स्त्री शक्तीचा जागर

0
414
  • सौ. सुनीता फडणीस.
    पर्वरी, गोवा.

या नवरात्रोत्सवात नऊ दिवस भगवती शक्तीस्वरूपिणीचे पूजन, अर्चन, उपासना करून स्त्रीही शक्ती प्राप्त करते आणि आपल्या सामान्य जीवनातील येणार्‍या समस्या, प्रश्‍न, संकटे यांचा सामना करण्यासाठी सज्ज होते. स्त्रीमधील शक्ती जागृत होते.

नवरात्र अर्थात घटस्थापना ते विजयादशमी नऊ दिवसांचा अथवा नऊ रात्रींचा उत्सव म्हणणे यथार्थ होईल. या नवरात्रोत्सवाचा थाट काही अवर्णनीय असतो. नुकताच पाऊस संपलेला असतो. शरद ऋतूचे आगमन झालेले असते. वातावरण शांत आल्हाददायक भासू लागते. अशा या पवित्र अश्विन मासी शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. सर्वत्र नऊ दिवस नऊ रूपांमध्ये या आदिमायेचे, दुर्गेचे पूजन केले जाते. या आई जगदंबेची शक्ती, तेज अनुपम आहे. तिचे सौंदर्य अवर्णनीय आहे. घरोघरी आणि मंदिरांमध्येसुद्धा अतिशय पवित्र वातावरण असते. विविध व्रतवैकल्ये, नियम पाळले जातात. फुलांच्या माळा, आरास, अखंड दीप, होमहवन, कुळाचार, जागरण, दुर्गा सप्तशती पारायण असे अनेक उपचार या जगदंबेला प्रसन्न करण्यासाठी केले जातात. पावन मृत्तिका, त्यावर घट ठेवून देवीची स्थापना केली जाते. त्या मातीत रुजवण घातले जाते. नऊ दिवस नऊ माळा, शेवंतीची वेणी, पुरणाचा नैवेद्य, आरती, अशी भक्तिभावाने आईअंबेची उपासना केली जाते. पंचमीला जागरण, षष्ठीचे दिवशी गोंधळ, अष्टमीला जोगवा, कुमारिकापूजनाचा थाट होतो.

नवरात्र, स्त्री शक्तीचा जागर –

या जगदंबेने विजयादशमीच्या दिवशी महिषासुराचा वध करून या जगावरचे संकट दूर केले. स्त्री पालनकर्ती, रक्षणकर्ती ती या जगन्मातेप्रमाणे या संसारात आपले पात्र वठवीत असते. स्त्रीची विविध रूपे आहेत. ती आई, बहीण, कन्या, पत्नी अशा निरनिराळ्या रूपात हे जीवन खरे तर यथार्थ करत असते. आईच्या रूपात स्नेह, वात्सल्य, माया, ममतेचा वर्षाव करते. संस्कार देते. आपल्याला घडवते. बहिणीच्या रूपातसुध्दा वेगळी माया अनुभवाला येते. कधी लटके भांडण, तर कधी मैत्री, तर कधी तोरा पण सर्वच जीवन आनंदमय करणारे असते. पत्नीच्या रूपात घर आणि जीवन सावरते तर मुलीच्या रूपात हट्ट, नखरे पुरवून घेते. स्त्रीमुळेच जीवनाला अर्थ प्राप्त होतो. गृहिणी म्हणून ती अनेक भूमिका एकाच वेळी साकारत असते आणि ही भूमिका साकारताना ती अष्टभुजाधारिणी असल्यासारखे भासते. सुभाषितकाराने गृहिणीचे फार छान वर्णन केले आहे. ‘गृहिणीं विना गृहम् अरण्यम्‌|’ या एका ओळीमध्येच गृहिणीचे महत्त्व आपल्या लक्षात येते. म्हणूनच की काय आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये वर्षभरामध्ये निरनिराळ्या रूपात स्त्रीचा सन्मान, तिचे पूजन होते. हरितालिका, मंगळागौरी, महालक्ष्मीपूजन, दुर्गापूजन, नवरात्रात सुवासिनीपूजन, कुमारिकापूजन केले जाते. या सर्व प्रथांमागे, परंपरांमागे स्त्रीला देवतेप्रमाणे मान देण्यात आला आहे. तसेही आमच्या संस्कृतीत वर्णन आहे ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता:|’ म्हणजे ज्या ठिकाणी नारीचे पूजन होते, महिलांचा मानसन्मान होतो त्याचठिकाणी देवतांचा वास असतो. या उत्सवाच्या निमित्ताने स्त्री स्वतःला व्यक्त करत असते. खर्‍या अर्थाने हा तिचा उत्सव असतो. तिच्या शक्तीचा उत्सव असतो. या उत्सवात तिच्यातील जोम, उत्साह बहरून येत असतो. नवकल्पनांना संधी प्राप्त होत असते. तिचं अलंकृत होणे, सजावट, पारंपरिक, धार्मिक रिवाजांमध्ये आनंद लुटणे, सजणे, सवरणे, सौभाग्यलेणं धारण करणे, त्याचबरोबर या आदिशक्तीची स्तुती, गुणगान करणे. तिच्या भक्तीत तल्लीन होऊन पारंपरिक नृत्य करणे. हे सर्वकाही फार आनंददायी असते.

वेगवेगळ्या भागात आपण बघतो, वेगवेगळे नृत्यप्रकार आहेत, त्या त्या प्रांतातील महिला त्या पारंपरिक नृत्यामध्ये सहभागी होऊन आनंद लुटतात व भक्तीही करतात. जसे बंगालमध्ये दोन्ही हातात दिवे घेऊन पारंपरिक नृत्य, महाराष्ट्रात घागरी फुंकणे, आमच्या गोव्यात फुगडी म्हणजे फेर धरून नृत्य करणे आणि गुजरातचा गरबा तर सर्वत्र प्रसिद्ध आहे. फक्त देशातच नाही तर जगात सर्वत्र या नवरात्रात गरबा खेळला जातो. एकंदरीत काय तर स्त्रीही या उत्सवातून स्वतःला व्यक्त करत असते. आजच्या युगात समानतेच्या विचारांचा बोलबाला आपण ऐकतो पण मला वाटते आमचा हा नवरात्रोत्सव म्हणजे स्त्री समानता नाही तर ती श्रेष्ठ आहे हेच प्रतिपादन करतो.
या नवरात्रोत्सवात नऊ दिवस भगवती शक्तीस्वरूपिणीचे पूजन, अर्चन, उपासना करून स्त्रीही शक्ती प्राप्त करते आणि आपल्या सामान्य जीवनातील येणार्‍या समस्या, प्रश्‍न, संकटे यांचा सामना करण्यासाठी सज्ज होते. स्त्रीमधील शक्ती जागृत होते. असा स्त्री शक्तीचा जागर, जागृती करणारा हा नवरात्रोत्सव आम्हा सर्व भारतीयांच्या मनात नवचैतन्य निर्माण करतो सर्वांच्याच दृष्टीने या उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्री शक्तीचा तिच्या सामर्थ्याचा हा उत्सव आहे.