या देवी सर्व भूतेषु…

0
382
  • नारायणबुवा बर्वे
    वाळपई

यंदाच्या महामारीच्या काळात नवरात्रोत्सव अत्यंत पवित्र वातावरणात सोवळेओवळे (सामाजिक अंतर पाळून) मुखावरण वापरून साजरा करून देवीने सांगितल्याप्रमाणे तिचे महात्म्य गाऊन महामारी दूर घालवूया.
सर्वेजनाः सुखिनो भवंतु|

तसे पाहू गेल्यास नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव. राम नवरात्र, दत्तनवरात्र, खंडे नवरात्र अशी नवरात्रे केली जातात. आता अश्‍विन महिन्यामध्ये होणारे देवी नवरात्र किंवा शारदीय नवरात्र (शरद ऋतूमध्ये होते). या नवरात्रींमध्ये महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांचे उत्सव होतात. हजारो वर्षांपूर्वी देव आणि दैत्य यांचे युद्ध सुरू झाले व शंभर वर्षे चालू होते. या युद्धात देवांचा पराजय झाला. महिषासुर नावाच्या दैत्याबरोबर युद्ध सुरू होते. यात तो विजयी झाला. इंद्राचे आसन त्याने ग्रहण केले. महिषासुर राज्य चालवू लागला. तिन्ही लोकांमध्ये त्याची सत्ता झाली. पाताळाचे राज्य त्याचेच. पण स्वर्ग व मृत्युलोक त्याच्याकडे आले. मृत्युलोकातील धर्मकृत्ये बंद झाली. देवांना खायला मिळेना. चंद्र, सूर्य पंचमहाभूते महिषासुराची कामे करू लागली. सत्ता बदलली. तरी यंत्रणा थांबत नाही. पण सत्ता नसली की फार त्रास होतो. म्हणून सर्व देव एकत्रित झाले. पृथ्वी कंटाळली होती. ती गाईचे रूप घेऊन गेली. बाकीचे देव छायारुपाने गेले व महासत्ता असलेल्या भगवान शंकर, विष्णू, ब्रह्मदेव यांच्याकडे जाऊन त्यांनी ही सर्व हकिगत सांगितली. देवांना संताप अनावर झाला व शंकराने तिसरा डोळा उघडला. त्यातून एक तेजोमय गोलकसारखा निघाला व अवकाशात स्थिर झाला. विष्णूच्या डोळ्यांतून तेज निघाले ते त्या गोलकांत सामावले. ब्रह्मदेवाच्या डोळ्यांतूनही तेज निघाले. ते त्या गोलकांत सामावले. सर्व देवांच्या अंगातून निघालेले तेज एकवटले व एका स्त्रीत रूपांतर झाले. तिच्या तेजाने त्रैलोक्य व्यापून गेले. सर्व देवांच्या अंगातून निघालेल्या तेजाने तिचे सर्व शरीर व्यापले होते. पण अनावृत्त असा तो देह बघून देवांनी आपल्याकडील एकेक वस्तू तिला द्यायला सुरुवात केली.
क्षीरसागराने कधीही जीर्ण न होणारी वस्त्रे दिली, माळा दिल्या, काही दागदागिने दिले. शंकराने आपल्या त्रिशुळातून दुसरा त्रिशूळ दिला. भगवान श्रीकृष्णाने सुदर्शनचक्रातून दुसरे चक्र दिले. वरुणाने शंख व पाश दिले. अग्नीने शक्ती दिली. वायूने धनुष्यासह बाणांनी भरलेला भाता दिला. इंद्राने दुसरे वज्र व एक घंटा दिली. यमाने दंड दिला. ब्रह्मदेवाने कमंडलू दिला. प्रजापतीने अंक्षुमाळा दिली. हिमालयाने वाहन म्हणून सिंह दिला. बाकीच्या देवांनीही आपल्याकडील असलेली वस्त्रे, दागदागिने वगैरे दिले.
आता ती स्त्री म्हणजे देवीस्वरुप दिसायला लागली. शस्त्रसज्ज अशी ती देवी म्हणजे शक्ती सर्वांना विचारायला लागली व मोठ्यांनी हसायला लागली. तिच्या हसण्याने सर्व परिसर दुमदुमून गेला. देवांनी, ऋषिमुनींनी तिची स्तुती केली. तो आवाज ऐकून शस्त्रास्त्रे सज्ज करून इतर दैत्यांसह महिषासुरही तेथे आला. बरोबर कोट्यवधी दैत्यसैन्य होते. चिक्षूर त्याचा सेनापती होती. तो देवांशी युद्ध करू लागला. चामर दैत्य चतुरंगसेना घेऊन आला. उदग्र नावाचा दैत्य साठहजार रथ घेऊन आला होता. महामनु नावाचा दैत्य एक कोटी सैन्य घेऊन आला होता. असे अनेक दैत्य कोट्यवधी सैन्य घेऊन, वेगवेगळी शस्त्रे घेऊन लढत होते. देवीचे वाहन सिंहही प्रक्षुब्ध होऊन सैन्यात घुसला. देवीने सोडलेल्या हुंकारातून अनेक देवगणही तयार झाले व त्यांनी अनेक दैत्यांचा नाशही केला. सिंहही गर्जना करत होता. घनघोर युद्ध झाले व दैत्यसैन्याचा नाश झाला. महिषासुराचा सेनापतीही मारला गेला. जवळजवळ सर्व दैत्यसैन्याचा नाश झाला. आता महिषासुर रेड्याचे रूप घेऊन रणांगणात आला. देवगणांचा नाश करत करत देवीवर चालून आला. देवीने पाश टाकून त्याला बद्ध केला. पण त्याने पाशातून सुटका करून सिंहरुप धारण केले. देवी त्याचा शिरच्छेद करणार तोच पुरुषरुप धारण केले. देवीने त्याला बाणांनी जर्जर केले. तोवर त्याने हत्तीचे रूप धारण केले. देवीने त्याची सोंड कापून टाकली. पुन्हा त्याने रेड्याचे रूप धारण केले व चालून आला. देवी क्रोधाने संतप्त झाली. कुबेराने दिलेल्या पानपात्रातील मद्य प्राशन केले व महिषासुरावर चालून गेली आणि आपल्या पायाने दडपून कंठावर शुळाने वार करू लागली. तोच त्याने राक्षसरूप धारण करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी देवीने कंठाचा छेद करून त्याचा नाश केला. सर्व राक्षससैन्य पळून गेले. देवींनी, ऋषिमुनींनी, गंधर्वांनी, अप्सरांनी नृत्य करण्यास सुरुवात केली. देवीची स्तुती करायला सुरुवात केली. मोठा आनंदोत्सव साजरा करायला सुरुवात झाली. अनेक उपचारांनी तिची पूजा केली. धूप ओवाळला, आरत्या केल्या, अनेक प्रकारच्या फुले, फळांच्या माळा अर्पण केल्या. गीत, नृत्य, वाद्य या प्रकारे स्तुती केली. देवीने संतुष्ट होऊन देवांना व इतर ऋषिमुनींना सांगितले की तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. देवांनी सांगितले, सर्वांना सुखी ठेव. तरीही देवीना काहीतरी आणखी मागण्यासाठी सांगितले तेव्हा सर्वांनी सांगितले ‘आम्ही ज्या ज्या वेळी तुझे स्मरण करू त्यावेळी येऊन आमचे रक्षण कर’. हे युद्ध नऊ दिवस चालले होते. तो शरदऋतू होता व अश्‍विन महिना होता. त्याचमुळे त्याची आठवण व देवीची सेवा म्हणून श्रीदेवीनवरात्र म्हणून हा नऊ दिवसांचा उत्सव करायला सुरुवात झाली. यामध्ये अष्टमी महालक्ष्मी उत्सव येतो. त्याचप्रमाणे महासरस्वती उत्सव येतो व विजयादशमी येते. त्यामुळे एकत्रित स्वरूपात दहा दिवस उत्सव साजरा केला जातो. कुळाचाराप्रमाणे व देशाचाराप्रमाणे उत्सव केला जातो. सर्वसाधारणपणे नवदुर्गा स्थापना, माळ बांधणे, रोज सप्तशतीपाठ वाचणे, कुमारिका पूजन, ब्राह्मण सुवासिनी, संतर्पण, थोड्याबहुत फरकाने हे केले जाते. श्रीदेवी दुर्गाकृपा मिळावी, राक्षसांचा नाश केला म्हणून कृतज्ञता असा विषय आहे. मग त्यामध्ये नावीन्य आणावे म्हणून भजन, कीर्तन, गायन, वादन सुरू झाले. एकदा केले म्हणून प्रथा, परंपरा निर्माण झाली. नवरात्र असे तिथी-क्षय/वृद्धीप्रमाणे आठ दिवस किंवा दहा दिवसही होतात. देवीची मंदिरे आहेत तिथे, तसेच घरांत नवरात्र साजरे करण्याची प्रथा आहे. त्याला जोडून दसरा येतो. म्हणून सीमोल्लंघन, पण काही ठिकाणी याला शिवलग्न म्हटले जाते. गोव्यामध्ये सर्वच मंदिरातून नवरात्र साजरे करण्याची प्रथा आहे. घटस्थापना, धान्य रुजवण, घाळेणे, माळा बांधणे काही ठिकाणी चढत्या माळा, बर्‍याच मंदिरांतून भजन, कीर्तन, काही मोजक्या मंदिरांमध्ये मखर हलविणे हा आगळावेगळा प्रकार आढळतो. वाद्याच्या तालावरती मखर हालवणे फारच अवर्णनीय सोहळा आहे. वाद्यवृदांची व मखर हालविणार्‍यांची एक परीक्षाच असते. बोरी गावातील मखर फार प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी तेरा मात्रांचा टाळ वाजवितात. हलताना मखर बघणे स्वर्गीय आनंद आहे. अशा प्रकारे मखर हलविणे गोव्याबाहेर कमी प्रमाणात असेल. अशा प्रकारच्या काही प्रथा, परंपरा आढळतात. काही घरांतून धर्मग्रंथांचे वाचनही केले जाते.
काही मंदिरांतून पालखी, तरंगे नेसविणे वगैरे प्रथा आहेत. बंगालमध्ये सार्वजनिक दुर्गापुजा करण्याची प्रथा आहे. उत्तर भारतामध्ये दांडिया, गरबा वगैरेंची प्रथा आहे. पण या प्रथा नवरात्रीमध्ये घुसलेल्या नंतरच्या प्रथा आहेत. नवरात्र म्हणजे देवीची स्तुती, देवीची आराधना ही आहे.

बॉक्स –
यावर्षी नवरात्रोत्सव आश्‍विन शु. प्रतिपदा दि. १७ ऑक्टो. ते आ.शुद्ध दशमी म्हणजे दि. २५ऑक्टो.पर्यंत असा होणार आहे. २०ला ललिता पंचमी व्रत, दि. २२ला सरस्वती पूजन, २४ ला महाअष्टमी, महालक्ष्मी पूजन व दि. २५ रोजी शस्त्रपूजा, सीमोल्लंघन वगैरे उत्सवांनी होणार आहे. तिथी क्षयवृद्धीमुळे नवमी व दशमी एकाच दिवशी होते. यामुळे ९ दिवसांत नवरात्र संपन्न होते.

पहिल्या दिवशी घटस्थापना, प्रथेप्रमाणे रुजवण घालणे, माळा बांधणे, रात्री धुपारती, भजन, कीर्तन सुरू होईल व मखर हालविण्याची प्रथा असल्यास मखर होईल. मखरात देवीला विशेष दिवसाप्रमाणे सजविण्याची प्रथा आहे. सरस्वती, महालक्ष्मी व नवमीच्या दिवशी महिषासुरमर्दिनीच्या रूपात सजविली जाते. दर्शनाने मन तृप्त होऊन जाते. वेलिंग येथे हिरण्यकश्यपू वध दाखविला जातो. आपापल्या कलांप्रमाणे विविध प्रथा, परंपरा, सुरू झाल्या व आजतागायत त्याच पद्धतीने चालू आहेत.
देवीला बळी देण्याची प्रथा अजूनही गोमंतकामध्ये काही देवस्थानात आहे. दसर्‍याच्या दिवशी हा बळी दिला जातो.
नवरात्रोत्सव हा कुळधर्म, कुळाचार आहे. मंदिरातूनसुद्धा इतर मोठ्या उत्सवाप्रमाणे प्रथा, परंपरा, सोवळे, ओवळे फार कडक पद्धतीने पाळले जाते. घटस्थापनेची सर्वसाधारण म्हणजे मातीचे स्थंडिल करायचे. त्यावर मंत्रोच्चारांसह धान्य पेरायचे व वर मध्यभागी मातीचा, चांदीचा, सोन्याचा, तांब्याचा कलश स्थापन करायचा. पंचपल्लव किंवा आंब्याचा पल्लव ठेवून कलशावर पूर्णपात्र किंवा नारळ ठेवतात. त्यावर देवी नवदुर्गा स्थापन करतात. वस्त्रांनी कलश अवगुंठीत करतात. कलश सोन्याचा किंवा त्या त्या प्रकारचा स्थापन करतात. धान्य एक प्रकारचे किंवा काही ठिकाणी सप्तधान्ये, नवधान्ये पेरतात. हे अंकुर समाप्तीदिवशी प्रसाद म्हणून देतात.
शरदऋतूत भरपूर फुले मिळतात. त्याशिवाय निसर्ग प्रफुल्लित झालेला असतो. आपल्या संस्कृतीमध्ये दोरा, घट, धान्य व संगीत, नृत्य, भजन, कीर्तन, पुराण याला फारच महत्त्व आहे. महिषासुराचा वध झाल्यानंतर देवीला पुष्पमाळा दिल्या, गंधर्वांनी गायन केले, अप्सरांनी नृत्य केले, ऋषिमुनींनी वेदमंत्र म्हटले, सामगायन केले. देवीने सांगितले, मी संतुष्ट आहे. ज्यावेळी तुमच्यावर संकट येईल त्यावेळी मी अवतार घेईन व तुमचे संकट निवारण करीन. त्यानंतर अनेक अवतार घेऊन राक्षसांचा संहार केला. महाकाली, चामुंडा, शाकंभरी, भ्रामरी असे अवतार घेतले. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कृष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी, सिद्धीदात्री याप्रमाणे नवदुर्गा म्हणून तिने अवतार घेतले. नवरात्रीत यांचीही पूजा केली जाते आणि देवांनी असेही सांगितले आहे
उपसर्गानिशेषांस्तु महामारी समुद्भवान्‌|
तथा त्रिविधमुत्पात्तं माहात्मं समयेन्मम॥
म्हणूनच यंदाच्या महामारीच्या काळात नवरात्रोत्सव अत्यंत पवित्र वातावरणात सोवळेओवळे (सामाजिक अंतर पाळून) मुखावरण वापरून साजरा करून देवीने सांगितल्याप्रमाणे तिचे माहात्म्य गाऊन महामारी दूर घालवूया. सर्वेजनाः सुखिनो भवंतु|