोरल्या बंधूचे थाटामाटाने साजरे केलेले वाढदिवस पाहिले. माणसांचा राबता पाहिला अन् आताचा एकाकीपण झेलला. शेजारचा कोलाहल अन् मुलांचा किलबिलाट पाहिला तसेच आजचा विजेचा झगमगाटही पाहिला. पूर्वी रात्रीचा सारा कारभार बुधल्या अन् काचेच्या चिमण्यांच्या सहाय्याने होत असे. नंतर काही घरांत पेट्रोमॅक्स आले. आमच्या पण घरात पणजोबांच्या बंद केलेल्या सोडा-लेमन दुकानातला पेट्रोमॅक्स आला. कालांतराने वडिलांनी- बहुधा १९६० साली- नवाकोरा पेट्रोमॅक्स आणला. या पेट्रोमॅक्सच्या उजेडात पडवी अन् सालाचा काही भाग उजळून जात असे. अंगणात पण चांगलाच प्रकाश पडत असे. भिंतीवरच्या पाली दबा धरून किडे मटकावताना दिसत. काही वाड्यांत अल्लाउद्दीन दिवा पण लावला जाई. हा दिवा म्हणजे पॅट्रोमॅक्सची सुधारित आवृत्ती.

बालपणात कितीतरी नातेवाईक या घरात राहिले. अपुर्‍या साधनसुविधा. विहिरीचे पाणी रहाटाद्वारे ओढणे अन् वर घरात साठवणे. पुरुषमंडळीच्या आंघोळी तळीच्या गार पाण्यात. रात्री शौचविधीसाठी खाली ‘शेतखान्या’वर जायचे झाले म्हणजे कंदील, आगपेटी अन् नवीनच आलेले एव्हरेडीचे छोटे टॉर्च यांची बांदाबस्ती. या घरात राहिलेली थोरली मावळण अंधुकपणे आठवते; परंतु धाकटी मावळण म्हणजे आजोबांची धाकटी बहीण ठळकपणे आठवते. आमच्या पणजोबांचा मुक्काम उन्हाळ्याच्या दिवसांत पडवीत, तर हिवाळ्यात दिवाणखान्यात. यांना अरुंद अन् त्याही लाकडी वीण असलेल्या सोफ्यावर छान झोप येत असे. दुपारी झोपण्यासाठी या सोफ्याचा वापर आम्ही करत असू. परंतु ढेकणांना हे अतिक्रमण पसंत नसावे. कारण यांच्या गनिमी हल्ल्यामुळे जीव मेटाकुटीस येत असे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमचा एक आठवडा मुक्काम असे, तर दसर्‍यानिमित्त किमान पंधरवडा. या दरम्यान कितीतरी नातेवाईकांची भेट होत असे.

विजयादशमीला आपट्याची पाने देण्यासाठी किमान तीस तरी लोक येत. समाजाच्या सर्व स्तरांतील. आता पणजीहून पहाटे चार वाजता तरंगे बाहेर पडण्यापूर्वी पोहोचणे हा पायंडा पडलेला आहे. रात्रीच्या जेवणानंतर पेेेट्रोमॅक्स मालवल्यावर पडवीत बालगंधर्वांची नाट्यपदे गुणगुणणारे आजोबा आठवतात. ‘स्वकुल तारक सुता’ अन् ‘नाथ हा माझाऽऽ’ ही त्यांची आवडती गाणी. त्याना गाण्याची आवड होती, परंतु शास्त्रोक्त शिक्षण नव्हते. वडील पण ‘मृगनयना रसिक मोहिनी…’ अन् ‘हृदयीधरा हा बोध करा’ हे नाट्यपद खर्जात म्हणत. कारण त्यांना आपल्या आवाजाच्या मर्यादेची जाणीव होती. ‘ऊस डोंगा, पण रस नाही डोंगा’ हा अभंग ते भक्तिभावाने आळवीत. कै. दादामाम आल्यावर तर नाटक आणि संगीत यावरील गप्पांत एक आगळाच रंग भरत असे.
मनातल्या आठवणीच्या अशा पुष्कळ लड्या उलगडल्या. कोरगाव, तोर्से आणि इतर गावांतून भाताची पोती येत असत. ती ‘पायली’ या मापाने मोजत. यासंदर्भात भिकारो पटेकार आठवतो. ताकदीचा गडी. ओझी डोक्यावरून वाहून आणत असे अन् सालात मोजमाप. एक या अंकाला ‘लाप’ असे म्हणत असे. एक पायली मोजून ती ओतेपर्यंत याचा ‘लाप’ हा मंत्र चालू असे. हे भात गिरणीवर पाठवले जात असे. उरलेल्याचे उकडे तांदूळ बनवण्यासाठी विहिरीजवळ तीन दगडांच्या चुलीवर शिजविणे. त्यात अंदाजाने फणसाच्या आठळ्या टाकत. त्या पण चांगल्या शिजून येत. थोडे भात मुसळाने कांडले जात असे. हे कांडलेले तांदूळ जात्यात दळले जात असत. त्यावेळी कानावर पडलेल्या मधुर ओव्या विस्मरणात जाणे कठीण. आताशा देवकार्यात दिसते जात्याचे व ओव्यांचे विडंबन. पण काही का होईना, परंपरा सांकेतिक रूपाने चालू आहे. तांदळाच्या पिठाच्या पेजेचा ‘निवळ’ घालून भाजलेल्या भाकर्‍यांची चव न्यारीच. काही लोक ही भाकरी चटणीबरोबर किंवा ‘खतखत्या’बरोबर चवीने खात. आता आमच्या खाण्यात पॉलिश झालेला तांदूळ. तरी फॅशन म्हणून किंवा इतर कारणामुळे ऑर्गेनिकचे फॅड आलेय. काळाच्या ओघात आमच्या या घरात विविध सोयीसुविधा आल्या. नळाचे पाणी, सेफ्टीकचा संडास झाला. वीज आली, मार्बलच्या फरशा आल्या, कॉंक्रिटचे काही भागापुरते छत आले, ग्रिल्स आले. परंतु घराचा चेहरा बदलला नाही. घराला आता ऐंशी वर्षे होत आली परंतु वृद्धपणाच्या खुणा देहावर दिसत नाहीत. कोकणात एक समज आहे, मूळ मठीत दिवा लागला तर आपल्या भाग्याचे दिवे उजळतात. परंतु एक खरे की, घर राखून असीम मानसिक शांतता लाभते. कुठल्याही वाड्याला, घराला जोपर्यंत माणसांची ऊब असते तोपर्यंत ‘घरघर’ लागण्याची शक्यता कमीच.