- वैद्य स्वाती हे. अणवेकर
(आरोग्य आयुर्वेदिक क्लिनिक
म्हापसा)
शेणाचा वापर हा औषध निर्मितीमध्ये होतो. पंचगव्य ज्यात शेण, गोमूत्र, दूध, तूप, आणि दही असते ह्याचा उपयोग अनेक औषध निर्मितीसाठी, तसेच अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो. शेणाची राख ही साबण, मलम, क्रीम्स, टूथपेस्ट, दंतमंजन ह्यामध्ये वापरली जाते. शेणाचा उपयोग उदबत्त्या बनवायला करतात ज्या मच्छर मारण्यात प्रभावी आहेत.
आजच्या लेखामध्ये आपण देशी गाईच्या शेणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ‘गोमये वसते लक्ष्मी’ अर्थात गाईच्या शेणामध्ये आपल्याला अर्थप्राप्ती करून देण्याची क्षमता आहे.
आपण रस्त्यावर सोडलेल्या अनेक बेवारस गाई पाहतो. ह्या गाई म्हातार्या झाल्या, त्यांनी दूध देणे बंद केले की ह्या गाईना गोपालक सोडून देतात. पण ह्याच गाईंचे शेण आणि गोमूत्र हे आपल्याला प्रती गाईच्या हिशोबाने दर महिन्याकाठी ६०००-१०००० रुपयांचे उत्पन्न देऊ शकते हे फार कमी लोकांना माहीत असेल.
देशी गाईच्या दूध, गोमूत्र आणि शेण ह्या तिघांमध्ये सुवर्ण क्षार असतात असे संशोधनात आढळून आले आहे. आता आपण देशी गाई आणि संकरित जातीच्या गाई ह्यांच्या शेणातील खनिजांची तुलना पाहूया. संकरित जातीच्या गाईपेक्षा देशी गाईंच्या शेणामध्ये मँगनीज, कॅल्शिअम, फॉस्फरस, झिंक व कॉपर इ खनिजे भरपूर असतात. त्यामानाने त्यांच्या शेणात लोहाचे प्रमाण मात्र कमी आढळते.
देशी गाईच्या शेणात असणारे जिवाणू आणि अन्य सूक्ष्म जिवाणू असल्यामुळे हे शेण प्रोबायोटिक म्हणून उत्तम कार्य करते. आपल्या देशात २०९ दशलक्ष देशी गाई असून त्यांच्यापासून ५६० दशलक्ष टन गोमूत्र आणि शेण उपलब्ध होते. एक गाय दिवसाला ९-१५ किलोपर्यंत शेण देते.
पूर्वीच्या काळी शेणाचा उपयोग हा घराच्या भिंती आणि जमीन तसेच अंगण सारवायला केला जायचा. हीच पद्धत आजही बर्याच गावांमध्ये अमलात आणली जाते. तसेच शेणापासून गोवर्या बनवून त्याचा वापर इंधन म्हणून चूल पेटवायला केला जायचा ज्यावर स्वयंपाक आणि आंघोळीचे पाणी तापविले जायचे. आणि ह्याच गोवर्यांची राख ही भांडी घासायला वापरली जायची.
घराच्या भिंती व जमीन शेणाने सारवल्याने थंडी व गर्मीमध्ये घरातील तापमान नियंत्रणात राखले जाते. तसेच घराचे अल्ट्रा व्हॉयलेट किरणांपासून संरक्षण होते. गाईचे शेणाचे अनेक उपयोग आहेत जसे सेंद्रीय शेतीकरिता शेणखत तयार करणे. गाईच्या शेणात जमिनीमध्ये पाणी मुरवून ठेवण्याचा उत्तम गुणधर्म असतो. गाईच्या शेणापासून तयार केलेले शेणखत हे रासायनिक खतांना फक्त पर्याय नसून ते जमिनीचा कस राखण्याचे काम करते.
१ किलो गाईचे शेण हे जमिनीत ९-१० लीटर पाणी शोषून ठेवू शकते म्हणूनच गाईचे शेण हे ग्लोबल वार्मिंग कमी करायला खूप उपयोगी आहे.
तसेच १ किलो शेणापासून साधारणपणे ३३ किलो शेणखत निर्माण केले जाऊ शकते. ह्या शेणखतामध्ये १०८ सूक्ष्म पोषक घटक असतात त्यामुळेच हे रासायनिक खतापेक्षा १० पट उत्तम असते कारण रासायनिक खतामध्ये जेमतेम ३ सूक्ष्म पोषक घटक आढळतात.
गाईच्या शेणापासून बायोगॅस निर्माण केला जातो जो पुढील काही काळात एलपीजीच्या वाढत्या किमतीमुळे एलपीजी गॅससाठी एक उत्तम पर्याय ठरेल ह्यात शंका नाही. ह्या बायोगॅसनिर्मितीमध्ये निर्माण होणारे बायप्रॉडक्ट जसे की बायो वॉटर ज्यात शेण व गोमूत्र असते ह्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो ज्यामुळे मातीचा कस वाढतो आणि पिकांची गुणवत्तादेखील वाढते.
हरयाणामध्ये असा एक पायलट प्रकल्प सुरू आहे ज्यामध्ये ते गाईच्या शेणापासून मिथेन गॅस नामक इंधन निर्माण करून पाहत आहेत जो पुढील काळात सीएनजीसाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. गाईच्या शेणामध्ये जमिनीमधील टोटल पेट्रोलियम हायड्रोकार्बन्स कमी करण्याची उत्तम क्षमता असते कारण ह्यामध्ये चांगले उपयुक्त बॅक्टेरिया असतात. तसेच शेणाचा वापर हा बायोमेडिकल वेस्ट आणि फार्मास्युटिकल वेस्ट ह्यावर प्रक्रिया करण्यासाठी होऊ शकतो.
शेणाचा वापर हा औषध निर्मितीमध्येदेखील होतो. पंचगव्य ज्यात शेण, गोमूत्र, दूध, तूप, आणि दही असते ह्याचा उपयोग अनेक औषध निर्मितीसाठी केला जातो. तसेच ह्याचा वापर अनेक आजार बरे करण्यासाठी केला जातो. शेणाची राख ही साबण, मलम, क्रीम्स, टूथपेस्ट, दंतमंजन ह्यामध्ये केला जातो. शेणाचा उपयोग उदबत्त्या बनवायला करतात ज्या मच्छर मारण्यात प्रभावी आहेत. बर्याच आयुर्वेदिक कंपन्या पारंपरिक आयुर्वेदिक औषध बनवायला इंधन म्हणून आजही शेणाच्या गोवर्या वापरतात .
अर्थातच हा लेख वाचून तुम्हाला गाईच्या शेणामध्ये एखाद्या काम धंदा नसलेल्या व्यक्तीला देखील उत्तम पैसा मिळवून देण्याची क्षमता आहे हे समजले असेल.